रोज सकाळी उठल्यावर दात घासावेत, इतपत दातांची स्वच्छता सर्व जणच करतात, पण दिवसभर आपण वारंवार काहीना काही खात-पीत असतो. त्यानंतरही खळखळून चुळा भरून तोंड स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. दात कसे घासावेत, जिभेची स्वच्छता का गरजेची असते आणि एकूणच मौखिक आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, याबद्दलच्या काही टिप्स..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • आपण दिवसात जेवणाव्यतिरिक्तही किती तरी वेळा अगदी सहज काही तरी खात असतो. आपण खातो त्यातील बहुतेक पदार्थ मऊ आणि चिकट असतात. त्यामुळे दातांच्या मधे, दाढांवर किंवा हिरडय़ांवर ते चिकटतात. त्यामुळे मौखिक आरोग्य सांभाळण्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे खाल्ल्यानंतर पाण्याने खळखळून चुळा भरणे. अनेकदा हे आपल्या लक्षात येत नाही किंवा चुळा भरण्याचा कंटाळा केला जातो. नैसर्गिकरीत्या धागे असलेली आणि कडक फळे व भाज्या, रानमेवा यांचाही आहारात समावेश असणेही तितकेच गरजेचे. असे टणक पदार्थ खाताना दात आणि तोंडाला व्यायाम होतोच, तसेच दात आपोआप स्वच्छ होतात.
  • दातांवर जमा होणारे अन्नाचे कण आणि ‘प्लाक’चा थर नुसत्या बोटाने दात घासून निघत नाही. त्यामुळे दात घासण्यासाठी टूथब्रश वापरणेच योग्य. दात घासून झाल्यावर बोटाचा वापर करून हिरडय़ा घासणे चांगले.
  • टूथब्रश निवडताना त्याचे धागे मऊ किंवा मध्यम बघून घ्यावा. फार कडक धागे असलेला ब्रश टाळावा. वापरून वापरून ब्रशचे धागे वेडेवाकडे झाल्यावर किंवा झिजल्यावर तो बदलणे आवश्यक असते.
  • दात जोरजोरात घासण्यापेक्षा हळुवार घासावेत. तोंडात सर्व बाजूंनी आणि योग्य रीतीने ब्रश फिरवून दात घासण्याची क्रिया साधारणत: दीड-दोन मिनिटांत पूर्ण होते. फार वेळ दात घासत बसण्याची गरज नसते.
  • रात्रीच्या जेवणानंतर दात घासण्यास अनेक जण विशेष महत्त्व देत नाहीत; परंतु जेवताना दातात अडकलेले अन्नकण झोपण्यापूर्वी दात घासून काढून टाकणे आणि तोंड स्वच्छ करणे फार गरजेचे असते. रात्री दात न घासल्यास झोपेच्या साधारणत: आठ तासांच्या काळात दातांत अडकून राहिलेल्या अन्नकणांमुळे दात किडायला आमंत्रणच मिळते. रात्रीचे दात घासताना प्रसंगी टूथपेस्ट वापरली नाही तरी चालते, परंतु ब्रश ओला करून त्याने दात घासणे आणि चुळा भरणे आवश्यक.
  • कधीही दात घासताना दातांबरोबर जीभही स्वच्छ करणे गरजेचे आहे. टूथब्रशच्या मागे असलेल्या खडबडीत भागाने, मऊ टूथब्रशने किंवा अगदी बोटानेही हळुवारपणे जीभ घासता येते. जीभ खडबडीत असते आणि त्यावर चवीचे ज्ञान होणाऱ्या ग्रंथी (टेस्ट बड्स) असतात. अन्न खाल्ल्यावर दातांप्रमाणेच जिभेवरही त्याचा पातळ थर साचत असतो आणि त्यावर जिवाणूही वाढत असतात. हा थर सकाळी आणि रात्री दात घासताना काढून टाकायला हवा.
  • कोणतीही टूथपेस्ट वापरली तरी मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी टूथब्रश जास्त मदत करीत असतो. त्यामुळे दूरचित्रवाणीवरील टूथपेस्टच्या अनेक जाहिराती अतिरंजित असतात हे लक्षात घ्यायला हवे. ब्रश भरून पेस्ट न घेता थोडय़ाशाच पेस्टनेही तोंड स्वच्छ होते. जाडेभरडे दंतमंजन, मिश्री किंवा राखुंडीमुळे दातांचे ‘इनॅमल’ झिजते. त्यामुळे ‘टूथ पावडर’ वापरायची असेल तर ती मऊ असेल असे पाहावे.
  • टूथब्रश आणि टूथपेस्टबरोबरच ‘डेंटल फ्लॉस’ नावाचा नायलॉनचा धागा घरात असू द्यावा. दोन दातांच्या मधे अडकलेले अन्नाचे कण काढण्यासाठी हा छोटय़ा दोऱ्यासारखा डेंटल फ्लॉस उपयोगी पडतो. हा धागा वापरतानाही हळुवारपणे वापरायला हवा.
  • हल्ली अनेक जण तोंडाला छान वास यावा म्हणून दात घासण्याबरोबरच ‘माऊथवॉश’चाही वापर करतात, पण माऊथवॉश ही तोंडाला तात्पुरत्या स्वरूपात ताजेपणा आणणारी गोष्ट आहे हे लक्षात ठेवायला हवे. त्यातील जंतुनाशक घटकांमुळे तोंडातील जंतू काही प्रमाणात मरतात, परंतु ‘माऊथवॉश’ हा दात घासण्याला किंवा चुळा भरण्याला असलेला पर्याय नव्हे. साध्या कोमट पाण्यात किंचित मीठ किंवा तुरटी घालून त्याने गुळण्या केल्या तरी ते घरगुती ‘माऊथवॉश’सारखेच ठरते.
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teeth and tongue cleanliness issue
First published on: 10-08-2017 at 01:19 IST