हृदय शस्त्रक्रिया तसेच पोटाच्या शस्त्रक्रियांनंतर रुग्णांनी काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊया-
हृदय शस्त्रक्रियेनंतर..
’ ‘कार्डिअ‍ॅक प्रोसिजर्स’ व प्रत्यक्ष हृदय शस्त्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. हृदयात स्प्रिंग घालण्याची प्रक्रिया- म्हणजे ‘अँजिओप्लास्टी’, हृदयाला असलेले भोक छत्रीसारख्या उपकरणाने बुजवणे अर्थात- ‘डिव्हाइस क्लोजर’, हृदयाचे ठोके योग्य पडत नसतील तर तो वेग इलेक्ट्रिक शॉक देऊन ताळ्यावर आणण्याचे ‘इलेक्ट्रिकल अ‍ॅब्लेशन’ आणि हृदयात पेसमेकर बसवणे या गोष्टी प्रत्यक्ष कापाकापीच्या शस्त्रक्रियांमध्ये मोडत नाहीत.
’ या कार्डिअ‍ॅक प्रोसिजर्सनंतर फार वेगळी काही काळजी रुग्णाला घ्यावी लागत नाही. कार्डिअ‍ॅक प्रोसिजर्समध्ये जांघेतील रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत रबराची नळी सरकवली जाते आणि त्या आधारे प्रोसिजर केली जाते. अशा प्रकारे प्रोसिजर केल्यास ज्या पायातून नळी घातली त्या पायाला किमान ६ तास पूर्ण विश्रांती देण्यास व पाय न हलवण्यास सांगितले जाते. त्या ठिकाणी रक्त साकळत नाही ना, गाठ होत नाही ना व पायाच्या रक्त वाहिनीत खालपर्यंत ठोके लागतात की नाही, याकडे लक्ष ठेवले जाते.
’ प्रत्यक्ष कापाकापी जिथे केली जाते त्या हृदय शस्त्रक्रिया म्हणजे बायपास शस्त्रक्रिया, झडप बदलण्याची शस्त्रक्रिया आणि जन्मजात हृदयरोगावरील शस्त्रक्रिया या आहेत.
’ कापाकापीच्या हृदयशस्त्रक्रियांमध्ये प्रामुख्याने छातीचे मधले हाड उभे कापून बाजूला सरकवतात व हृदयावर शस्त्रक्रिया करतात. २ ते ५ टक्के शस्त्रक्रिया या दोन बरगडय़ांमध्ये कापून केल्या जातात.
’ ‘ओपन हार्ट सर्जरी’नंतर तिथले कापलेले हाड वायरींनी जोडले जाते. जखम भरून येताना त्याला विश्रांती लागते. श्वास घेताना ते हाड काही प्रमाणात हालत असते. त्याची हालचाल वाढू नये म्हणून शस्त्रक्रियेनंतर ६ आठवडय़ांपर्यंत वजन उचलू नये, लहान मुलांना खेळवायला अंगावर खेळवू नये व दुचाकी वा चारचाकी चालवू नये. साधारणत: ६ ते ८ आठवडय़ांमध्ये हाड जुळून येते.
’ हात वर-खाली न केल्यास हाताचे सांधे कडक होऊ शकतात. त्यामुळे हृदय शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपीने सांगितलेले व्यायाम करणे गरजेचे.
’ खोकला वा शिंक आल्यास एखादी उशी मिठी मारल्यासारखी धरून मग खोकावे वा शिंकावे. ही सर्व काळजी ६ ते ८ आठवडय़ांपर्यंत घ्यावी लागते.
’ शस्त्रक्रियेच्या जखमांना फुगीरपणा येत नाही ना, रक्त साकळत नाही ना, पू-पाणी होत नाही ना, जखम उघडत नाही ना याकडे लक्ष ठेवून लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
’ बायपास शस्त्रक्रियेनंतर किंवा कार्डिअ‍ॅक प्रोसिजर्सनंतरही नियमित तपासणी गरजेची असते. यात कोलेस्टेरॉलचे सर्व घटक तपासून त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. बायपास एकदा झाली म्हणजे पुढे काही काळजी नकोच असे नाही.
’ शस्त्रक्रियेनंतर रक्तपातळ करण्याच्या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतात व त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने न चुकता घ्याव्यात. ज्यांना मधुमेह वा उच्च रक्तदाब आहे त्यांनी त्या आजारांवरील उपचारही नियमित व न चुकता घ्यावेत. दर ६ महिन्यांनी ‘इकोकार्डिओग्राम’ तपासणी करणे गरजेचे. त्यात हृदयाचा स्नायू नीट चालत नसल्याचे आढळले तर पुढच्या तपासण्या व उपचार गरजेचे ठरतात. हीच काळजी अँजिओप्लास्टीनंतरही घ्यावी लागते.
’ झडपांच्या शस्त्रक्रियांमध्ये दोन प्रकारच्या झडपा बसवल्या जातात. साधारणत: ६५ वर्षे वयाच्या आतील रुग्णांमध्ये धातूच्या कृत्रिम झडपा बसवल्या जातात. या झडपांना रक्त पातळ ठेवण्याचे औषध घ्यावेच लागते. रक्ताचा पातळपणा तपासण्यासाठी ‘प्रोथ्राँबिंग टाइम’ तपासणी अर्थात ‘पिटी टेस्ट’ करावी लागते व त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे लागते.
’ हृदयशस्त्रक्रिया केलेल्या दाताची प्रक्रिया वा मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया अशा काही आजाराची शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यांना विशिष्ट प्रकारे प्रतिजैविके देणे गरजेचे ठरते.
’ सर्दी- खोकला- पडसे या रोगांच्या रुग्णांपासून शस्त्रक्रिया झालेल्यांनी दूर राहावे.
– डॉ. अविनाश इनामदार,
हृदयरोगतज्ज्ञ

पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर..
hlt04’आतडय़ाच्या किंवा पोटाच्या कोणत्याही शस्त्रक्रियांनंतर त्या ठिकाणी घातलेल्या टाक्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. ती जागा भिजली तर त्याचे नियमित ड्रेसिंग करणेही गरजेचे.
’ रुग्णाने पोटाच्या शस्त्रक्रियांनतर टाके काढल्यानंतरच- म्हणजे ८ ते १० दिवसांनी आंघोळ सुरू केलेली चांगली. जंतूसंसर्ग टाळण्यासाठी त्याचा फायदा होतो. ‘वॉटरप्रूफ ड्रेसिंग’ हा एक पर्यायही उपलब्ध झाला आहे, मात्र शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठराविक दिवसांनीच आंघोळ सुरू करावी.
’ जोपर्यंत टाके काढले जात नाहीत व जखम भरत नाही तोपर्यंत- म्हणजे साधारणत: शस्त्रक्रियेनंतर महिनाभर जड वजन उचलणे टाळावे. या काळात कोणताही अति हालचालीचा वा अति ताणाचा व्यायाम टाळावा. शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीने केली असेल तर बरे होण्याचा वेग अधिक असतो. त्यामुळे अशा शस्त्रक्रियेनंतर काही हालचाली वा फिरायला जाणे या गोष्टी करण्यास हरकत नाही. पण यातही व्यायामासारख्या हालचाली साधारणत: १५ दिवसांनंतरच सुरू करण्यास सांगितले जाते.
’ आतडे वा जठराच्या शस्त्रक्रियांनंतर जेवणाचेही पथ्य पाळावे लागते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिके, मसालेदार नसलेले अन्न खाणे बरे. रुग्णाने पातळच पदार्थ घ्यावेत की पातळसर ‘सेमीसॉलिड’ खावे या सूचना डॉक्टर त्या-त्या रुग्णाच्या प्रकृतीनुसार देतात. पित्ताशय, हार्निया वा यकृताच्या शस्त्रक्रियेनंतर तुलनेने पथ्ये कमी असतात.
’ अनेक जण पोटाच्या शस्त्रक्रियांनंतर भात, बटाटा, केळी खाऊ नये, त्यामुळे जखमेत पू होतो, असे सांगतात. पण त्यात तथ्य नाही. पूर्वी मधुमेहाचे निदान आताएवढे सहज नव्हते, रुग्णाला मधुमेह असल्याचे कळले नाही आणि रक्तातील साखर वाढून जखमा चिघळल्या, असे होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही पथ्ये पाळली जात. त्यामुळे मधुमेह नसेल तर पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही भात, केळे, बटाटा वगैरे पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्याने खाता येऊ शकतात.
’ उलटय़ा- जुलाब, बद्धकोष्ठ अशी लक्षणे शस्त्रक्रियेनंतरच्या काळात दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. एखादी उलटी झाल्यास लगेच घाबरुन जायला हवे असे नाही, पण वारंवार उलटय़ा वा वारंवार जुलाब होत असतील तर मात्र डॉक्टरांना भेटणे गरजेचे. शौचाला होण्यासाठी वा शौचाला कमी होण्यासाठी स्वत:च्या मनाने औषधे घेणे टाळावे.
’ पोटातील वायूबाहेर न पडणे, पोट फुगणे किंवा पोटात अचानक खूप दुखायला लागणे यातही लगेच डॉक्टरांकडे जावे.
’ पोटाच्या शस्त्रक्रियांनतरजखमेच्या जागी व आत घातलेल्या टाक्यांना आधार मिळावा यासाठी रुग्णाला पोटावर आधाराचा पट्टा घालायला दिला जातो. अनेक रुग्ण तो घालत नाहीत, पण तसे करु नका. डॉक्टरांनी सांगितले असेल तेवढा काळ- म्हणजे शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे १५ दिवस हा पट्टा दिवसभर घालावा व रात्री झोपायच्या वेळेस काढून ठेवला तरी चालू शकतो.
’ हार्नियाची शस्त्रक्रिया पारंपरिक पद्धतीने वा लॅप्रोस्कोपिक पद्धतीने केली असेल तरी महिनाभर घाम आणणाऱ्या हालचाली टाळाव्यात. रुग्णाला चालण्यास काही हरकत नसली किंवा एकाद्या वेळा जिना चढणे- उतरणे हे चालत असले तरी या काळात व्यायाम शक्यतो नको. दुचाकी, चारचाकी वाहन चालवणेही टाळलेले बरे.
– डॉ. संजय कोलते, उदररोगतज्ज्ञ
sanjaykolte@yahoo.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप