Yellow Teeth Solution: पांढरे आणि सुंदर दात केवळ चेहऱ्याची शोभाच वाढवत नाहीत, तर तुमच्या तोंडाच्या आरोग्याची स्थितीही स्पष्ट करतात. आजच्या काळात लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. लहान वयातच अनेक मुलांना वाईट सवयी लागतात. आजकालचे तरुण सिगारेट, तंबाखू, हुक्का आणि इतर नशेच्या गोष्टींच्या आहारी जातात आणि त्या गोष्टींचा पहिला परिणाम त्यांच्या दातांवर होतो. नशा करणाऱ्यांचे दात हळूहळू पिवळे होतात आणि त्यांचा चेहराही वाईट दिसू लागतो. हे बदल हळूहळू वाढत जातात आणि वय वाढल्यावर हे अधिक स्पष्टपणे दिसून येतात, ज्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्यही कमी होते.
क्लोव डेंटलमधील एमडीएस प्रोस्थो डेंटिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट वरिष्ठ सल्लागार डॉ. कोमलु तेजवथ यांनी सांगितले की, जर तुम्हाला दात पांढरे करायचे असतील, तर दातांची स्वच्छता महत्त्वाची आहे. दात पांढरे आणि चमकदार ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा टूथपेस्टने ब्रश करा. सौम्य ब्रिसल असलेला टूथब्रश वापरा आणि तो दर तीन महिन्यांनी बदला. ब्रश करताना काही भाग चुकल्यास त्यातील अन्नकण आणि प्लाक काढण्यासाठी रोज फ्लॉस करा. तोंडातील जीवाणू कमी करण्यासाठी अँटीबॅक्टेरियल माउथवॉशने गुळण्या करा.
तज्ज्ञांनी सांगितले की, दात पांढरे ठेवण्यासाठी मद्यपान कमी करा, विशेषतः रेड वाईन, बीयर आणि गडद रंगाचे मद्य, ज्यामुळे दातांवर डाग निर्माण होऊ शकतात. पेय घेतल्यानंतर पाण्याने तोंड धुवा. दातांचा थेट संपर्क कमी करण्यासाठी पेय पिताना स्ट्रॉचा वापर करा. दात पांढरे ठेवण्यासाठी काही घरगुती उपायही करता येतात. चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञांकडून की, पिवळे दात पांढरे करण्यासाठी कोणते घरगुती उपाय वापरता येतील.
बेकिंग सोडा
आठवड्यात एकदा किंवा दोनदा हलक्या बेकिंग सोड्याने ब्रश करा. अंदाजे एक मिनीट ब्रश केल्याने दातांवरचे डाग निघून जायला मदत होते. कधी कधी हायड्रोजन पॅरॉक्साइड माउथ रिन्सचा वापर करू शकता; पण त्याचा जास्त वापर टाळा, जेणेकरून दातांवरील इनॅमल सुरक्षित राहील.
केळी आणि संत्र्याच्या साली
दात पांढरे करण्यासाठी तुम्ही केळी किंवा संत्र्याच्या सालीने दात हलक्या हाताने घासा. क जीवनसत्त्वाने समृद्ध असलेली संत्र्याची साल दातांवरील घाण साफ करील आणि दात नैसर्गिकरीत्या स्वच्छ करील. दात नैसर्गिकरीत्या पांढरे करण्यासाठी हा देशी उपाय खूप उपयोगी आहे.
चारकोलने दात स्वच्छ करा
अॅक्टिव्हेटेड चारकोल हा एक नैसर्गिक घटक आहे, जो दात पांढरे करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. त्याची खासियत म्हणजे तो दातांच्या पृष्ठभागावरील डाग आणि हानिकारक घटक शोषून घेतो. चारकोल वापरल्याने दातांची चमक वाढते आणि ते अधिक स्वच्छ दिसतात. मात्र, अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार, चारकोलचा दातांवर होणारा परिणाम पूर्णपणे समजण्यासाठी अजून वैज्ञानिक संशोधनाची गरज आहे. त्यामुळे चारकोल वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.
हर्बल टूथपेस्ट वापरा
जर तुम्हाला तुमचे दात दीर्घकाळ टिकवायचे असतील, तर तुम्ही कडुलिंब, लवंग, तुळस यांसारख्या नैसर्गिक घटकांनी भरलेली हर्बल टूथपेस्ट वापरा. ही टूथपेस्ट अँटीबॅक्टेरियल आणि सूज कमी करणाऱ्या गुणांसाठी ओळखली जाते. कडुलिंबावर आधारित हर्बल टूथपेस्टवर झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासातही ती प्रभावी असल्याचे आढळले आहे. ही टूथपेस्ट दातांच्या इनॅमलला मजबूत करते आणि दातांचे आरोग्य चांगले ठेवते. दातांच्या इनॅमलचे संरक्षण आणि दात निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून किमान एकदा फ्लोराइड टूथपेस्ट वापरा आणि हिरड्यांची काळजी व तोंड ताजेतवाने ठेवण्यासाठी हर्बल टूथपेस्ट वापरा.