Worst Time To Drink Milk : दुधात कॅल्शियम, जीवनसत्त्वे, प्रथिने असे अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या आहारात दूध समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. आई सुद्धा शाळेत जाणाऱ्या मुलांना सकाळी नाश्ता म्हणून एक ग्लास दूध आवर्जून देते. पण तुम्हाला माहिती आहे का? रिकाम्या पोटी दूध पिणे योग्य आहे की नाही? तर चला बातमीतून त्याचबद्दल जाणून घेऊयात…

दुधाचे सेवन का करावे?

दुधात अनेक पोषक घटक, उपयुक्त चरबी आणि भरपूर कॅल्शियम असते. दूध प्रथिनांचा चांगला स्रोत असतो; त्यामुळे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो. याव्यतिरिक्त, दुधात अ, ड आणि बी१२ सारखी विविध जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे देखील असतात; जी हाडांच्या आरोग्यासाठी, मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि पेशीय प्रक्रियांसाठी आवश्यक असतात. याव्यतिरिक्त, त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिडसह विविध प्रकारची उपयुक्त चरबी असते; जी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

कच्चे दूध प्यायल्याने काही पोषक तत्वांचे, विशेषतः चरबीत विरघळणारे जीवनसत्त्वे जसे की, ए, डी आणि ई यांचे चांगले शोषण होऊ शकते. कच्चे दूध उपयुक्त चरबींनी समृद्ध असल्याने, रिकाम्या पोटी प्यायल्याने तुमच्या रक्तप्रवाहात या पोषक तत्वांचे चांगले शोषण होऊ शकते. अन्नापेक्षा, दुधाचे पोषक तत्व शरीरात अधिक लवकर शोषले जाऊ शकतात; ज्यामुळे तुम्हाला लवकर फायदे मिळतात.

रिकाम्या पोटी दूध का पिऊ नये?

आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे हानिकारक ठरू शकते. दुधात लैक्टोज असते. रिकाम्या पोटी सेवन केल्याने शरीरात इन्सुलिन वाढते. काही लोक लैक्टोज पचवू शकत नाहीत. त्याला ‘लैक्टोज असहिष्णु’ म्हणतात. जर अशी मंडळी सकाळी रिकाम्या पोटी दूध पित असतील तर त्यांना ॲलर्जी होऊ शकते. इतकेच नाही तर रिकाम्या पोटी दूध पिल्याने पचन प्रक्रियेवरही परिणाम होऊन पोटफुगी आणि गॅसची समस्या उद्भवते. दूध आम्लयुक्त असते, म्हणून सकाळी रिकाम्या पोटी दूध पिल्याने काही लोकांना आम्लतेची समस्या जाणवू शकते.