18 November 2017

News Flash

पिंपळपान : जास्वंद

जास्वंदीची पाने मृदुस्वभावी स्त्रंसन आहेत.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: September 7, 2017 1:40 AM

‘जपा संग्राहिणी केश्या रक्तप्रदरनाशिनी। कृष्णगवीमूत्रयुतै:

पिष्टैरालेपितैर्जपाकुसुमै:।

शतमखलुप्तं नश्यति भवन्ति

केशाश्च तत्र चना:।।’’ (रा. म.)

वाचक मित्रहो, आपण कधी कोकणातील दापोली शहराला भेट दिली तर अवश्य श्री अमृते या ‘जास्वंदवेडय़ा’ माणसाची भेट घ्यावी. दापोलीजवळील त्यांच्या विस्तीर्ण शेतजमिनीत दिडशे विविध प्रकारची जास्वंदीची झाडे आहेत. मी स्वत:

११५ झाडांची मोजदाद केली आहे. जास्वंदीला जपा, जासुद, जोबा, दसणे, दासणिगे, दासन चेट्टे अशा विविध नावांनी संबोधले जाते.

जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्यांच्या रसात कागद बुडवून सुकवला म्हणजे कागदावर निळसर-जांभळा रंग चढतो. हा लिटमस पेपरऐवजी द्रावकाम्ल ओळखण्यास उपयोगी पडतो. फुलांचे सरबत ज्वरांत आणि मूत्रकृच््रछांत गुणावह आहे. जास्वंदीची पाने मृदुस्वभावी स्त्रंसन आहेत. याच्या लेपाने सुजलेल्या भागास नरमपणा येतो आणि वेदना कमी होतात. कळे रक्तसंग्राहक, वेदनास्थापन व मूत्रजनन आहेत. साल स्नेहन व रक्तसंग्राहक आहे. ताजी फुले वाटून केसास नीट चोळल्यास त्यांचा रंग सुधारतो व नीट वाढ होते. परम्यांत व धुपणींत कळे देतात. रक्तप्रदरावर मुळाची साल देतात. हे औषध नेहमीच लागू पडतेच असे नाही. जास्वंदीच्या फुलांचा फांट ज्वरांत उपयुक्त आहे.

युनानी मतानुसार जास्वंद म्हणजे हिंदी भाषेत गुडहल. ही समशीतोष्ण वनस्पती आहे. जास्वंदीचे फूल एकाच वेळेस हृदय व मेंदूला बल देते. उन्माद विकार, रक्तदुष्टी, पूयमेह अशा विकारांत फुलांचा स्वरस तात्काळ गुण देतो. जास्वंदीच्या फुलांचा गुलाबासारखा गुलंकद बाजारात मोठय़ा प्रमाणावर विकला जातो.

‘शर्बत गुडहल’ नावाचे सरबत युनानी चिकित्सक आपल्या रुग्णमित्रांना देतात. त्यासाठी १०० फुलांचा रस व २० कागदी लिंबाचा रस एकत्र करून रात्रभर चिनीमातीच्या किंवा काचेच्या भांडय़ात ठेवला जातो. सकाळी त्यात डाळिंब, संत्रे यांचा रस मिसळून थोडा वेळे मंदाग्नीवर आटवतात. गार झाल्यावर त्यात नाममात्र कस्तुरी, अम्बर व केशर तसेच ताज्या गुलाबांचा अर्क मिसळला जातो. या सरबताच्या सेवनाने ‘दिल और दिमाख’ला खूप ताकद मिळते. उन्माद विकारावर सत्वर मात होते.

हरी परशुराम औषधालयाच्या केसांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या जपाकुसुम तेलात, जास्वंदीच्या फुलांचा मोठाच सहभाग आहे. पूर्वी वर्तमानपत्रामध्ये बंगालमधील एका प्रसिद्ध औषध कंपनीच्या ‘जबाकुसुम तेलाची’ जाहिरात लक्ष वेधून घेत असे.

First Published on September 7, 2017 1:40 am

Web Title: hibiscus flower