3 Calming Yoga Poses For Work Stress Relief : नोकरीचं ठिकाण हे आता पूर्वीपेक्षा जास्त तणावपूर्ण बनतं आहे. ऑफिसमधील सततच्या मीटिंग, ई-मेल, टार्गेट अशा गोष्टींमुळे लोक त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कामाच्या तणावामुळे मन एकाग्र होऊ शकत नाही.अशा प्रकारे विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे चिंता आणि नैराश्यदेखील येते.

सतत लॅपटॉपसमोर बसणे, डेडलाइनचा दबाव व कामाचा वाढता ताण यांमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही योगासने करून आराम मिळवू शकता. योगा केल्याने मानसिक शांती मिळते आणि ताण देखील कमी होतो. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही तुम्ही ही योगासने करू शकता. त्यामुळे तुम्हाला तत्काळ आराम मिळण्यास मदत होते.

ऑफिसमधील कामामुळे आलेला ताण कमी करण्यासाठी फॉलो करा ‘ही’ योगासने (Work Stress Relief Yoga Poses)

शवासन

शवासन, ज्याला सामान्यतः शवमुद्रा, असेही म्हणतात. त्यामुळे शरीर आणि मनालाही आराम मिळतो, मानसिक ताणदेखील दूर होतो. हे योगासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर पाठीवर झोपा, आता तुमचे हात आणि पाय एकमेकांपासून थोड्या अंतरावर पसरवा. आता डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. यादरम्यान शरीर सैल सोडा. ७ ते १० मिनिटे या स्थितीत राहा आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा.

बालासन

बालासनाने तुम्ही सहजपणे तणाव कमी करू शकता. या योगासनामुळे पाठ, मान आणि खांद्यावर जमा झालेला ताण सहज निघून जातो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम गुडघ्यावर बसा आणि हळूहळू शरीर पुढे वाकवा. आता तुमचे कपाळ जमिनीवर ठेकवा. तुमचे हात सरळ एका लेव्हलने पुढे न्या. या स्थितीत दोन ते तीन मिनिटे राहा आणि हळूहळू श्वास घ्या व सोडा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भ्रमरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायाम दिवसभराचा थकवा आणि ताण कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे चिंता कमी होते, मनाला शांती मिळते. हे आसन करण्यासाठी आधी आरामात बसा आणि डोळे बंद करा. आता दोन्ही हातांच्या बोटांनी कान बंद करा. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि मधमाशीचा आवाज करा. तुम्ही हे आसन १०-१२ वेळा पुन्हा करू शकता.