12 December 2017

News Flash

पिंपळपान : गवती चहा

महाराष्ट्रात गवती चहा सर्वत्र सहजपणे उगवतो वा मुद्दामहून परसबागेत लावला जातो.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: July 6, 2017 12:26 AM

 

जम्बीरापाचनस्तीक्ष्ण: कृमिवातकफावह:।

सुरभिर्दीपनो रूच्या मुखवैशद्यकारक:।   (सु. सू. अ. ४६)

जेव्हा एखाद्या रुग्णाला सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी किंवा आमवातासारखा खूप दु:ख किंवा जखडणे व सुजेचा त्रास होतो, त्यावेळेस बहुतेक वैद्य मंडळी, बहुधा महानारायण तेल, चंदनबलालाक्षादि तेल किंवा शतावरी तेलाचा वापर संबंधित अवयवाला चोळण्यासाठी करावा, असे आवर्जून सांगतात, पण प्रत्यक्षात दहापैकी एका रुग्णाला असे तेल लावल्याने फायदा होण्यापेक्षा ‘माझे दु:ख तेल लावल्याने वाढले,’ असेच गाऱ्हाणे ऐकू येते.

अशा आमवाताच्या रुग्णाला चार भाग कोणतेही अभ्यंग तेल आणि एक भाग गवती चहाचा अर्क मिसळून वापरल्यास सत्वर गुण मिळतो, असा नेहमीचा अनुभव आहे.

गवती चहाला सुगंध भूतृण (संस्कृत), अग्याघास, गंधबेना (हिंदी), हरिचांय (सिंधी), गंधतृण (बंगाली), लेमनग्रास (इंग्रजी) अशा विविध नावांनी संबोधले जाते. या झाडाची लागवड करतात. त्याची पाने व तेल औषधात वापरतात. एकेकाळी आपल्याकडे सिंगापूर व श्रीलंकेतून गवती चहा तेल आयात होत असे. आता उत्तम दर्जाचे गवती चहा तेल केरळमधून येते. तेथील गवती चहाची पाने तुलनेने मऊ, आकर्षक, पिवळसर हिरवट रंगाची असतात. तेलाचे प्रमाण जास्त असते. महाराष्ट्रात गवती चहा सर्वत्र सहजपणे उगवतो वा मुद्दामहून परसबागेत लावला जातो. महाराष्ट्राच्या राहुरी कृषी विद्यापीठात मुद्दामहून गवती चहाची लागवड केली जाते आणि त्याच्या पानांपासून गवती चहा तेल मोठय़ा प्रमाणावर काढले जाते.

गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे. पित्त प्रकृतीच्या मंडळींना गवती चहाचे तेल जसेच्या तसे लावल्यास काही वेळ पुरळ येते. श्री सुश्रुताचार्यानी गवती चहाचा समावेश शाक वर्गात आणि श्री चरकाचार्यानी हरीत वर्गात केला आहे. सुश्रुतसंहितेमध्ये ‘जम्बीर’ या नावाने फलवर्गात उल्लेख आहे. श्री चरकाचार्यानी ‘दन्तशठ’ या नावाने उल्लेख केलेला आहे. गवती चहा हाताने चोळल्यावर एक विशेष जम्बीर प्रकारचा सुगंध येतो, म्हणून त्याला जम्बीर असे नाव पडले आहे. ओला चहा हे उत्तम औषध आहे. सर्दीत, पडशांत किंवा प्राकृत ज्वरांत याचा चहा व काढय़ाचा वाफारा फार हितकारी होतो. आमांशात काही टिकत नाही अशा वेळी हे मौल्यवान औषध आहे.

पोट बिघडले असल्यास गवती चहा उकळून दिलेल्या पाण्याने उलटी थांबते, पोटाची व एकूण आरोग्य सुधारते. ज्यांना थंडी वाजून ताप येतो व आकडी येते, त्यांच्यासाठी गवती चहा उकळून पाणी द्यावे, आकडी थांबते. हट्टी तापात जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा. त्यामुळे पोट सुधारून वायू कमी होतो. गवती चहाच्या अर्कास ‘ऑइल ऑफ व्हर्बेना’ किंवा ‘इंडियन मेलिसा ऑइल’ असेही संबोधतात.

First Published on July 6, 2017 12:26 am

Web Title: cymbopogon citrates information