संकेत केबिनमध्ये आला आणि मी दुसरे काम संपवेपर्यंत लक्षात आले की, आजची भेट ही सर्दी, खोकला, ताप यासाठी नसून काही तरी वेगळीच भानगड आहे. बोला, काय म्हणते तब्येत! – मी सुरुवात केली. तडक संकेतच्या दोन्ही हातांची नखे टेबलवर ठेवत आई रागाने म्हणाली, ‘हे पाहा.’ मला वाटले, काही मार लागला असेल, पण प्रकरण वेगळेच होते. खाऊन खुडलेली आणि घट्ट पेरांना चिकटलेली नखे पाहून नखे खाणारी मुले आमच्या लगेच लक्षात येतात, पण उपचारासाठी कोणी सहसा येत नाही. ‘डॉक्टर, हे पाहा,’ परत नखे दाखवत आई म्हणाली, ‘सतत, पाहावे तेव्हा हा नखे खात असतो. मागे असे करून नखे लाल झाली. एकदा तर नखाचा संसर्गही झाला आणि घरात येणारे-जाणारे, पाहुणे, वर्गात सगळ्यांना याची सवय माहीत आहे. लहान होता तेव्हा ठीक होते. थोडे फार कधी तरी असे केले तर. पण याची ही सवय वाढतच चाललीय.’ आईचे नखपुराण थांबायचे काही नावच घेत नव्हते. शेवटी मीच आईला तोडत संकेतला विचारले- का रे बाबा, काय म्हणते आहे आई. तुला काही शाळेत, घरी कुठले टेन्शन आहे का? संकेत अगदी आरामात ही चर्चा ऐकत होता. त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. ‘अहो, कसलं टेन्शन डॉक्टर,’ आईने सांगायला सुरुवात केली. एकूणच ती या सवयीला वैतागलेली वाटत होती आणि तिलाही यासाठी समुपदेशनाची गरज होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे बघा, आधी हे समजून घ्या की, ही संकेतच्या नकळत त्याला लागलेली एक सवय आहे. तुम्हालाही अशी एखादी सवय असेलच. काही नाही तर चहाची सवय तरी असेल. तसेच आहे हे! हो, नक्कीच याच्यात ताणतणावाचा भाग असतोच. पण आमचे बालमानसशास्त्र फक्त ताण एवढय़ा एका गोष्टीला या सवयीसाठी जबाबदार धरत नाही. त्याबरोबरच या सवयीचा संबंध कामात किंवा अभ्यासात अवघड समस्या सोडवण्याची वेळ येणे, एखादा निर्णय घेण्याची वेळ किंवा एकटेपणाशीही आहे. ही मुले जेव्हा त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात छान वेळ घालवत असतात, मजा करीत असतात, तेव्हा ही सवय फारशी दिसून येत नाही. बऱ्याचदा घरातील तणावपूर्ण कौटुंबिक वातावरणामुळेही ही सवय वाढू शकते.

डॉक्टर, आमच्या घरात अशा काही समस्या नाहीत. पण काय करावे, आता ही सवय घालवायला. बघा, सर्वप्रथम या सवयीचे उपचार फक्त ही सवय घालवण्यावर केंद्रित करून चालत नाही. तुम्ही यावरून त्याला रागावणे किंवा इतरांसमोर तो नखे खात असताना त्याचा अपमान करून त्यांच्यासमोरच याबद्दल त्याला सुनावणे किंवा इतरांसमोर नखे खात असताना हातावर मारून हात खाली करणे अशा गोष्टी तातडीने बंद करा. यामुळे सवय कमी होण्याऐवजी वाढू शकते. हवे तर तुम्ही त्याला एखाद्या ठरवलेल्या खुणेने सांगू शकता, जी तुम्हाला आणि त्यालाच कळेल. यासाठी खास हॅबिट रिव्हर्सल प्रोग्राम म्हणजेच ही सवय घालवण्याचा शास्त्रशुद्ध कार्यक्रम जवळपास ८ महिने राबवावा लागतो. यात पालक व मुलगा दोघांचा सहभाग महत्त्वाचा असतो.

‘डॉक्टर, हे आम्हाला घरच्या घरी करता येईल ना, आणि यात नेमके काय असते?’ हो अर्थातच, हे मी तुम्हाला समजावून सांगितले की घरी करायचे असते. फार तर महिन्यातून एकदा आपण त्याचा आढावा घेऊ  शकतो. यात तीन महत्त्वाचे भाग असतात. पहिल्या भागात या सवयीविषयी, याच्या दुष्परिणामांविषयी तसेच आरशासमोर उभे राहून ही नखे खात असताना नेमकी कशी क्रिया होते, कुठले स्नायू काम करतात याची सूक्ष्म जाणीव मुलाला करून दिली जाते. दुसऱ्या भागात याला पर्यायी अशी काही तरी क्रिया करायला सांगितली जाते, जी नंतर सहज सुटेल. उदाहरणार्थ, एखादे चांगले प्रेरणादायी वाक्य किंवा फक्त बोट उडवणे किंवा मूठ घट्ट आवळणे अशा पर्यायी क्रिया दिल्या जातात. नख खावेसे वाटले तर ही पर्यायी क्रिया करायची. याचेही नीट प्रशिक्षण दिले जाते. तिसऱ्या भागात असे केल्यास व ही सवय कमी होत असल्याचे लक्षात आल्यास मुलाचे कौतुक किंवा त्याला बक्षीस देणे असा हा कार्यक्रम असतो. एकूण ही सवय नक्की जाईल, फक्त आपल्याला नेटाने त्यासाठी या गोष्टी करायला हव्यात.

amolaannadate@yahoo.co.in

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nail eating habits
First published on: 27-07-2017 at 01:10 IST