डॉ. स्वप्नील देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ब्लू व्हेल’ या खेळाकडे समाजमाध्यमांचा एक वाढीव भाग म्हणून पाहायला हवे. हल्ली लहानपणापासून समाजमाध्यमांची नको इतकी ओळख झालेली असते. त्यामुळे बऱ्याचशा मुलांमध्ये समाजात वावरण्यासाठी लागणारी कौशल्ये नीट विकसित झालेली नसतात. त्यामुळे भावनांची देवाणघेवाण करणे त्यांना अवघड जाते. मोबाइल आणि इंटरनेटच्या वापराचे व्यसन अगदी लहान वयातच लागू शकते. हातात मोबाईल किंवा गेम खेळायला दिल्यावर मूल शांत बसते, आणि तो काढून घेतल्यावर गोंधळ घालते, रडते, हे पाहून अनेकदा पालक त्यांच्या हाती मोबाईल राहू देणे अधिक बरे, असा तात्पुरता सोईचा मार्ग अवलंबतात. स्वत:ची ऊर्जा आणि समाजात वावरण्याची कौशल्ये कमी पडल्यामुळे येणारा एकटेपणा या गोष्टी मुले समाजमाध्यमांवर मिळवण्याचा प्रयत्न करतात. समाजमाध्यमांवर मुलांचे लक्ष सतत गुंतवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्यात पद्धतीने संकेतस्थळे व गेम्स बनवलेल्या असतात.

असे गेम का खेळावे वाटतात?

  • कोणत्याही गेममध्ये वेगवेगळ्या पायऱ्या असतात. या प्रत्येक पायरीवर नवे आव्हान असते. गेम जिंकल्यावर काही पाँइंटस् मिळतात. त्यातून तेवढय़ापुरते का होईना, पण समाधान मिळते. गेममध्ये टप्प्याटप्प्याने जितके अवघड ‘टास्क’ पूर्ण केले जाते तेवढा जास्त आनंद झाल्याची भावना निर्माण होते आणि गेमच्या पुढच्या पायरीकडे जाण्याची तयारी वाढते. गेममधील आव्हाने गेमला आकर्षक बनवतात.
  • ‘ब्लू व्हेल’सारख्या गेममध्ये असलेली ‘टास्क’ स्वत:ला इजा करून घेण्यास सांगणारी असतात. गेम खेळणारे सगळेच च्या आहारी जातात असे नाही, पण लहानपणापासून मोबाइल आणि गेमिंगशी अतिसंपर्क असलेली, एकटेपणा जाणवणारी, भीती (एन्झायटी) व नैराश्याची लक्षणे असणारी, काही कौटुंबिक समस्या असणारी किंवा मित्रांकडून दबाव असणारी मुले स्वत:ला इजा करण्याचे गेम खेळण्यात सहभागी होण्याची आणि त्याच्या आहारी जाण्याची शक्यता अधिक असते.

काही टिप्स

  • आपल्या मुलांना मोबाइल आणि इंटरनेटचे व्यसन आहे का, हे ओळखायचे असेल तर २-३ दिवस त्यांच्याकडून मोबाइल काढून घेऊन पहा. मूल सतत चिडचिड करत असेल किंवा अस्वस्थ होत असेल, सतत त्याची मागणी करत असेल, तर मोबाईल आणि इंटरनेटचे त्याला व्यसन असल्याची ती लक्षणे समजावीत. दिवसाला मोबाइलबरोबर किती तास जातात याकडे लक्ष द्या.
  • स्वत:ला इजा करून घेणे हा लहान मुलांमध्ये हट्टीपणाचा एक भाग असू शकतो. अगदी लहान असताना श्वास रोखून धरणे, थोडे मोठे झाल्यावर भिंतीवर डोके आपटून घेणे किंवा केस उपटणे, स्वत:ला चावा घेणे, नखाने स्वत:ला ओरखडणे अशी लक्षणे काही मुलांमध्ये असतात. दहा वर्षांच्या पुढच्या मुलांमध्ये उंचावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणे, आत्महत्येची धमकी देणे हेही काही मुलांमध्ये दिसते. अशी लक्षणे दिसत असतील तर वेळीच वैद्यकीय सल्ला गरजेचा आहे.
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media issue social media dominating on children
First published on: 03-08-2017 at 01:31 IST