नुकत्याच जन्मलेल्या बाळाला रुग्णालयातून घरी आणले की घरच्यांचा उत्साह नुसता ओसंडून जातो. बाळ कितीही छोटे असले, त्याला अजून खेळण्याइतकी समज आलेली नसली तरी घरातल्या प्रत्येकाला त्याच्याशी लाडाने बोलल्याशिवाय, त्याला हातात घेतल्याशिवाय चैन पडत नाही. पण त्याच वेळी एवढय़ा छोटय़ा बाळाला सांभाळायचे कसे ही काळजीही नव्यानेच ‘आई-बाबा’ झालेल्या पालकांच्या मनात असते. त्यात बाळ ‘प्रीमॅच्युअर’ जन्मले असेल तर ही काळजी आणखीनच वाढते. एवढय़ाशा बाळाकडे किती लक्ष देऊ आणि किती नको असे होऊन जाते. अशा ‘प्रीमॅच्युअर’ जन्मलेल्या पण दवाखान्यातून घरी गेलेल्या नवजात बाळांच्या पालकांसाठी या काही टिप्स.

जंतुसंसर्ग टाळा-

’ नवजात बाळांना जंतुसंसर्गाचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे बाळाला हाताळताना नेहमी हात दोन्ही बाजूंनी स्वच्छ धुणे फार आवश्यक आहे.

’ बाहेरून घरी गेल्यानंतर आधी स्वत: स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून मगच बाळाला हातात घ्यावे.

’ बाळाला सांभाळणाऱ्या व्यक्तीस सर्दी-खोकला झाला असे तर त्यांनी बाळाला हातात घेण्यापूर्वी तोंडावर मास्क लावायला हवा.

’ बाळाच्या नाळेमध्ये तेल किंवा पावडर घालू नये.

’ जे लोक बाळाला बघायला, भेटायला येतात ते बाळाला काहीतरी आवर्जून देतात. पण खिशात राहून घामट झालेल्या नोटा, फुले, गुच्छ स्वीकारणे टाळलेले बरे.

बाळाची काळजी घ्या-

’ नवजात बाळ गार पडू शकते. त्यामुळे घरात बाळ उबदार राहू शकेल अशी दक्षता घेऊन तिथे बाळाला ठेवावे.

’ बाळाला कापडांच्या २-३ थरांत गुंडाळावे.

’ प्रीमॅच्युअर नवजात बाळांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होऊ शकते. दवाखान्यातून घरी आणल्यावर बाळ मलूल पडले, बाळाने दूध पिणे कमी केले, ते सुस्त पडले तर रक्तातील साखर कमी झाली नाही ना हे तपासावे लागते. जंतूसंसर्ग झाल्यावरही मूल सुस्त पडू शकते. त्यामुळे अशी काही लक्षणे दिसत असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा.

बाळ दूध पिताना-

’ नवजात बाळांना दूध पाजताना दक्षता घ्यावी लागते. बाळ दूध तोंडात घेऊ शकते पण कधी कधी ते दूध गिळताना त्यांना अडचण येते. कारण दूध तोंडात घेणे व गिळणे यात समायोजन नसते.

दूध गिळताना कधी कधी एकदम फुप्फुसात जाऊ शकते. त्यामुळे बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सावकाश व काळजीपूर्वक दूध पाजावे.

’ आईचे दूध हे नवजात बाळांसाठी सर्वोत्तम. पण काही बाळांना पावडरचे दूध देण्याची गरज भासू शकते. हे दूध कसे तयार करावे, किती पाण्यात किती पावडर घालावी हे प्रमाण डॉक्टरांकडून नीट समजून घेणे गरजेचे असते.

’ बहुतेक बाळांना जन्मानंतर कावीळ होते. काही बाळांमध्ये सुरुवातीला तशी काही लक्षणे दिसत नाहीत. पण डोळे पिवळे दिसण्यासारखी काही लक्षणे दिसू लागल्यास त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो.

’ बाळांना गुटी, ग्राइप वॉटर, पाणी, साखरेचे पाणी यातले काहीही पाजू नये.

’ बाळाला झोपवताना डोके किंचितसे वर करून झोपवावे. खांदा व डोके शरीरापासून थोडेसे वरच्या पातळीला हवे. त्यामुळे दूध पिताना ते बाळाच्या छातीत जाणे टाळता येते. बाळाला कसे झोपवावे याबद्दल तरीही काही शंका असल्यास वेळीच बाळाच्या डॉक्टरांशी बोलून तिचे निरसन करून घ्यावे.

’ दूध पाजल्यावर बाळाला उभे धरून ढेकर काढावी.

’ काही बाळांच्या घशाशी येते. प्यायलेले दूध घशात येते. मूल अशा प्रकारे सारखे उलटय़ा करत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(शब्दांकन- संपदा सोवनी)