डॉ. अविनाश गावंडे
विदर्भासह राज्याच्या काही भागांत ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यातून अनेक संसर्ग रोगांची साथ या भागात पसरली असून त्यांपैकीतच एक म्हणजे लेप्टोस्पायरोसिस आहे. मुले, प्रौढ व्यक्तींनी अशा संसर्गापासून होणारी बाधा टाळण्याकरिता विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
लेप्टोस्पायरोसिस हा आजार ‘लेप्टोप्पायरा’ जिवाणूंमुळे होतो व त्याचे रुग्ण प्रामुख्याने पावसाळ्यात अधिक दिसून येतात. पावसाळ्यामध्ये मोकाट जनावरे, चिखल किंवा शेण व तत्सम घटकांच्या संपर्कात आल्यास या जिवाणूचा संसर्क होतो. ते म्हैस, घोडा, बकरी, कुत्रे यांसारखे पाळीव प्राण्यांच्या मूत्रांमधून वातावरणात वाढतात. अनेक महिने पाणी व मातीमध्ये टिकाव धरून राहतात. मानवी शरीरात थेट शिरत नाहीत, तर दूषित अन्न व पाण्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. या आजाराची अनेक लक्षणे असून काहींना
त्वचा संसर्ग, ताप, मूत्रपिंड किंवा यकृत निकामी होणे, श्वसनकार्यामध्ये बाधा, मैनिन्जाईटिस आदीचा त्रास होतो. योग्य उपचार न झाल्यास प्रसंगी रुग्णाचा मृत्यूदेखील ओढवतो. या आजाराचे रुग्ण ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांत आढळून येतात. ग्रामीण भागात शेणाने अंगण सारवणे आणि शहरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधून या आजाराचे जिवाणू शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. साधारणपणे त्याची लक्षणे दोन ते चार आठवडय़ांमध्ये दिसून येतात.
यांना होऊ शकते लागण
- शेतीकाम, गटारांची साफसफाई करणारे, खाणकाम, मासेमारी, प्राण्यांची देखभाल करणारे किंवा या क्षेत्रांशी संबंधित काम करणारे.
- पावसाळ्यात चिखल व दूषित पाण्यात खेळणारी मुले.
- कॅम्पस किंवा आऊटडोअर क्रीडांमध्ये पावसाळ्यात खेळणारे.
- पावसाळ्यादरम्यान दूषित पाणी पिणारे.
- दूषित पाण्यामध्ये लागवड केलेल्या भाज्या व फळांचे सेवन करणारे.
संभावित आजार
अतिसार, कावीळ, मूत्रपिंड निकामी होणे, पल्मलनरी हॅमरेज, कार्डियक, अर्हिथमियस, न्यूपमोनिया व सेप्टिक शॉक. वेळेवर उपचार न केल्यास दीर्घकालीन समस्यांना तोंड द्यावे लागते.
लक्षणे..
- अधिक ताप
- सर्दी, डोकेदुखी, स्नायुदुखी
- थकवा, घसा दुखणे
- पोटात वेदना, ओकारी
- सांधे किंवा स्नायूंमध्ये वेदना
- पुरळ येणे
- डोळे लाल होणे
प्रतिबंधात्मक उपाय
- घर व परिसरात स्वच्छता राखणे.
- चिखल, घाण पाणी असलेल्या ठिकाणापासून दूर राहणे.
- पावसाळ्यात बाहेरील पदार्थ, मुख्यत: सागरी अन्नपदार्थ खाणे टाळणे.
- शरीरावर जखम किंवा दुखापत असल्यास त्यावर पट्टी बांधा.
- भाज्या व फळे धुऊनच खाणे.
- वारंवार हात स्वच्छ धुणे.
- उकळलेले पाणी पिणे.