22 September 2020

News Flash

उदरभरण नोहे.! हे ‘जीवन’ किती महत्त्वाचे?

शरीरातील ७० टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे. शारीरिक गरजेनुसार पाण्याच्या प्रमाणात बदल होतो.

शरीरातील ७० टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे. शारीरिक गरजेनुसार पाण्याच्या प्रमाणात बदल होतो. व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करणाऱ्या व्यक्तींना इतरांपेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता असते. वातावरणानुसारही पाणी पिण्याचे प्रमाण बदलते. उन्हाळ्यात घामावाटे पाणी बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी अधिक पाणी प्यावे. या तुलनेत हिवाळ्यात शरीराला कमी पाण्याची आवश्यकता असते. मात्र आत्मपित्त, अल्सर, मलविसर्जनास अडथळा असे आजार असणाऱ्या व्यक्तींनी आहारातील पाण्याचे प्रमाण वाढवावे.

साधे पाणी शरीरातील विषारी पदार्थाचा अंमल कमी करण्याचे काम करते. मूत्रपिंड, त्वचेची स्वच्छता, शरीरातील रोगजंतूचा नाश करणे, नको असलेले घटक मलमूत्राद्वारे शरीराबाहेर टाकण्यासाठी पाण्याची मदत होते. मूत्रपिंडाला योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकले नाही तर शरीरातून मलमूत्र बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. यामुळे मूत्रपिंडावर ताण पडतो. यातून मूत्रपिंडाच्या समस्या, संसर्ग, मूत्रपिंडात पाणी जमा होणे असे अनेक आजार उद्भवतात. त्याशिवाय रक्तदाब, त्वचा संसर्ग यांसारखे जीवनशैलीजन्य आजार सुरू होण्याची शक्यता असते.

याबरोबरच शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालण्यासाठी पाणी महत्त्वाचे असते. योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध झाले नाही तर रक्त दाट होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. रक्ताबरोबरच शरीरातील पेशींमध्ये पाणी आणि खनिजे असतात. पेशींना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही तर त्या शुष्क होतात. आहारात प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्यास पाण्याचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

दिवसाला किती पाणी प्यावे?

साधारणपणे किती पाणी प्यावे, कसे प्यावे, कधी प्यावे याबाबत गोंधळ असतो. यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमात सूत्र देण्यात आले आहे. आपल्या वजनाला तीसने गुणले असता येणारी संख्या इतके मिलिलिटर पाणी शरीराला आवश्यक असते. मात्र व्यायाम करणारे किंवा शरीराची हालचाल अधिक प्रमाणात होत असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवावे. (उदा. ५० गुणिले ३० = १५०० मिलिलिटर-दीड लिटर).

गरम पाणी केव्हा प्यावे?

सकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते यात तथ्य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला गरम पाणी फायदेशीर असेल याची शाश्वती नाही. सर्दी, दमा, खोकला अशा आजारात गरम पाणी फायद्याचे ठरू शकते. अनेकांना गार पाणी प्यायल्यानंतर तहान भागते. गार पाणी आतडय़ात लवकर शोषले जाते आणि तहानेची संवेदना कमी होते. त्यामुळे साध्या पाण्यापेक्षा गार पाण्याने तहान भागते. मात्र गार पाणी शरीरासाठी हितकारक नाही.

* साधे पाणी पिण्याऐवजी भाज्या, फळे (पुदिन्याची पाने, जिरे, काकडी) असे पदार्थ घातलेले पाणी पिणे शरीरासाठी उपयुक्त आहे. शरीराची गरज आणि आजार लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यात हे पदार्थ घालता येऊ शकते. आम्लपित्त असणाऱ्या व्यक्तींनी दर वेळी पिण्याच्या पाण्यात जिरे आणि पुदिन्याची पाने घातली तर शरीरातील पित्ताचे प्रमाण नियंत्रित राहू शकते. 

* पाणीयुक्त फळे, लिंबू पाणी, पन्हे आणि ताक  या पदार्थाचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याचा समतोल राखला जाऊ शकतो. त्याबरोबर संत्री, कलिंगड, किवी, डाळिंब, द्राक्षे ही फळे खावीत. फळांचा ताजा रस घ्यावा, बाहेरील साठविलेल्या फळांचे रस मात्र टाळावेत. सर्दी, कफ, खोकला, घशाचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी संत्री, द्राक्षे अशी फळे दुपारी आणि मर्यादित प्रमाणात खावीत.

* नारळपाणी शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. गोड, मधुर चवीचे पाणी हे शरीरासाठी उत्तम. हे पाणी सकाळच्या वेळी घेणे योग्य आहे. तर सर्दी किंवा कफ असणाऱ्यांनी दुपारच्या प्रहरी नारळपाणी पिणे योग्य. नियमितपणे शहाळ्याचे पाणी घेतल्यास पोटाचे आजार, त्वचा विकार, हृदयरोग, रक्ताच्या समस्या दूर होतात. 

* शीतपेय आरोग्यासाठी घातक आहे, बऱ्याचदा तहान लागली असता किंवा आम्लपित्ताच्या त्रासात शीतपेय घेतले जाते. थंड पेयाने काही वेळ तहान क्षमल्याची भावना येत असली तरी या पेयातील साखर, सोडा आणि घातक रंग हानीकारक असतात. तहान भागवण्याच्या नावावर शरीरात अतिरिक्त गेलेली

साखर स्थूलतेपासून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारापर्यंतच्या आजारांना निमंत्रण देते.

धावनी शाह, आहारतज्ज्ञ

(शब्दांकन – मीनल गांगुर्डे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2016 4:11 am

Web Title: main functions of water in the human body
Next Stories
1 आबालवृद्ध : वृद्धांमधील झोपेची समस्या
2 आयुर्मात्रा : पिंपळी
3 लाळ : किती महत्त्वाची?
Just Now!
X