शिओमी या गाजलेल्या मोबाईल कंपनीने एक अनोखी छायाचित्रांची स्पर्धा जाहीर केली आहे. यूजर्ससाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी कंपनीने काही अटीही ठेवल्या आहेत. यातील मुख्य अट म्हणजे स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे शिओमीचा एमआय ए१ हा मोबाईल असणे आवश्यक आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये केवळ एमआय यूजर्सच सहभागी होऊ शकतील. काही महिन्यांपूर्वी कंपनीने आपला हा स्मार्टफोन बाजारात लाँच केला होता. कंपनीचा ड्युएल रियर कॅमेरा असणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

विशेष म्हणजे या स्पर्धेत जिंकणाऱ्याला जवळपास १९ लाख ५२ हजारांचे बक्षीस मिळणार आहे. तर दुसऱ्या क्रमांक मिळविणाऱ्याला ६ लाख ५० हजारांचे पारितोषिक मिळणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरील विजेत्याला ३ लाख २५ हजारांचे बक्षिस मिळेल. यामध्ये सहभागी असणाऱ्यांना एमआय ए१ हा फोन वापरुनच एक फोटो काढायचा आहे. या स्पर्धेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एमआय ए १ नसलेलेही या फोनमध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र त्यासाठी सर्वात चांगल्या फोटोला वोटींग करावे लागणार आहे. यामध्ये जिंकणाऱ्यांना शिओमी कंपनीकडून रेडमी नोट ४ आणि एमआय ए १ जिंकण्याची संधी मिळणार आहे.

ही स्पर्धा भारत, रशिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार असून यासाठी स्पर्धक ११ डिसेंबरपर्यंत फोटो पाठविणे बंधनकारक आहे. विजेत्यांची घोषणा २० डिसेंबरपर्यंत होईल असे कंपनीने सांगितले आहे. यात जीवनशैली, निसर्ग, प्राणी, लँडस्केप यांसारखे विभाग देण्यात आले आहेत.