18 February 2019

News Flash

पोटदुखी

काही मुलांमध्ये पोटदुखीसाठी अन्नघटकांची अ‍ॅलर्जी, अपचन कारणीभूत ठरते.

(संग्रहित छायाचित्र)

बालआरोग्य

डॉ. तृप्ती महात्मे

‘आई माझे पोट खूप दुखतेय, मी आज शाळेत जाणार नाही,’ दहा वर्षांची पियू आईला कळवळून सांगत होती. तिचा चेहरा बघून आई-बाबांना चिंता वाटायला लागली. गेल्या महिन्यापासून पियू पोटदुखीमुळे तिसऱ्यांदा शाळा बुडवत होती. त्यांना वाटणारी चिंताही रास्तच होती. कारण काही दिवसांपूर्वीच पियूच्या आईने पोटदुखीसंदर्भात माहिती मिळवली. बालआरोग्य. ती माहिती खरी आहे. हा पोटदुखीचा त्रास अगदी तान्हुल्या वयापासून ते पौगंडावस्थेतल्या मुलामुलींमध्ये केव्हाही होऊ शकतो आणि आम्हा बालरोगतज्ज्ञांनाही त्याचे निदान करणे कधी कधी आव्हानात्मक ठरते.

घरात जन्मलेले तान्हे बाळ जेव्हा दोन-तीन आठवडय़ाचे होते, तेव्हा एके  दिवशी संध्याकाळी अचानक किंचाळून रडायला लागते. पाय पोटावर घेऊन कण्हायला लागते. बाळाचे हे रडणे दोन-तीन तास चालूच राहते आणि तेव्हा ते दूधही पीत नाही. बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर तपासणीअंती डॉक्टर तुम्हाला सांगतील की हे रडणे पोटदुखीमुळे आहे. याच्यावर औषधांचा खूप परिणाम होणार नाही. हा त्रास बाळाला वारंवार होऊ शकतो व चार महिन्यांनंतर तो आपोआप बंद होईल. दरम्यान, पालकांनी काही धोक्याची लक्षणे आढळल्यास (जसे की पोट फुगणे, शीमधून रक्त जाणे, बाळ सुस्तावणे) लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. लहान मुलांमध्ये वयोगटानुसार पोटदुखीची कारणे वेगवेगळी असतात. त्यामधील जंतूसंसर्ग (जिवाणू, विषाणू, अमिबा) आणि अन्नातून विषबाधा कोणत्याही वयात होऊ शकतो. पोटदुखीबरोबरच जुलाब, उलटय़ा, ताप ही लक्षणे त्यामध्ये जाणवतात. हे टाळण्यासाठी बाहेरचे, उघडय़ावरचे अन्नपदार्थ मुलांना देऊ नयेत. पावसाळ्याच्या दिवसात लहानग्यांना पाणी उकळून द्यावे. जुलाबामध्ये औषधोपचारांबरोबर क्षारसंजीवनी देऊन अतिसाराचा धोका टाळावा. बद्धकोष्ठता हे एक वरचेवर आढळणारे पोटदुखीचे कारण आहे. ते टाळण्यासाठी मुलांना सकस आणि तंतुमय पदार्थानी युक्त आहार घेण्यास आणि भरपूर पाणी पिण्यास प्रोत्साहित करावे. आहारामध्ये फळे व भाज्यांचा समावेश करावा. जंकफूड (नूडल्स, मैद्याची बिस्किटे, पाव, ब्रेड, बर्गर, चिप्स) यांचे सेवन टाळावे. याबरोबर काबरेनेटेड कोल्ड्रिंक्स, फळांचे तयार रस, अतितेलकट, तूपकट, तिखट पदार्थ मुलांपासून लांबच ठेवावेत. दिवसातील एक-दोन तास तरी मुलांनी बाहेर खेळले पाहिजे वा व्यायाम केला पाहिजे.

काही मुलांमध्ये पोटदुखीसाठी अन्नघटकांची अ‍ॅलर्जी, अपचन कारणीभूत ठरते. अंडी, मासे, गाईचे दूध, शेंगदाणा, काजू, सोयाबीन हे काही अ‍ॅलर्जीकारक सर्वसामान्य घटक आहेत. यामध्ये पोटदुखीबरोबर गॅस, उलटय़ा, जुलाब, अंगावर पुरळ येऊन खाज येणे आणि काही त्रास संभवतात. अ‍ॅलर्जी असल्यास योग्य ते औषधोपचार घेऊन संबंधित पदार्थाचे सेवन टाळावे, तसेच दूध व फळांचा रस अतिप्रमाणात टाळावा.

काही मुलांमध्ये हा पोटदुखीचा त्रास वारंवार होतो. याचे कारण सापडत नाही. या मुलांच्या वाढीवर वा रोजच्या दिनक्रमावर याचा परिणाम होतो. शाळा व घरामध्ये काही अडचण असल्यास अगदी तीन ते आठ वयोगटांतील मुलेही मानसिक ताण, तणावाखाली असतात. ज्याचे रूपांतर पोटदुखीमध्ये होते. यालाच ‘फंक्शनल अ‍ॅबडोमिनल पेन’ म्हणतात. पालकांनी मुलांसमोरच पोटदुखीचा बागुलबुवा न करता मुलांचे लक्ष दुसरीकडे वळवावे. मुलांचा दैनंदिन उपक्रम नियमितपणे सुरू ठेवावा. शाळेत आणि घरामध्ये असलेल्या तणावयुक्त बाबींचा शोध घेत शाळेतील शिक्षक व मुलांशी सुसंवाद साधत यातून मार्ग काढावा. पोटदुखीबरोबर होणाऱ्या त्रासांकडे पालकांनी लक्ष देऊन डॉक्टरांच्या निदर्शनास आणावेत.

धोक्याची सूचना देणारी लक्षणे

* पोट फुगणे, शौचास न होणे, वारंवार उलटय़ा होणे

* हिरव्या, चॉकलेटी, काळपट रंगाच्या उलटय़ा होणे

* पोट कडक होणे

* कावीळ होणे

* शौचामधून रक्त जाणे (शौचास लाल, तपकिरी, काळपट होणे)

* लघवीला दरुगधी येणे, थेंब थेंब लघवी होणे, जळजळ होणे, लघवीवाटे रक्त जाणे

* अंगावर पुरळ येणे, सांधेदुखी-सांध्याना सूज येणे

* वजन कमी होणे, वाढ योग्य रीतीने न होणे

* पोटाला मार लागणे

* श्वास घेण्यास त्रास होणे

ही सर्व लक्षणे गंभीर स्वरूपाच्या आजाराची सूचना देणारी आहेत. या आजारांमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे असते, तसेच काही आजारांमध्ये शस्त्रक्रियेचीही गरज भासू शकते.

 पोटदुखीसाठी डॉक्टर कोणत्या तपासण्या सांगू शकतात?

* रक्त तपासणी

* लघवी-संडासची तपासणी

* पोटाचा एक्सरे

* पोटाची ‘अल्ट्रा सोनोग्राफी’

* काही विशेष तपासण्या (एण्डोस्कोपी, कोलोनोकोपी)

First Published on August 7, 2018 4:02 am

Web Title: article about child health