मनुष्याला आणि प्राण्याला व्याधी व व्याधी अनुरूप लक्षणे निर्माण झाल्यास त्याच्या दैनंदिन आहार-विहाराचे निश्चित आणि नेमके नियोजन केल्यास त्यावर विजय मिळवणे अधिक सुखकर होते. व्याधी निर्माण होताना आहार-विहाराचा महत्त्वाचा भाग असतो हे प्रथम जाणून घ्यायला हवे. आपली आरोग्य राखण्याची प्रतिकारक्षमता यावर अवलंबून असते. आपला आहार आणि विहार हेच शरीरातील दोष वाढवतात आणि कमीही करतात. आयुर्वेद शास्त्रात पथ्य-अपथ्याचा नियम व्याधी नाशासाठी नव्हे, तर व्याधी न होण्यासाठी सांगितला आहे. प्रत्येक आहारामध्ये शरीरपोषणाची मूल्ये असतात तर विहारामध्येदेखील ती दडलेली असतात.

आयुर्वेदशास्त्र वात, पित्त, कफ हे शरीराला धारण करणारे मानतात. शरीर सुस्थितीत राखण्यासाठी या तिन्ही दोषांचा (प्राकृत) वाटा असतो. हे तिन्ही प्राकृत दोष साम्यस्थितीत असणे म्हणजे आरोग्य तर या दोषांचा समतोल बिघडणे म्हणजे व्याधी अवस्था निर्मितीकडे शरीराचे पडलेले पाऊल. आहारातील प्रत्येक अणूमध्ये शरीरपोषक तसेच मनोपोषक गुण असतात हे आयुर्वेद शास्त्राने वर्णन केले आहे. म्हणजेच आपला आहार-विहारच शरीर पोषित करत असतो, वाढवत असतो. म्हणूनच विशिष्ट आहाराला विशिष्ट वेळी महत्त्वाचे स्थान आहे.

प्रत्येक व्याधी निर्माण होताना त्या व्याधीला पोषक गुण प्राप्त होत असतात. म्हणूनच त्या आहारसेवनाने वा विहाराने व्याधी वाढते. या व्याधीचे पोषक वातावरण नष्ट केल्यास व्याधी कमी होते, नष्ट होते. व्याधी वाढल्यानंतरही आहार-विहाराची योग्य जोड औषधांबरोबर दिल्यास व्याधीची पुनर्निर्मिती होत नाही. व्याधीची तीव्रता कमी होण्यास साथ लाभते. प्रत्येक व्याधीची पथ्ये आणि अपथ्ये आयुर्वेदशास्त्राने उल्लेखली असून आज त्याला ‘डाएट’ असा शब्द आहे. आयुर्वेदशास्त्राने पथ्य संकल्पनेचा विचार हा संख्यात्मक करण्यापलीकडे गुणात्मक केला आहे. आहाराच्या गुणात्मक तत्त्वांचा विचार कदाचित आजच्या आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये वेगळा असू शकेल, परंतु नेमका ठरतो हे अनुभवातून दिसून येते. निरोगी राहण्याच्या हेतूने ऋतुचर्या, दिनचर्या ही आयुर्वेदशास्त्रातील वैशिष्टय़े आहेत. कारण यामध्ये निरोगी दीर्घ आयुष्य राहण्यासाठी असलेला मूलमंत्र आहे. ऋतूप्रमाणे आपल्या आहारात बदल केल्याने निसर्गाने ऋतूप्रमाणे केलेले शरीरावरील बदल सहज नियंत्रणात आणता येतात. व्यक्ती, प्रकृतीप्रमाणे आहारातील बदल, शरीर सुदृढ ठेवण्यास मदत करतात. आज वाढणाऱ्या व्याधींच्या संख्येमध्ये पथ्य-अपथ्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. औषधाने व्याधी बरी होईल, पण शरीर सुदृढ करण्यासाठी व व्याधीच्या मुळासह निर्मूलनासाठी आहार व विहाराची योग्य जोड आवश्यकच आहे. पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या व्याधींवर आयुर्वेद शास्त्राच्या या संकल्पनेची साथ हेच उत्तर ठरते. दर पंधरवडय़ाने येणाऱ्या सदरात आपण याची माहिती घेणार आहोत.