scorecardresearch

पावडरचे दूध पाजताना..

नैसर्गिक किंवा सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली तरी आईच्या स्तनांमध्ये दूध उतरण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात.

पावडरचे दूध पाजताना..

प्रसूतीनंतर तासाभरातच बाळाला स्तनपान करणे गरजेचे असले तरी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यांनतर बाळाला सर्रास पावडरचे दूध पाजण्याकडे खासगी रुग्णालयांचा कल वाढत आहे. बाळाला पावडरचे दूध पाजण्यापूर्वी रुग्णालयांनी आईची किंवा नातेवाईकांची परवानगी घ्यावी, अशी मागणी आता केली जात आहे.

एकीकडे सिझेरियन झालेल्या मातेला पहिले चोवीस तास स्वत:हून मुलाला जवळ घेऊन दूध पाजणे शक्य नसते आणि दुसरीकडे बाळ बाहेर आल्यानंतर आईद्वारे होणारा साखरेचा पुरवठा खंडित झाल्याने त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी व्हायला लागते. अशा परिस्थितीत स्तनपानाविषयी मार्गदर्शन करणे, मदत करणे या वेळखाऊ कामापेक्षा बाळांना पावडरचे दूध देण्याचा सोपा मार्ग रुग्णालये अवलंबतात.

सिझेरियन झालेली आई लगेचच स्तनपान करू शकत नाही हा गैरसमज असल्याचे स्पष्ट करताना ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन नेटवर्कचे डॉ. प्रशांत गांगल सांगतात, पूर्वी सिझेरियनच्या वेळी संपूर्ण अंगामध्ये भूल द्यायचे. यामुळे शस्त्रक्रिया करताना आई बेशुद्धावस्थेत असायची. शिवाय संपूर्ण अंगामध्ये भुलीचे औषध असल्याने दुधावाटे ते बाळाला जाण्याचा धोका होता. म्हणून मग सिझेरियननंतर आई शुद्धीवर आल्यावर किंवा जास्तीत जास्त चार तासांनी स्तनपान देण्याची शिफारस केली होती. परंतु आता कमरेतून भूल दिली जाते. यामुळे आईच्या कमरेखालील भागात संवेदना नसते मात्र ती शुद्धीत असते. तसेच यात आईच्या रक्तात भुलीचे औषध जात नसल्याने बाळालाही दुधावाटे ते जाण्याचा संभव नसतो. तेव्हा एकीकडे शस्त्रक्रिया सुरू असतानाच खांद्याकडील बाजूने बाळाला उलटे ठेवून स्तनपान करणे शक्य आहे. मात्र याबाबत डॉक्टर आणि प्रसूतीगृहांना योग्य माहिती नसल्याने पावडरच्या दुधावर भर देतात.

सिझेरियन झालेल्या आईला पहिल्या दिवशी स्वत:हून स्तनपान करणे शक्य नसले तरी परिचारिका किंवा नातेवाईकांच्या मदतीने बाळाला एका बाजूने पकडून दूध पाजता येऊ शकते. बाळाला अतिदक्षता विभागात केवळ देखरेखीसाठी ठेवल्यासही आईचे दूध पाजता येते. प्रसूतीगृहांमध्येही नातेवाईकांना याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

सिझेरियन झालेल्या माता बऱ्याचदा दूध येत नाही, असे सांगून स्वत:च बाळाला पावडरचे दूध द्या सांगतात, असे खासगी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ सांगतात. नैसर्गिक किंवा सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली तरी आईच्या स्तनांमध्ये दूध उतरण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. त्यावेळी चीकदूध म्हणजेच पिवळसर रंगाचे चिकट दूध येत असते. या चीक दुधाचे प्रमाण कमी असले तरी ते पौष्टिक असते. त्यामुळे बाळाची भूक व तहान भागवण्यास पुरेसे असते. सिझेरियन करताना काही अडचणी, मधुमेह असलेली माता किंवा मानसिक ताण अशा काही परिस्थितींमध्ये दूध येण्यासाठी याहून अधिक काळ लागतो. परंतु याचे प्रमाण तुलनेने फार कमी असल्याचे डॉ. गांगल सांगतात. कमी होणाऱ्या साखरेची अवाजवी भीती निर्माण करून पावडरच्या दुधाचा मारा बाळावर करणे त्याच्या शरीरासाठी अहीतकारकच आहे.

नैसर्गिक पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर बाळाला स्तनपानासाठी लगेचच दिले जाते, मग सिझेरियन झालेल्या मातेच्या बाबत हे का घडत नाही, हे समजावताना बीपीएनआयच्या लॅक्टेशन कन्सलटंट स्वाती टेमकर म्हणतात, खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन झाल्यानंतर सुरुवातीचे दोन किंवा तीन दिवस आईला आराम देण्यावर भर असतो. नातेवाईकांचाही आईला त्रास होऊ नये, असेच मत असते. दुसरीकडे बाळाची कमी होणारी साखर नियंत्रित करणेही गरजेचे असते, म्हणून मग बऱ्याचदा खासगी रुग्णालये पावडरच्या दुधालाच प्राधान्य देतात. महिनाभरापूर्वी एका नामांकित रुग्णालयांमध्ये एक महिलेचे सिझेरियन झाले, त्यावेळीच मी तिथे पोहचले होते. खरं तर अशा रुग्णालयांमध्ये प्रसूतीगृहात कोणालाही जाण्याची परवानगी नसते. परंतु तिथल्या पारिचारिकांच्या प्रमुखाशी संपर्क करून आईची लगेचच स्तनपान करण्याची इच्छा असेल तर तिला मदत करण्याबाबत सांगितले. त्यांनीही मग आईला विचारून प्रसूतीगृहात जाण्याची परवानगी दिली. सिझेरियन होऊन काही मिनिटेच झाली होती. तिच्या खांद्यावरून उलटय़ा दिशेने बाळाला आम्ही स्तनपान करण्यास मदत केली आणि बाळानेही लगेचच दूध ओढायला सुरुवात केली. मुंबईतील या नामांकित रुग्णालयात सिझेरियननंतर तासाभरातच स्तनपान करणारे हे पहिले बाळ होते. खासगी रुग्णालयांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांसाठी आई आणि बालरोगतज्ज्ञांसाठी बाळाची जबाबदारी महत्त्वाची असते. मात्र अंतिमत: या दोन विभागांच्या जबाबदारीमध्ये स्तनपानाकडे दुर्लक्ष केले जाते. दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधून प्रसूती झाल्यानंतर बाळाने स्तनपान केल्याशिवाय त्याला वार्डमध्ये सोडायचे नाही, अशी प्रतिज्ञा केली तर सर्वच रुग्णालयांमध्ये हे व्हायला वेळ लागणार नाही.

काही आईमध्ये जनजागृती झाली असली तरी प्रसूतीगृहांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने पालकही मग पावडरच्या दुधाकडे वळतात. माझे पहिलचे मूल. सिझेरियननंतर बाळाला चोवीस तास अतिदक्षता विभागात ठेवले होते. तिथे थेट पावडरचे दूध दिले गेले. बाळ आजारी नसताना ते सुरुवातीचे चीक दूध पिऊ शकले नाही. त्यानंतरही मला सिझेरियनमुळे दूध पाजायला जमतच नव्हते. तेव्हा मदत किंवा मार्गदर्शन करण्यापेक्षा रुग्णालयात पावडरचेच दूध पाजले. इतर वेळी अनेक बाबींबाबत परवानगी घेणारी रुग्णालये बाहेरचे दूध पाजण्यापूर्वी आई किंवा नातेवाईकांना का विचारत नाहीत, शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा थकलेल्या आईला योग्य समुपेदशन का करत नाहीत, असा प्रश्न पनवेलच्या जिन्सी वर्गीस यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी याविरोधात ऑनलाइन याचिकाही केली आहे.

आई आणि बाळ वेगवेगळ्या रुग्णालयात असतील किंवा बाळाचे वजन जन्मत:च खूप कमी असेल अशा परिस्थितीमध्ये पावडरचे दूध देण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु बऱ्याचदा बाळ घरी जाताना सोबत हे डबे दिले जातात. त्यामुळे मग गरज नसतानाही पुढे अनेक महिने बाळ या दुधावरच असते. रुग्णालयांतच डबे उपलब्ध करून गरज असेल तोपर्यंतच बाळाला पावडरचे दूध द्यावे. जेणेकरून घरी जाऊनही पावडरचे दूध सुरू राहणार नाही, असेही पुढे टेमकर व्यक्त करतात.

– शैलजा तिवले

मराठीतील सर्व लोकआरोग्य ( Lokarogya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या