रोजच्या जेवणात तूरडाळ आणि मूगडाळ सोडली तर इतर डाळींचा उपयोग फारसा केला जात नाही. त्यात डाळी पचायला जड असल्याचा समज असल्यामुळे पुष्कळ जण डाळींचे पदार्थ कमीच खातात. हरभऱ्याच्या (चण्याच्या) डाळीशी तर अनेकांचे अगदी वाकडेच असते. पण प्रत्येक डाळीत शरीराला चांगले असे अनेकविध गुण आहेत. प्रमुख पाच डाळींचे गुण जाणून घेऊया…

डाळींचा रोजच्या जेवणातला उपयोग फक्त आमटी किंवा वरणापुरताच मर्यादित नक्कीच नाही. अर्थात या आमटी आणि वरणाचेच कितीतरी प्रकार करता येतात. दोन-तीन डाळी एकत्र करून किंवा फोडणीत वेगवेगळ्या भाज्या घालून रोजचे वरणही चवदार करता येते. कढी, डाळींचे पीठ पेरलेल्या भाज्या, पीठ लावून केलेली ताकातली भाजी, ढोकळा, धिरडी, घावन, डाळींचे सूप असे इतर पदार्थ आहेतच की. शिवाय आपल्याकडे डाळींचे पुरण, डाळींचा हलवा, डाळीच्या रव्याचा शिरा, लाडू अशा गोड पदार्थाचीही वानवा नाही. प्रश्न इतकाच आहे की आपण रोजच्या आहारात डाळ वापरतो का? डाळी पचायला जड असल्यामुळे अनेक जण डाळींपासून दूर राहणेच पसंत करतात. फार-फार तर तूरडाळ किंवा मूगडाळीच्या पुढे जात नाहीत. पण डाळींचे अनेक चांगले गुण आहेत. डाळीत असलेली प्रथिने शरीरातील स्नायूंना बळकटी देतात. डाळींमध्ये जस्त (झिंक), तंतुमय पदार्थ आणि शरीरात नैसर्गिकरीत्या तयार न होणारी अमिनो आम्लेही असतात.

hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी

काही प्रमुख डाळी –तूरडाळ- ही डाळ पचायला खूप जड किंवा खूप हलकी नाही तर मध्यम असते. पण ती अति प्रमाणात खाल्ली गेल्यास काहींना पित्ताचा त्रास होऊ शकतो. तूरडाळीत फॉलिक अ‍ॅसिड, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कोलिन हे घटक असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी ही डाळ पोषक समजली जाते.

मूगडाळ– ही डाळ अगदी हलकी, पथ्याची डाळ आहे. प्रथिने शरीरात शोषले जाण्यासाठीचे घटक या डाळीत चांगल्या प्रमाणात आहेत. यातले विरघळण्याजोगे तंतुमय पदार्थ (सोल्युबल फायबर्स) शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत करतात. मूगडाळीतला ‘आयसोफ्लॅवॉन’ हा घटक ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकासारखा परिणाम देतो. त्यामुळे स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या वेळी मूगडाळ चांगली ठरते. या डाळीत ‘बी- १२’ सोडून इतर सर्व ‘बी’ जीवनसत्त्वे असतात. ‘सी’ जीवनसत्त्व आणि फॉलिक अ‍ॅसिडही यात असल्यामुळे ही डाळ प्रतिकारशक्तीसाठीही चांगली.

मसूर डाळ- ही डाळ सहसा फार कमी वापरली जाते, पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवत असल्यामुळे मसूर डाळीचे बाउलभर सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अ‍ॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते.

हरभरा डाळ- या डाळीत ‘सी’ व ‘के’ व्हिटॅमिन आणि जस्त असते. हे घटकही शरीरात तयार झालेल्या अपायकारक पदार्थापासून शरीरातील हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा नाजूक अवयवांचे रक्षण करायला मदत करतात. चणाडाळीतले कॅल्शियम हाडे, दात, नखे मजबूत करते. या डाळीत पोटॅशियम भरपूर आहे. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब योग्य असावा यासाठी ही डाळ मदत करते. शरीरातील ‘होमोसिस्टेन’ या द्रव्याची पातळी योग्य राहण्यासाठीही तिचा उपयोग होतो.

उडीद डाळ- ही डाळ पचायला जड, पण पौष्टिक असते. त्यामुळे शरीराच्या पोषणासाठी ती चांगली. चमकदार, मऊ केसांसाठी उडीद डाळ आहारात घेतल्यामुळे फायदा होतो. लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांचे खाणे कमी असल्यामुळे त्यांना मळाला भरीवपणा नसल्याने बद्धकोष्ठाची तक्रार असते. ही डाळ शरीरात तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा देते. उडीद डाळ यकृतालाही कार्यप्रवण ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे कावीळ, डेंग्यू, मलेरिया किंवा यकृताच्या आजारांमधून पूर्ण बरे झाल्यानंतर यकृताचे कार्य सुधारण्यासाठी ही डाळ आहारात घ्यावी. या डाळीतही पोटॅशियम चांगले आहे. ‘सी’ आणि ‘बी’ जीवनसत्त्वे, कॅल्शियम, जस्त आणि तांबेही उडीद डाळीतून मिळते.

डाळी पचण्यासाठी..

काही जणांना डाळी खाल्ल्यावर गॅसेस आणि अ‍ॅसिडिटी होते. डाळींमध्ये असलेल्या प्रथिनांचे शरीरात शोषण व्हावे यासाठी शरीरातील ‘ग्लुटोफियन’ हे रसायन काम करते. काही जणांमध्ये वयोमानानुसार किंवा दीर्घकाळ विशिष्ट औषधे घेतल्यामुळे किंवा पोटाच्या तक्रारींमुळे या रसायनाची कमतरता निर्माण होते, परिणामी प्रथिने नीट पचत नाहीत आणि गॅसेससारखा त्रास होतो.

डाळी पचण्यासाठी काही उपाय करून पाहता येतील..

डाळ शिजताना त्यात आले किसून घालावे. डाळीला देण्याच्या फोडणीतदेखील हळद, जिरे, मोहरी, हिंग याबरोबर दालचिनीचा तुकडा, काळे मिरे, कढीपत्ता, तेजपत्ता घालावा. डाळीवर लिंबू पिळावे, तसेच शक्यतो डाळीला काळे मीठ वापरावे.

डाळींना कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशा भाज्यांची जोड दिल्यास ती पचायला तुलनेने हलकी होते.

डाळीचे गोड पदार्थ करताना त्यात वेलची, जायफळ आणि सुंठ जरूर घालावी.

डाळींचे पदार्थ असलेले जेवण जेवल्यानंतर अननस किंवा पपईच्या दोन फोडी खाल्ल्या तरी पचन सोपे होते.

डॉ. संजीवनी राजवाडे-dr.sanjeevani@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)