या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मातृत्वानंतर रजोनिवृत्तीपूर्व होणाऱ्या अतिरक्तस्रावाची कारणे व उपचार आपण जाणून घेतले. त्यानंतर रजोनिवृत्ती आल्यावर स्त्रीला खरं हायसं वाटतं! रजोनिवृत्ती येणं म्हणजे मासिक पाळी साधारण सलग वर्षभर न येणं. स्त्रीच्या वयाच्या ३९ व्या वर्षांपासून ते ५६ वर्षांपर्यंत ही मासिकपाळी कधीही बंद होऊ शकते. पाळी बंद होण्याचे वय अनुवंशिकतेवर निर्धारित आहे. अशी रजोनिवृत्ती येऊन गेल्यानंतर साधारण दोन-तीन वर्षांनी कधीही कमी वा अधिक प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. वयाच्या ५६ व्या वर्षांनंतर १० टक्के महिलांना असा त्रास होतो.

रजोनिवृत्तीनंतर अतिरक्तस्राव वा रक्तस्राव होण्याची कारणमीमांसा समजून घेतली तर उपचार सुरळीत होऊ शकतात. विशेषत रजोनिवृत्ती नंतर पुन्हा पाळी वा रक्तस्राव होणं ही निसर्गाने दिलेली धोक्याची सूचनाच समजावी. डॉक्टरकडे जाऊन संवाद साधणे, तपासून घेणे ही पहिली पायरी तर तपासण्यानंतर शस्त्रक्रिया व इतर उपचार ही दुसरी पायरी. अनेकदा याबाबतीतील सतर्कता, जागरूकता तुमचं पुढील आयुष्य सुखकर करते.

गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता कधी असू शकते?

  • महिलांना काही कारणास्तव संप्रेरक द्रव्ये घ्यावी लागली तर इस्ट्रोजेन या द्रव्याचा वापर अधिक काळ झाल्यास.
  • स्तनाचा कर्करोग झाल्याने स्त्री रुग्ण टॅमॉस्किफेन औषध घेत असेल तर गर्भाशयाच्या आतील आवरणाचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • महिला अविवाहित आहेत व ज्यांना मूल झाले नाही त्यांना कर्करोगाची शक्यता असू शकते.
  • महिला स्थूल आहेत, मधूमेही आहेत अशा महिलांना अधिकपणे रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या रक्तस्रावाकडे जागरूकतेने लक्ष देण्यास हवे.
  • अनुवांशिकतेच्या नुसार आईला, बहिणीला, आजीला जर स्तनाचा, मोठय़ा आतडय़ाचा वा अंडकोशाचा व गर्भाशयाचा कर्करोग असल्यास त्या महिलेस कर्करोग होण्याची संभावना असते.
  • असा रक्तस्राव झाल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अल्ट्रासोनोग्राफी, रक्तचाचण्या, दुर्बणिीतून तपास व गर्भाशयाच्या आवरणाची तपासणी करणे भाग ठरते. गर्भाशयाची पिशवी साफ करणे (डायलेटेशन व क्युरेटाज) हा पर्याय असून त्यानंतर जो निकाल येईल त्याप्रमाणे गर्भाशय व आजूबाजूच्या ओटीपोटातील लिम्फनोड काढून, पेरीटोनिअल बायोप्सी करणं कधी कधी भाग पडतं.
  • जेव्हा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होतो त्यानंतर पोटाच्या सोनोग्राफी समवेत योनीमार्गातून केलेली सोनोग्राफी अधिक फायदेशीर असते. जर गर्भाशयाच्या आवरणाची जाडी चार मि.मीपेक्षा अधिक असेल तर ती तपासणीसाठी पाठवून शस्त्रक्रियेचा वा इतर उपचारांचा विचार करता येतो. आता दुर्बणिीतून तपास करून म्हणजे हिस्टरोस्कोपी करून जाड असलेल्या आवरणाचा तुकडा तपासणीस पाठवता येतो.

रक्तस्राव होण्याची इतर कारणे

  • एखादी स्त्री रजोनिवृत्तीच्या त्रासामुळे संप्रेरक द्रव्यांचे सेवन करत असेल.
  • योनी मार्गाच्या शुष्कपणामुळे जर योनीमार्गातून रक्तस्राव होत असल्यास त्यावर औषधांनी उपचार होऊ शकतो. काही वेळेस ग्रीवेतून वा गर्भाशयाच्या आतील आवरणातून गाठी तयार होऊन योनीमार्गात येतात व रक्तस्राव सुरू होतो. अशा वेळेस भूल देऊन त्यांची तपासणी करून नक्की त्यात कर्करोग नाही ना याची खात्री करून घ्यावी लागते.
  • काही वेळेस गर्भाशयाचे आवरण वाढत राहतं. अशावेळेस गर्भाशयासमवेत अंडकोश-अंडनलिका-ग्रीवा काढून टाकणं उचित ठरतं.
  • गर्भाशयाचे आवरण सतत वाढत असल्यास एम.आर.आय.ने पुढील उपचारांची दिशा मिळते.
  • रजोनिवृत्तीनंतर होणारा अतिरक्तस्राव दुर्लक्षित रहाता कामा नये पण काही वेळेस स्त्रीरुग्ण आधीच रक्त पातळ होण्याच्या वा रक्तातील गुठळ्या कमी होण्याची औषधे वा तत्सम आजारासाठी औषधे घेत असेल तर अतिउंचीच्या, ऑक्सिजन कमी असलेल्या वातावरणात गेल्यावर काही वेळेस गर्भाशयातून रक्तस्राव होऊ शकतो.

हे लक्षात ठेवा

  • योनीमार्गातून केलेली अल्ट्रासोनोग्राफी गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधी कधी कधी परिपूर्ण निष्कर्ष देऊ शकत नाही.
  • गर्भाशयाच्या आवरणातून रक्तस्राव झाला तरच त्यासाठी गर्भाशयाच्या आवरणाची तपासणी करावी अन्यथा करू नये.
  • काही वेळेस पोटाची सोनोग्राफी करताना ओटीपोटात शंकास्पद लक्षणे दिसल्यास त्याकडे लक्ष द्यावे.
  • गर्भाशयाच्या गाठींचे योग्य निदान करून त्यावर उपचार करायला हवेत.

रजोनिवृत्तीनंतर केलेल्या अल्ट्रासोनोग्राफीत गर्भाशयाच्या आवरणाची जाडी ४-५ मि.मी पेक्षा अधिक असेल तर योग्य तपासणी करून लगेचच उपचार करावेत. सद्यपरिस्थितीत कोणत्याही प्रकारचा गर्भाशयाचा कर्करोग हा व्यवस्थितपणे निदान करून त्या कर्करोगाच्या स्थितीप्रमाणे उपचार होऊ शकतो. यासाठी रजोनिवृत्तीनंतरही स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी सतर्क राहायला हवे.

rashmifadnavis46@gmail.com

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bleeding issue in woman
First published on: 27-08-2016 at 00:43 IST