नियमित योगासने व ध्यानधारणेमुळे मेंदूची कार्यक्षमता तसेच ऊर्जापातळी वाढते, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. हठयोग ही योगाची पद्धत पाश्चात्य देशातही वापरली जाते, त्यामुळे हे शक्य होते असे सांगण्यात आले. यात शरीराच्या विविध अवस्था व श्वसनाच्या पद्धती यांचा समावेश होतो. माइंडफुलनेस प्रकारच्या ध्यानधारणेने विचार, भावना व संवेदना यांचे निरीक्षण केले जाते व माणसाचा खुलेपणा तसेच स्वीकार्यता वाढते. रोज हठयोग व माइंडफुलनेस ध्यानधारणा केल्यास मेंदूची बोधनक्षमता वाढते तसेच भावनिक प्रतिसादानुसार लगेच क्रिया करण्याचे प्रमाण कमी होते. सवयीचे विचार व कृती यापासून मुक्ती मिळते. हठयोग व ध्यानधारणेमुळे मेंदूची संस्कारक क्षमता वाढून अनावश्यक माहितीवर विचार करण्याची सवय कमी होते, असा दावा कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक पीटर हॉल यांनी केला आहे. रोजच्या जीवनात चांगल्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता त्यामुळे वाढते. २५ मिनिटे हठयोग तसेच २५ मिनिटे ध्यानधारणा केल्यानंतर २५ मिनिटे वाचन केले असता त्याच्या आकलन क्षमतेत फरक पडला. किंबर्ले लू हे या संशोधनाचे प्रमुख लेखक असून त्यांनी म्हटले आहे की, ध्यानधारणेमुळे बोधनक्षमता वाढते. जर्नल माइंडफुलनेस या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ऊर्जापातळी वाढवण्यासाठी हठयोग व ध्यानधारणा गरजेची आहे, तर हठयोगाचा परिणाम यात जास्त प्रमाणात होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga and meditation improve brain function
First published on: 07-09-2017 at 01:19 IST