अत्यंत अल्पायुषी निर्धाराची, विचारांची यादी करायची झाल्यास नववर्षांला सोडलेल्या संकल्पाला अग्रस्थान मिळेल यात दुमत नसावं. संकल्प आठवडय़ाच्या आत कोलमडून पडतो हा पूर्वानुभव असला तरी ‘चलो एक बार फिरसे’ म्हणत आपण दर वर्षी काही तरी ठरवतोच. पूर्वी कधीही न केलेल्या वा क्वचित केलेल्या गोष्टी आपण नियमितपणे करू हा फाजील आत्मविश्वासच सातत्याने मिळणाऱ्या या अपयशाचे मुख्य कारण आहे. अवास्तव अपेक्षांचे ओझे आपल्याला फार वेळ पेलवत नाही आणि आपले मनसुबे कोसळतात. असा प्रकार बहुतेकांच्या बाबतीत दर वर्षी घडतो. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ  नये म्हणून काही हटके पद्धतीने विचार करू या का?

नियमित व्यायाम, समतोल आहार, धूम्रपान- तंबाखू- मद्यपान थांबवणे आणि घरी वेळेत येणे हे संकल्प मोहिमेचे नेहमीचे अयशस्वी कलाकार. आपण क्षणभर यांना बाजूला ठेवू या.

माझ्या मते संकल्प कशासाठी करायचाय हे आधी ठरवायला पाहिजे. आपले स्वास्थ्य चांगले राहावे, आपल्याला कुठलेही आजार होऊ  नये अशी सगळ्यांची इच्छा असते पण त्यासाठी सरधोपटपणे काही तरी करण्यापेक्षा स्वत:ला जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या काही सवयी तब्येतीच्या कुरबुरींसाठी जबाबदार असू शकतात. तेव्हा त्याचाही विचार करायला पाहिजे. आपल्या शरीराला काय झेपते याचा अंदाजही महत्त्वाचा. तेव्हा पहिला प्रश्न स्वत:ला विचारा- मी निरोगी आहे का? बरेचदा काही किरकोळ तक्रारींकडे आपले दुर्लक्ष होते किंवा त्या तक्रारी आपल्याला तेवढय़ा महत्त्वाच्या वाटत नाही, परंतु त्याच तक्रारी येऊ  घातलेल्या एखाद्या मोठय़ा आजाराची नांदी असू शकते. तेव्हा गेल्या वर्षभरात आरोग्याच्या संदर्भातील वारंवार घडलेल्या घटनांचा आढावा घ्यायला पाहिजे. त्या संदर्भात वैद्यकीय सल्ला घेतला नसल्यास आपल्या डॉक्टरांबरोबर चर्चा करा. चालताना, जिना चढतांना थोडा दम लागणे ही एक गंभीर गोष्ट असू शकते. परंतु या तक्रारीबद्दल डॉक्टरांना सांगतांना आजकाल जरा दमायला होतं, असं सांगितल्यास त्याचा अर्थ अशक्तपणा किंवा थकवा असा वाटू शकतो. त्यामुळे कुठलाही संकल्प सोडण्याआधी संपूर्ण कुटुंबाची वार्षिक तपासणी करून घ्या. वार्षिक तपासणी म्हणजे भारंभार रक्ताच्या तपासण्या नव्हे तर आपल्या फॅमिली डॉक्टरांबरोबर चर्चा करून गरज असेल तेवढय़ाच चाचण्या करा. बायको जरा जास्तच उजळ गोरी दिसत असेल तर तिच्या गोरेपणाच्या क्रीमचे कौतुक करण्याऐवजी तिचे हिमोग्लोबिन कमी तर नाही ना झाले ते शोधा. आपले वजन, उंची, कमरेचा घेर, रक्तदाब आणि रक्तातील साखर आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रत्येकाला माहीत असायलाच पाहिजे. (उंची सेंटिमीटरमध्ये उणे १०० – योग्य वजन, कमरेचा घेर पुरुषांचा ९० सेंटिमीटर आणि स्त्रियांचा ८० सेंटिमीटर असावा आणि रक्तदाब १२०/८०) आरोग्याची ही परिमाणे माहिती असतील, तर व्यायाम, आहाराबद्दल नीट विचारपूर्वक नियोजन करता येते. नवीन वर्ष सरलेल्या वर्षांपेक्षा जास्त चांगले आनंदी होईल, असा निर्धार करा आणि ‘त्यासाठी कायपण’ करण्याची तयारी करू या.

हात स्वच्छ धुवावेत..

वारंवार पोटाच्या तक्रारी उदाहरणार्थ पोटदुखी, अपचन, अ‍ॅसिडिटी- बहुतेक वेळा याची कारणे आपल्या जीवनशैलीत दडलेली असतात. उघडय़ावरचे खाद्यपदार्थ खाऊ  नये, शक्यतो कुठलाही पदार्थ खाताना सावकाश चावून खावा, घाईघाईत मोठमोठे घास तोंडात कोंबणे योग्य नाही. या गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली तर अपचन आणि अ‍ॅसिडिटी हे विकार टाळता येतील. आपण घराबाहेर अनेक गोष्टींना कधी नकळत तर कधी गरज म्हणून हात लावत असतो. त्यामुळे असंख्य विषाणू/जिवाणूचा हाताशी संपर्क येतो. अशा दूषित हाताचा नाकातोंडाशी संबंध आल्यास ते अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय आपल्याला अनेक रोगांपासून संरक्षण देते. अगदी क्षुल्लक वाटावा असा हात धुण्याचा संकल्पही अत्यंत आरोग्यदायी असू शकतो.

दोन पावले जास्त टाका..

व्यायाम करण्याचा संकल्प दर वर्षी बारगळतो याचे कारण बहुतेक वेळा मुख्य कारण आळस किंवा व्यायामाबद्दलच्या आपल्या कल्पना. उदाहरणार्थ व्यायाम सकाळीच करावा किंवा मोकळ्या हवेत आणि समुद्रकिनारी फिरायला गेले पाहिजे वगैरे असा विचार करणाऱ्यांना सकाळी वेळेचे नियोजन जमले नाही की व्यायाम ठप्प. फिरण्यासाठी मैदान वा समुद्रकिनारा घराजवळ नसेल तर पहिल्या आठवडय़ातच उत्साह मावळतो आणि पुन्हा व्यायामाचा मुहूर्त पुढच्या १ जानेवारीला . कधी कधी स्वत:बद्दलचा अवास्तव आत्मविश्वास त्रासदायक ठरतो म्हणजे पहिल्याच दिवशी तीन-चार किलोमीटर पळण्याचा व्यायाम, दुसऱ्या दिवशी सक्तीची विश्रांती घ्यायला भाग पाडतो. व्यायामाचा सराव नसेल तर पहिल्या दिवसापासून खूप मोठी झेप घेऊ  नका. चालणे हा उत्तम व्यायाम आहे. सुरुवातीला नेहमीच्या वेगाने फिरायला जावे. मैदानात फिरायला आलेल्या इतरांशी स्पर्धा न केलेली बरी. आठवडय़ाभरात थोडाफार वेग वाढवायला हरकत नाही. आपला व्यायाम अगदी किरकोळ वाटत असला तरी ‘अजिबात नसण्यापेक्षा बरा’ हे नेहमी ध्यानात ठेवलेले बरे. दररोज १०,००० पावले चालणे हे अंतिम उद्दिष्ट असावे ते पहिल्या दिवशी साध्य करण्याचा प्रयत्न टाळावा. आपल्या दैनंदिन वेळापत्रकात चालण्यासाठी सलग वेळ काढणे शक्य नसेल तर हे हप्त्याहप्त्याने करायला काहीच हरकत नाही. फिरायला जागा नाही किंवा निर्धारित वेळ देणे जमत नसेल तर आपल्या रोजच्या कामात प्रायोगिक तत्त्वावर बारीकसारीक बदल करणे शक्य असल्यास तसेही करून पाहावे. उदाहरणार्थ बसने एक स्टॉप आधी उतरावे किंवा लोकलचा दूरचा डबा निवडावा यामुळे बऱ्यापैकी चालणे होते. अर्थात वेळापत्रकात थोडा बदल करावा लागेलच. या बाबतीत कालपेक्षा आज जास्त चांगला करणे हा एकच नियम लक्षात ठेवणे श्रेयस्कर.

खाण्यात थोडा बदल करून पाहा

आहाराच्या बाबतीतही हाच फंडा वापरावा. आपल्याला बदल अंगवळणी पडायला उशीर लागणारच हे गृहीत धरून वाटचाल करणे योग्य. आहाराच्या क्षेत्रात कुठलाही शास्त्रीय आधाराशिवाय छातीठोकपणे माहिती सांगणारे अनेक आहेत. सोबतीला मिनरल्स आणि जीवनसत्त्वाची रेलचेल असलेले आरोग्यवर्धक पेय आणि खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने आपल्या गळी उतरवण्याऱ्या जाहिराती असतातच. या कारणांमुळे योग्य/अयोग्य, चांगले /वाईट ठरवणे फार जिकरीचे होते. आहाराबद्दल शास्त्रोक्त माहिती राष्ट्रीय पोषण संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांतून मिळवावी हे उत्तम. तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, बिस्किट, मैद्याचे पदार्थ आणि जास्त मीठ असलेले पदार्थ आपल्या आहारात अत्यल्प प्रमाणात असतील, अशी काळजी घ्यावी. आपल्याला जास्त खाण्याची सवय लागली आहे, या सवयीचे कमी खाण्याच्या सवयीमध्ये रूपांतर करायचे आहे. विश्वास ठेवा हे अशक्य नाही.

– डॉ. राजेंद्र आगरकर

 ryagarkar@gmail.com