जपानचा चेरी ब्लॉसम, अ‍ॅमस्टरडॅमचा टय़ुलिप फेस्टिव्हल आणि काही प्रमाणात काश्मीर आणि सिक्कीममध्ये फुला-फळांच्या बहरानुसार पर्यटनालादेखील बहर येतो. लडाखमध्येही असाचा बहर असतो तो जर्दाळूच्या फुलोऱ्यामध्ये. अगदी ठरवून अनुभवावा असाच..

प्रत्येक पर्यटन स्थळाचा एक ठरावीक असा मोसम असतो. लडाखच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. लडाखच्या भटकंतीसाठी जून-जुलै हाच काय तो भटकंतीचा मोसम असायचा. कालांतराने सप्टेंबरात सुरू झालेल्या लडाख फेस्टिव्हलने हा कालावधी थोडा वाढला. इतकेच नाही तर आज हिवाळ्यातलं लडाख अनुभवयालादेखील अनेक पर्यटक जातात. गोठलेल्या झंस्कारवरील चादर ट्रेकने तर आता पूर्णत: व्यावसायिक सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या आहेत. पण सरत्या हिवाळ्यात सध्या तरी लडाखला जाणाऱ्यांची संख्या तशी नगण्यच म्हणावी लागले. याच काळात लडाखमध्ये सृष्टीचं एक मनमोहक रूप पाहायला मिळतं. विशेष म्हणजे त्यासाठी फारशी वाट वाकडी करायची गरज नाही.

लडाख तसा रखरखाटी प्रदेश. विलो, पॉपलर, लेह बेरी, थोडय़ा फार प्रमाणात सफरचंद आणि जर्दाळू (अ‍ॅप्रिकॉट) अशी चार-पाच प्रकारचीच वृक्षसंपदा. त्यातदेखील विलो आणि पॉपलर यांना फळं येत नाहीत, पण ऋतूनुसार बदलणारी त्यांची मनमोहक रूपं पाहण्यासारखी असतात. नोव्हेंबरपासून विलोचे विलोभनीय रंग सृष्टिसौंदर्य वाढवू लागतात. लालचुटुक शेंडा पूर्ण बहरात येतो तो फेब्रुवारीमध्ये. आणि सरत्या हिवाळ्यात पिवळा धमक शेंडय़ांनी विलो बहरलेला असतो. विलो तसा सर्वत्रच दिसतो. जर्दाळू हे मात्र तेथे जाणीवपूर्वक लावलं जाणारं झाड. खास लागवडच केलेले. लडाखी घरांच्या अंगणात तर अगदी हमखास सापडणारं. तर कधी रस्त्याच्या कडेने अगदी व्यवस्थित लावलेली ही झाडं. या जर्दाळूला बहर येतो तो मार्चमध्ये. फिकट गुलाबी रंगांची फुलं त्यावर डोलू लागतात. छोटी हिरवी पान डोकावत असतात, पण संपूर्ण झाडच्या झाड फुलांनी बहरून आलेले असते. काहीशी खुरटी म्हणावी अशी उंची, पण विस्तार दांडगा. समुद्रसपाटीपासून ठरावीक उंचीवरच वाढणारे हे जर्दाळू एकूणच लडाखच्या वातावरणात जिवंतपणा आणतात. बर्फ वितळू लागलेलं असते आणि या फुलांचा बहर अगदी टिपेला पोहचलेला असतो. मेच्या अखेरीस छोटी छोटी फळं यायला लागतात. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात फळं पिकू लागतात. जर्दाळू हा लडाखी जीवनाचा भाग आहे. नुसते फळ तर खातातच, पण ड्रायफ्रूट, जाम, गुलाबजामप्रमाणे पाकात घालून खाणं अशा अनेक प्रकारे जर्दाळू वापरलं जातं. बीच्या आतमध्ये आणखीन बदामाप्रमाणे छोटं बी असतं. तेदेखील खूप चविष्ट. समुद्रसपाटीपासून आठ-नऊ हजार फूट उंचीवरच हे झाड बहरतं. त्यापुढे ते टिकाव धरत नाही. त्यामुळे लडाखमध्ये सर्रास कुठेही हे पाहायला मिळेलच असं नाही. द्रास आणि कारगिल भागातच याची ७० टक्के लागवड आहे.

याच काळात आणखीन एक खास पाहण्यासारखं ठिकाण लडाखमध्ये आहे. पण ते आहे मानवनिर्मित आइस स्तूप. सोनम वाँगचूंग या हरहुन्नरी व्यक्तीने लडाखला दिलेली ही अनोखी देणगीच म्हणावी लागले. सस्टेनेबल जीवनशैलीचा हा पुरस्कर्ता आहे. लेहपासून नऊ किलोमीटरवरच्या फ्यांग या गावी हा अवलिया राहतो. त्याच्या केंद्रावरील संपूर्ण यंत्रणा चालते ती केवळ सौर ऊर्जेवर. तसं पर्यटकांपासून काहीसं दूरच राहणं त्याला आवडंत. पण त्याने लडाखी लोकांसाठी जे काही प्रयोग केले आहेत. त्यामध्ये हे आईस स्तूप पाहण्यासारखे आहेत. आईस स्तूप हे जाणीवपूर्वक दिलेले नाव. उन्हाळ्यात लडाखी गावांची पाण्याची गरज पूर्ण व्हावी म्हणून केलेली ही खास रचना. हिवाळ्यात डोंगरात ठरावीक ठिकाणी पाणी अडवलं जातं. ते पाणी डोंगरपायथ्यातल्या एका पाइपद्वारे आणलं जातं. पायथ्याला या पाइपमधून कारंज्याच्या स्वरूपात हवेत उडवलं जातं. पाणी किती आणि कसं उडवायचं याचं नियंत्रण केलेलं असतं. हवेतून पाणी खाली येताना आपोआप गोठतं. काही खुरटी झुडपं वापरून त्याला एक खास आकार दिला जातो. त्यातूनच हे स्तूप तयार होतात. सुमारे ९० फूट उंच आणि १०० मीटरचा घेर असणारे हे स्तूप एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत गोठलेल्या अवस्थेतच असतात. त्यानंतर मात्र ते वितळायला सुरुवात होते. वितळलेलं पाणी साठवायची पुन्हा एक खास रचना येथे केलेली आहे. त्यातूनच त्या गावाची पुढील एक-दोन महिन्यांची पाण्याची गरज अगदी व्यवस्थित भागते.

लडाखच्या अंतर्गत भागात असे अनेक स्तूप तुम्हाला हमखास दिसतात. सोनम वाँगचूच्या या प्रयोगाला रोलेक्स अ‍ॅवार्डने सन्मानित करण्यात आलं आहे. या रचनेला जाणीवपूर्वक स्तूप हे नावं दिलंय. आपल्याकडे जशी देवराई असते तसेच हे स्तूप. देवाच्या नावामुळे त्याला कोणी हात लावत नाही. उलट त्याचं रक्षणच केलं जातं. लडाखचं सौंदर्य जून-जुलैमध्ये बहरात आलेलं असतंच, पण  सरत्या हिवाळ्यात एप्रिल महिन्यातलं हे सृष्टिसौंदर्यदेखील आवर्जून अनुभवावं असं आहे. कमी गर्दीच्या काळात काही तरी वेगळं पाहायचं असेल तर लडाखचा हा मोसम अनुभवयाला हवा.

आत्माराम परब atmparab2004@yahoo.com