21 January 2018

News Flash

जायचं, पण कुठं? : सुंदरबन

जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल असे ज्याचे वर्णन केले जाते ते सुंदरबन बांगलादेशमध्ये आहे.

सोनाली चितळे | Updated: April 19, 2017 4:23 AM

सुप्रसिद्ध रॉयल बेंगाल वाघांचे माहेरघर असलेले सुंदरबन जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.

जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल असे ज्याचे वर्णन केले जाते ते सुंदरबन बांगलादेशमध्ये आहे. त्याचा फार छोटा, पण महत्त्वपूर्ण भाग पूर्व भारतात दक्षिण टोकास आहे. या खारफुटीच्या जंगलात सुंदरीची आकर्षक झाडे अमाप आढळतात; त्यावरून हे नाव प्रचलित झाले. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या संगमातून जो अतिसुपीक दलदलीय प्रांत निर्माण झाला, त्याची छोटी छोटी अशी अंदाजे ५४ बेटे तयार झाली. खारे पाणी आणि उष्ण-दमट हवामान यामुळे प्रचंड मोठे खारफुटीचे वृक्ष आपणास येथे बघायला मिळतात. सुप्रसिद्ध रॉयल बेंगाल वाघांचे माहेरघर असलेले सुंदरबन जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. तिथे सद्य परिस्थितीत सर्वात जास्त वाघ आढळून आले आहेत. उन्हाळ्यात हिरव्यागार पाचूसारख्या जंगलामध्ये गेंदवा, खळसी तसेच लाल खेकडय़ासारखी दिसणारी कंकर फुले अमाप फुलतात. सायबेरियन क्रेन, येलो वग्टेल, सुतारपक्षी असे अनेकविध पक्षी इथे पाहायला मिळतात. उन्हात पहुडलेली मगर पाहणे इथे काही अवघड नाही. विषारी साप, सुसर, सरडे, इ. सरपटणारे प्राणी मुबलक बघायला मिळतात. गोधखली जेट्टीहून सुंदरबनसाठी फेरी बोट जातात. नामखाना हा सुंदरबनचा एन्ट्री पॉइंट आहे, जिथून अनेक बोटींद्वारे सुंदरबनला जाता येते. बोटीने सुंदरबनला खास आतले जंगल सवडीने बघत बघत जाण्यास मजा जास्त. बाली नावाच्या बेटावर कॅिम्पग करून आसपासच्या निरीक्षण मनोऱ्यावरून सभोवतालचा परिसर, वाघ, मगर, इ. प्राणी बघता येतात. सुंदरबनला तीन किंवा पाच दिवसांची क्रूझ घेऊन अनेक बेटांना भेट देत सुंदरबनच्या सौंदर्याला न्याय देता येतो. तेथील स्थानिक लोकांसाठीच्या मासेमारी तसेच हस्तकला, इ. रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्राला भेट देता येते. एका वेगळ्या अनुभवासाठी सुंदरबनच्या बेटावर राहून जेव्हा तेथील वन्यजीवन आपण बघतो, तेव्हा त्यांना त्रास होईल असे वर्तन आपल्या हातून घडणार नाही अशी काळजी घ्यायला हवी. जवळचा विमानतळ कोलकाता असून सप्टेंबर ते मार्च तेथे पर्यटनासाठी योग्य कालावधी आहे.

सोनाली चितळे sonalischitale@gmail.com

First Published on April 19, 2017 4:23 am

Web Title: beautiful places to see in the sundarban
  1. No Comments.