News Flash

पिंपळपान : खाजकुहिली

खूप वारा सुटल्यामुळे त्या शेंगांची- खाजकुहिलीच्या वरची तुसे त्वचेला चिकटून प्रचंड खाज सुटली होती.

पिंपळपान : खाजकुहिली
(संग्रहित छायाचित्र)

कपिकच्छुर्भृशं वृष्यामधुरा बृंहणी गुरू:। तिक्ता वातहरी बल्यावातपित्तास्त्रनाशिनी (भा. प्र.)

खाजकुहिलीचे गुणकर्म सांगण्याअगोदर माझा एक गमतीदार अनुभव सांगण्याचा मोह मला अजिबात आवरत नाही. मी गेली जवळपास ४० वर्षे सर्वसामान्यांकरिता आयुर्वेदाचे वर्ग चालवत आहे. खूप वर्षांपूर्वी अशाच एका वर्गाची सहल कर्जतजवळील एका जंगलात वनस्पती अभ्यासकांनी नेली होती. आम्ही सर्वजण त्या जंगलातील वनस्पतींचे निरीक्षण करत चालत होतो. एकाएकी सर्वजण आपले अंग खाजवायला लागले. मला एकदम प्रसंगावधानाने सर्वाना सल्ला द्यायचे सुचले. ‘‘दोन्ही हात मागे घ्या, अजिबात खाजवू नका, चालत राहा.’’ लोकांनी ऐकले. पाच मिनिटांनी खाज पूर्णपणे बंद झाली. मी आजूबाजूला बघितले होते. झाडावर कसल्या तरी वेली होत्या. खूप वारा सुटल्यामुळे त्या शेंगांची- खाजकुहिलीच्या वरची तुसे त्वचेला चिकटून प्रचंड खाज सुटली होती.

कपिकच्छु (संस्कृत), कौचा (गुजराती), कवच (हिंदी), कामाच (बंगाली) अशा विविध नावांनी ओळखली जाणारी वेल जंगलात विविध मोठय़ा वृक्षांच्या आधारे वाढते. जळगावजवळील एका लहान गावाच्या माळरानात याच्या बिया वेगळय़ा कशा करतात हे बघायला मी मुद्दाम गेलो होते. तिथे एका प्रचंड खोल आणि विस्तीर्ण खड्डय़ांत खाजकुहिलीच्या शेंगा टाकल्या होत्या. काही काळाने त्या आपोआप फुटणार होत्या. मग हातात खांद्यापर्यंत मोजे घालून त्यातील बिया गोळा केल्या जाणार होत्या.

औषधाकरिता वापरल्या जाणाऱ्या खाजकुहिलीच्या बियांव्यतिरिक्त एक पांढरट, हिरवट रंगाच्या बियांची एक वेगळी जात असते. मुंबईत त्या शेगांची भाजी करतात. त्यांना खाज नसते. कवचबीला आत्मगुप्ता, ऋष्यप्रोक्ता, शूकशिम्बी, मर्कटी, वानरी अशीही नावे आहेत. औषधांत शेंगावरील कुसे, बिया आणि मूळ वापरतात. बिया खूप पौष्टिक आहेत. कुसे उत्तम कृमिघ्न आहेत. मूळ मज्जातंतूव्यूहास उत्तेजक आणि मूत्रजनन आहे.

गोल जंत मरण्यास शेंगेवरचे केस मधातून देतात. एक वेळ एका शेंगेवरचे कुसे खरडून दिल्यास पुरीशी होतात. ज्वरांत भ्रम झाला असल्यास, मज्जातंतूव्यूहाच्या अशक्तपणात मुळांचा काढा द्यावा. महामारीत मुळाचा फांट मधाबरोबर देतात. मुळाच्या काढय़ाने लघवीचे प्रमाण खूप वाढते, म्हणून असा काढा मूत्रपिंडाच्या रोगात देतात. सर्वागास लेप करतात. व्रणावर पाने बांधतात.

कवचबींचा खरा वापर ‘पुरुषत्व गमावलेली मंडळी’ मोठय़ा श्रद्धेने करतात आणि त्यांचा १०० टक्के लाभही मिळतो. त्याकरिता बाजारात कौचापाक हे तयार औषध मिळते. मात्र यासाठी वापरल्या जाणाऱ्या कवचबीच्या शेंगा या भाजीच्या शेंगा असतात, त्यांच्या बाहेरील आवरणाला तुसे नसतात. मात्र खाजकुहिलीच्या शेंगा या जुनाट नसतील ही काळजी अवश्य घ्यायला हवी.

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 2:32 am

Web Title: medicinal importance of cowhage plant
Next Stories
1 ‘कामा’ची गोष्ट : या रोगांमागे दडलंय काय?
2 पथ्य अपथ्य! : आरोग्याची ‘परीक्षा’
3 पिंपळपान : सातू
Just Now!
X