News Flash

पंचकर्म : रजोनिवृत्तीच्या काळातील पंचकर्म

साधारणत: ४५ ते ५५ वर्षे हे स्त्रियांच्या रजोनिवृत्तीचे (मेनोपॉझ) वय असते.

साधारणत: ४५ ते ५५ वर्षे हे स्त्रियांच्या रजोनिवृत्तीचे (मेनोपॉझ) वय असते. कोणतीही इतर आरोग्य समस्या नसताना सलग बारा महिने मासिक पाळी न येणे म्हणजे रजोनिवृत्ती. स्त्रियांच्या शरीरातील स्त्रीबीजकोषात जन्मत:च ठरावीक स्त्रीबीज संख्या असते. वयोमानानुसार स्त्रीबीज संपुष्टात आले की स्त्रीविशिष्ट संप्रेरकेही कमी होतात. परिणामी रजोनिवृत्ती हा कायमस्वरूपी बदल घडून येतो. आयुर्वेदानुसार हा एक नैसर्गिक बदल आहे. त्यामुळे त्या वेळी होणाऱ्या आजारांचे फारसे वर्णन करण्यात आलेले नाही. रजोनिवृत्ती ही मध्यम वय आणि वृद्धावस्था यांना जोडणारा टप्पा असल्यामुळे या काळात पित्त व वात यांच्या आधिक्यामुळे दिसणारी लक्षणे दिसून येतात. परंतु नैसर्गिक रजोनिवृत्ती, गर्भाशयासह स्त्रीबीजकोष निर्हरण शस्त्रक्रियेमुळे आलेली रजोनिवृत्ती आणि चाळिशीच्या आधीच, म्हणजे अकाली आलेली रजोनिवृत्ती यांच्या लक्षणांमध्ये थोडाफार फरक असू शकतो.

रजोनिवृत्तीची स्त्रीविशिष्ट लक्षणे- मासिक पाळी अनियमित होणे वा वारंवार येणे, अधिक वा कमी रक्तस्राव होणे, अकाली रक्तस्राव होणे, योनिशुष्कता, मूत्राशयशैथिल्य, लघवी थांबवता न येणे/ आपोआप लघवी होणे, स्तनांच्या पेशी दुखावणे, स्तनांचा आकार वाढणे इ.

सामान्य लक्षणे- स्थौल्य, रात्रीच्या वेळी घाम येणे, कानातून गरम वाफा निघणे, हातापायाला मुंग्या येणे, छातीत धडधडणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, कंबरदुखी, डोकेदुखी इ.

मानसिक लक्षणे- चिडचिडेपणा, औदासिन्य, शीघ्रकोप, चित्त अस्थिर होणे, एकाग्रता कमी होणे, विसराळूपणा वाढणे, झोप कमी होणे वा न लागणे, शारीरिक संबंधांची इच्छा नसणे इ.

रजोनिवृत्तीच्या काळातील बदलांना सामोरे जाताना आयुर्वेदीय उपचार, रसायन चिकित्सा व पंचकर्माचा आधार घेता येतो. रजोनिवृत्तीकालीन मानसिक लक्षणांवर एक प्रभावी कर्म म्हणजे शिरोधारा, शिरोअभ्यंग, सर्वाग अभ्यंग आणि स्वेदन (स्टीम बाथ). आयुर्वेदात ‘मूर्धतेल’ या संकल्पनेअंतर्गत शिरोपिचू, शिरोबस्ती, शिरोअभ्यंग आणि शिरोधारेचा समावेश होतो.

वजन वाढल्यामुळे सांध्यांवर ताण पडणे, संप्रेरकांच्या बदलाने अस्थींचे पोषण न होणे, यामुळे परिणामत: अस्थींची झीज होऊन कंबरदुखी, गुडघेदुखी, मान दुखणे, हातापायाला मुंग्या येणे, बोटांची पेरे दुखणे, ही लक्षणे दिसतात. यातही वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधी दूध व तुपाची बस्ती घेतल्यास हाडांना फायदा होतो. गुडघ्यांवर तेलाची धार सोडणे (जानुबस्ती), मानेवर किंवा कमरेवर तेलाची धार सोडणे (मन्योबस्ती, कटीबस्ती), औषधी पानांची पोटली करून त्याने शेक घेणे (पत्रपोटलीस्वेदन), औषधी दुधात शिजवलेल्या भाताच्या पोटलीने शेक घेणे यामुळेही सांधेदुखीच्या वेदना कमी होतात.

बस्ती

रजोनिवृत्तीकालीन स्त्रीविशिष्ट लक्षणांवर मात करण्यासाठीचा एक उपाय म्हणजे बस्ती. वैद्यांच्या सल्ल्यानुसार ही बस्ती करून घेतल्यास रजोनिवृत्तीच्या वेळी मासिक पाळीच्या चक्रात आलेली अनियमितता दूर होऊ शकते. गर्भाशयशैथिल्य व मूत्राशयशैथिल्य होऊन ते खाली सरकल्यासारखे वाटल्यास, तसेच योनिशुष्कता असल्यास औषधी तेलाचा पिचू धारण केल्याने फायदा होतो. रजोनिवृत्तीकाळात होणारा अधिक रक्तस्राव, गर्भाशयाला सूज येणे, यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेल्या उत्तरबस्तीचा उपयोग होतो. गर्भाशयमुखाशी सूज असल्यास किंवा गर्भाशयमुखाच्या स्रावांच्या ‘पॅप स्मीअर’ या तपासणीत भविष्यातील कर्करोगाची सुरुवात किंवा संसर्ग असल्यास औषधी काढय़ांनी योनी प्रक्षालन, औषधी तेलाचा पिचू धारण करणे याचा फायदा होतो. मात्र त्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

मसाज

अभ्यंग (मसाज) हा ताणतणावापासून आराम मिळावा यासाठीचा एक पारंपरिक उपाय आहे. आयुर्वेदानुसार डोके, कान व पायांवर नियमित अभ्यंग करण्यास सांगितले आहे. तेलाने मसाज करून स्टीम बाथ घेतल्याने वातप्रकोप दूर होण्यास मदत होते, शिवाय शारीरिक वेदना दूर होऊन ताजेतवाने वाटते. औषधी दुधात शिजवलेल्या भाताची पोटली करून त्याने मसाज केल्यास त्वचा रुक्षपणा दूर होऊन मांसपेशींना बळ मिळते.

शिरोधारा

डोक्यावर- विशेषत: कपाळप्रदेशी दोन्ही भुवयांच्या मध्ये सोसवेल एवढे गरम औषधी काढे, दूध, ताक, तूप, तेल अशा विशिष्ट पदार्थाने ठरावीक कालावधीपर्यंत धारा सोडणे म्हणजे शिरोधारा. झोप न लागणे, अस्थिर चित्त, उच्च रक्तदाब, मानसिक ताणतणाव, चिडचिडेपणा, डोकेदुखी, केसांच्या तक्रारी यासाठी शिरोधारेचा उपयोग होतो. व्याधीनुसार शिरोधारेसाठी वापरण्यात येणारी औषधे बदलतात.

joshi.rt@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 12:39 am

Web Title: reddit on menopause period
Next Stories
1 पिंपळपान : आघाडा
2 टॅटू काढताय?.. काळजी घ्या!
3 पिंपळपान : अशोक
Just Now!
X