दातांच्या समस्या अगदी लहान वयापासून सुरू होतात. दात भरून घेण्यापासून कृत्रिम दात, दंतपंक्ती लावण्यापर्यंतचे उपचार झाल्यावरही दातांचे आरोग्य सुधारेलच याचा नेम नसतो. वृद्धापकाळात तर दातांच्या समस्या आणखी वाढतात. सर्व दात शाबूत असतानाही चावणे, गिळणे ही समस्या होते. त्यातच मौखिक आरोग्य व शरीरातील आजार यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये दातांच्या समस्यांसाठी दंतचिकित्सकासोबत इतर आजारांच्या तज्ज्ञांचीही मदत घेणे अनिवार्य ठरते.
हृदय, फुप्फुस, सांधे किंवा शरीराच्या इतर भागांत पसरलेल्या आजारांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम मुखातील आरोग्यावर होतात आणि तोंडामध्ये असलेल्या जीवाणू, विषाणू अशा सूक्ष्म जीवांचा परिणाम शरीरातील आरोग्यावर होत असतो. वृद्धापकाळातील मौखिक आरोग्याशी संबंध नसलेले आजार आणि त्यासाठी घेतली जाणारी औषधे यांचाही दात किडण्यावर कमी अधिक परिणाम होतो. त्यामुळेच ज्येष्ठांनी त्यांच्या मौखिक आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
मुखाचे कार्य आणि वृद्धापकाळ
वृद्धांमधील सर्व दात टिकले असले तरीही या काळात अन्न चावण्यासाठी तरुण वयापेक्षा अधिक वेळ लागतो. अन्नाचा चोथा करण्यासाठी अधिक वेळा दातांचे घर्षण व्हावे लागते. त्यातच काही दात पडले असले तर चावण्याची क्रिया अधिक काळ करावी लागते. दातांची कवळी बसवल्यानंतर चावणे अधिकाधिक कठीण होत जाते. गिळण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही वयानुरूप वाढ होते. पार्किनसन्ससारख्या आजारात गिळण्यासोबतच अन्ननलिकेवरही परिणाम होतात. गोड, खारट, कडू चव ओळखण्याची जिभेची क्षमता कमी होते आणि ज्येष्ठांमध्ये खारट, गोड पदार्थ खाण्याचा कल वाढतो. वास घेण्याची क्षमताही कमी झाल्याने अन्नावरची वासना उडते. या सगळ्याचा परिणाम अन्नसेवनावर होतो. अन्नाची चव कमी जाणवते आणि पचनातही अडथळे येतात.
मौखिक आरोग्याच्या देखभालीसाठी लाळेचे महत्त्व असते. तोंडातील आम्ल रसातील तीव्रता कमी करून दाताचे आरोग्य जपले जाते. लाळेमध्ये बुरशीनाशक वैशिष्टय़े असतात. मुखातील टणक आणि मऊ उतींभोवती लाळ वंगणाचे काम करत असल्याने दातांचा अवरोध कमी होतो. अन्न गिळण्यासाठीही लाळेचा उपयोग होतो.
दातांचे व हिरडय़ांचे आजार
वर्षांनुवर्षे हिरडय़ांना अनेक विषाणू, जीवाणूंचा सामना करावा लागल्याने ज्येष्ठांमधील दातांची मुळे उघडी पडून दंतक्षय होतो. दातांवर आधी फिकट व नंतर गडद तपकिरी रंगाचे डाग पडतात. काही कालावधीनंतर दातांवर किंवा दोन दातांमध्ये, हिरडय़ांच्या बाजूला किंवा आधी उपचार केलेल्या दातांशेजारी छीद्र पडते. हे थांबवण्यासाठी प्रत्येक वेळी खाल्ल्यानंतर दात घासणे आवश्यक आहे. फ्लुराइड असलेली टूथपेस्ट आणि मऊ टूथब्रश वापरणे हितकारक ठरते. टूथब्रश दर सहा महिन्यांनी बदलावा. चॉकलेट, तंबाखू, गुटखा चघळणे, धूम्रपान करणे तसेच सैल कवळी टाळावी. दातांच्या समस्यांमध्ये डॉक्टरांचा लवकर सल्ला घ्यावा.
दात पडणे –
दातांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित कारणांमुळे दंतक्षय होतो. दातांसभोवतीच्या अवयवांमधील (हिरडय़ा, जीभ, टाळू, गालाचा आतील भाग) आजारामुळे, दंतक्षय आणि कर्करोग ही दात पडण्याची प्रमुख कारणे आहेत. दात काढून त्या ठिकाणी नवीन दात बसवणे किंवा सर्वच दात पडल्यास योग्य मापाची कवळी बसवणे हा यावरचा उपाय आहे.=
दातांसभोवतीचे भागांचे आजार
दातांच्या आजूबाजूला असलेल्या उतींना पेरीडोंटिअम म्हणतात. या भागात अनेक सूक्ष्मजीव प्रचंड प्रमाणात असतात. त्यामुळे तोंडाला वास येण्यापासून हिरडय़ांचे लाल होणे, सुजणे असे प्रकार घडतात. हिरडय़ा दुखणे, खाज येणे किंवा त्यातून रक्त येणे ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. रोज दात घासणे, दातांच्या फटींमधील अन्नपदार्थ काढणे आणि त्रास वाटल्यास लवकर डॉक्टर गाठणे हे उपाय अवलंबता येतात.
संरक्षण आवरणाचे आजार
तोंडामध्ये तीन प्रकारचे संरक्षक पातळ आवरण (म्युकोसल लाइनिंग) असते. दातांवर, ओठ-गाल आणि जिभेच्या खाली तसेच टाळूवर असलेल्या या आवरणामुळे मौखिक आरोग्य चांगले राहते. पण काही वेळा सैल कवळी, दंतक्षय आणि टणक पदार्थामुळे अल्सरचा धोका वाढतो. कवळी बसवलेल्या जागेत अनेकदा बुरशीचा संसर्ग दिसतो. लहान लाल रंगाचे किंवा दह्य़ासारखे प्लाक सहजपणे काढून टाकता येतात. दंतवैद्याकडे जाऊन उपचार घेता येतात. बुरशीनाशक औषधे आणि गोळ्या उपलब्ध आहेत.
एक्झोस्टॉमिआ – लाळेचे प्रमाण कमी झाल्याने तोंड कोरडे पडण्याला एक्झोस्टॉमिआ म्हणतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडातील अ‍ॅलर्जी, मूत्ररोगावरील काही औषधांमुळे लाळेचे प्रमाण कमी होते. काही मानसिक रोग, पार्किनसन्स, मेंदू व मानेदरम्यानच्या कर्करोगावरील उपचारांसाठी घेतलेले रेडिएशन यामुळेही लाळ कमी होऊ शकते. नेमके कारण शोधून काढण्यासाठी दंतवैद्यासोबत संबंधित आजारांच्या तज्ज्ञांचाही सल्ला घ्यायला हवा. साखर नसलेल्या टणक कॅण्डी, च्युंइगम, सतत पाणी पिणे उपयोगी पडते.
मुखाचा कर्करोग-सुरुवातीला टणक, वेदना नसलेला अल्सर जाणवतो. कालांतराने त्याची वाढ होते. तंबाखूजन्य पदार्थ सतत खाणाऱ्यांना याचा धोका असतो. त्यामुळे याबाबत तातडीने कर्करोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न –
हृदयरोगानंतर दातांवरील उपचार नेमके केव्हा करावेत, रक्त पातळ करणारी औषधे सुरू असताना दात काढणे योग्य आहे का, उच्च रक्तदाब असताना गुंगी देऊन दात काढता येईल का, असे प्रश्न नेहमी दंतवैद्यांना विचारले जातात. पण प्रत्येक रुग्णागणिक याचे उत्तर बदलते व तुमच्यावर उपचार करणारे हृदयरोगतज्ज्ञ याबाबत अधिक सांगू शकतील.
डॉ. प्रकाश खलप drpjkhalap@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oral health of older people
First published on: 23-07-2016 at 06:35 IST