डॉ. सितेश रॉय, श्वसनविकारतज्ज्ञ

दिवाळीमध्ये मोठय़ा प्रमाणावर फटाके वाजवण्यात येत असल्यामुळे प्रदूषणात वाढ होते, मात्र त्याचबरोबर आरोग्याचेही प्रश्न निर्माण होतात. ज्यांना दमा, श्वसनविकार आहे, अशा रुग्णांना त्रास होतो. प्रदूषणाची पातळी जेव्हा ३०० हून अधिक होते, त्यावेळी निरोगी व्यक्तीवरही त्याचे परिणाम दिसून येतात.

श्वसनमार्गात अडथळा आल्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता म्हणजे दमा.  हा आजार अ‍ॅलर्जीमुळे होतो. वातावरणातील बदल, वाढणारे प्रदूषण, विषाणूंचा संसर्ग ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत.

दमा हा आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये व तरुणांमध्ये आढळून येतो. दम्याचा संसर्ग होण्यामागे अ‍ॅलर्जी हे प्रमुख कारण आहे. अ‍ॅलर्जी ही केवळ प्रदूषणामुळेच होते असे नाही तर चांगल्या वातावरणातही अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ  शकतो. गेल्या काही वर्षांत प्रदूषणाबरोबरच जीवनशैली व आहारातील बदलामुळे अ‍ॅलर्जी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सर्वसाधारणपणे प्रदूषणाचे दोन भाग केले जाते. एक म्हणजे अंतर्गत किंवा घरामध्ये निर्माण होणारे प्रदूषण आणि दुसरे म्हणजे घराबाहेरील प्रदूषण. घरातील सिगारेट व चूल यातून निघणाऱ्या धुरामुळे दम्याचा किंवा श्वसनाचा आजार बळावतो. वाहनातून निघणारा धूर, बांधकामाजवळील धुळीचे कण यामुळे दररोज प्रदूषणात भर पडत आहेच. मात्र दिवाळीत फटाक्यांमधून निघणारे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजनडाय ऑक्साइड, आर्सेनिक हे विषारी वायू हवेत मिसळतात. त्यामुळे निरोगी व्यक्तींनादेखील श्वसनाचा आजार सुरू होण्याची शक्यता असते. मुळातच शहरांमध्ये वाहने, कचरा जाळणे यांमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण वाढत आहे, त्यात दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण वाढण्यास अधिक भर पडते. यंदाच्या दिवाळीत दिल्लीमध्ये फटाकेविक्रीवर बंदी आणली होती. इतर वेळी दिल्लीमध्ये १५०पर्यंत असणारी प्रदूषणाची पातळी गेल्या वर्षी दिवाळीत ५०० या अतिधोकादायक पातळीपर्यंत पोहोचली होती. ही सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. समुद्रापासून दूर असलेल्या शहरांमध्ये हवा खेळती नसते. त्यामुळे अशा भागात प्रदूषण साठून राहते. दिल्ली या शहराच्या आजूबाजूला जमीन असल्याने या भागात प्रदूषण झाले तर ते वाऱ्याअभावी ते वाहून न जाता त्याच भागात साठून राहते आणि त्यामुळे तेथे कायमच प्रदूषणाची पातळी वाढताना दिसून येते. त्या तुलनेत मुंबईत मात्र आजूबाजूला समुद्र असल्याने हवा खेळती राहते. त्यामुळे शहरात प्रदूषण वाढले तरी ते एका ठिकाणी जमा न होता, हवेबरोबर इतरत्र वाहून जाते. मात्र जेव्हा प्रदूषणाची पातळी ३०० हून जास्त होते, तेव्हा निरोगी व्यक्तींवरही याचा परिणाम दिसून येतो. यामध्ये सर्दीचा त्रास वाढतो. त्यासोबत खोकला, कफ, घसा दुखणे किंवा लाल होणे असा त्रास सुरू होतो, तर रुग्णांचा दमा नियंत्रित असतो तो वाढीस लागतो. यामध्ये श्वसननलिकेला सूज येणे, लाल चट्टे येणे, कफ जमा होणे ही लक्षणे दिसून येतात. अनेक रुग्णांना सतत खोकल्याची उबळ येत असल्याने रात्रीची चांगली झोप मिळत नाही. नाक गळणे, नाक चोंदणे ही प्रदूषणातून निर्माण होणारी लक्षणे आहेत.

प्रदूषणाबरोबरच दम्याचा संसर्ग होण्यामागे जीवनशैलीतील बदल व पौष्टिक आहाराचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. सध्या खाण्याच्या व झोपेच्या वेळांमध्ये सातत्य नसते. रात्रीचे जागरण, दारू पिणे, अवेळी खाणे वाढले आहे. सकस आहार खात नसल्यामुळे शरीराला आवश्यक रोगप्रतिकार क्षमतेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलाला दोन हात करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. यातून अ‍ॅलर्जी होण्याचे प्रमाण वाढत आहे. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे विषाणूजन्य आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते व परिणामी श्वसनाच्या आजारांचा त्रास सुरू होतो.

उन्हाळ्यानंतर वातावरणात बदल जाणवू लागतो. पावसाची चाहूल लागली की ढग दाटून येतात. तापमानातील व हवामानातील बदलांचा फुप्फुसांच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन काळा दमा किंवा सीओपीडीसारखे आजार सुरू होतात. हवेतील विशिष्ट प्रकारचे घातक कण श्वसोच्छवासावाटे शरीरात जाऊन फुप्फुसाचे कायमचे नुकसान करतात याला क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसज किंवा काळा दमा असे म्हणतात.

ऋतूबदलाच्या काळात दम्याचा किंवा श्वसनाचा त्रास असणाऱ्यांना श्वाच्छोत्सवात अडथळा जाणवतो. दिवाळीत पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याकडे वाटचाल असते. त्यामुळे हवेत मोठा बदल होता. थंडीमुळे हवेत कोरडेपणा येतो. अनेक ठिकाणी  हिवाळ्यात सकाळी धूर व धुके याचे एकत्रितपणे दिसून येते. जे दमा असणाऱ्यांसाठी धोक्याचे आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दम्याच्या आजारात मुळात अ‍ॅलर्जी होण्याचे कारण जाणून घ्यावे. यासाठी श्वसनविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि दम्याचे निदान करून घ्यावे. दम्याचा त्रास असणाऱ्यांची फुप्फुसांची तपासणी करणारे उपकरण सोबत ठेवावे. दिवाळीमध्ये फटाक्यांचा प्रभाव असलेल्या परिसरात जाणे टाळावे. शक्य असल्यास दिवाळीचे काही दिवस शहराबाहेर जाऊन आराम करावा. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहनांचा वापर कमी केल्यास किंवा दिवाळीत फटाके फोडण्याचे प्रमाण कमी केले तर वातावरणातील प्रदूषण आटोक्यात आणता येईल आणि दम्याच्या रुग्णांनाही या त्रासातून सुटका मिळेल.