लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा मारतो, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही लावतो. मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, शिवाय सगळ्यांनी हा व्यायाम केला तर चालतो का, ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* खूप दोरीच्या उडय़ा मारल्या की वजन कमी होते हा एक गैरसमजच आहे. दोरीवरच्या उडय़ा मारताना सर्वात जास्त व्यायाम होतो तो पोटऱ्यांच्या स्नायूंना. त्यामुळे दोरीच्या उडय़ांमुळे पोटरीचे आणि पायाचे पुढच्या बाजूचे स्नायू बळकट होतील, पण तुम्ही केवळ वजन कमी करण्यासाठी अगदी ३० मिनिटे वा ४० मिनिटे दोरीच्या उडय़ा मारल्यात तरी त्याचा त्या दृष्टीने फारसा फायदा नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उडय़ांपेक्षा जलदगतीने चालण्याचा फायदा अधिक.
* पोटरीचे स्नायू बळकट करणे हाच उद्देश असेल तर चवडय़ावर वर-खाली होण्याच्या व्यायामानेही ते साधते.
* आपल्या घोटय़ाच्या वर ‘अकिलीज टेंडन’ नावाचा स्नायू असतो. जे लोक रोज दोरीच्या उडय़ा मारतात त्यांच्यापैकी काही जणांमध्ये रोजच्या वर-खाली उडय़ा मारल्यामुळे या टेंडनला सूज येऊ शकते. त्यात उडय़ा मारणाऱ्याचे वजन जास्त असेल तर त्रास अधिक संभवतो.
* दोरी फिरवताना मनगटाची हालचालही वारंवार एकाच प्रकारे होते. त्यामुळे काहींमध्ये मनगटाच्या स्नायूलाही सूज येणे शक्य आहे.
* ज्यांना गुडघ्यांची झीज सुरू झाली आहे त्यांनी हा व्यायाम शक्यतो टाळावा. तरुणांनी मात्र वॉर्मअप करताना तो केल्यास हरकत नाही.
* लहान मुले लीलया दोरीच्या उडय़ा मारतात. मोठेपणी मात्र सवय नसताना एकदम दोरीच्या उडय़ा मारणे सुरू केले तर तोल जाऊन पडण्याची भीती अधिक असते.
* काही जणांमध्ये दोरीच्या उडय़ांनी कमरेच्या चकतीवर ताण येऊन कमरेचे दुखणे सुरू होऊ शकते.
* दोरीच्या उडय़ांमध्ये हात आणि पाय यांचा मेळ साधून उडी मारावी लागते. त्यामुळे विविध कारणांमुळे ज्यांचा तोल जातो अशांसाठी हा व्यायाम नक्कीच बरा नव्हे. (उदा- कानाच्या समस्यांमुळे तोल जाणे, स्पाँडिलोसिस, पार्किन्सन्स इ.)
*दोरीच्या उडय़ांच्या व्यायामाला असलेल्या मर्यादांमुळे फक्त आणि फक्त तेवढाच व्यायाम शक्यतो नको. पण याचा अर्थ ज्यांना दोरीच्या उडय़ा मारता येतात त्यांनी त्या मारुच नयेत असे नाही. ‘वॉर्मअप’मध्ये आपण जे विविध व्यायाम करतो- उदा. जोर काढणे, सीटअप काढणे इत्यादी. त्याबरोबरच पाच मिनिटे दोरीच्या उडय़ा हा एक व्यायाम असावा.
* दोरीच्या उडय़ा मारायच्याच असतील तर शक्यतो पायात स्पोर्ट शूज घालून करा. त्याने ‘शॉक अब्सॉर्बर’सारखा परिणाम मिळतो आणि पावलावर फार ताण पडत नाही.
* या उडय़ा मारताना पाच मिनिटांनी एकदा थोडी विश्रांती घ्यावी. हवे असल्यास नंतर परत पाच मिनिटे दोरीच्या उडय़ा माराव्या.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rope jumping
First published on: 02-04-2016 at 03:22 IST