हिवाळ्यात युरोपचा प्रवास म्हणजे गारठवणाऱ्या थंडीशी गाठ . पण, हिवाळ्यात युरोप अनुभवण्यासारखा आहे आणि विशेष मजा आहे ती डिसेंबरमधल्या ख्रिसमस बाजारांत. युरोपभेटीत या बाजारांत फेरफटका मारायलाच हवा.

युरोपमध्ये फिरायला कधी जायचे तर साधारण उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच जून, जुलै, ऑगस्टमध्ये जाऊ  असाच विचार मनात येतो. हिवाळ्यात युरोपचा प्रवास म्हणजे थंडीशी गाठं .त्यामुळे तो नकोसाच, असे अनेकांना वाटते. पण हिवाळ्यातही युरोप अनुभवण्यासारखा आहे आणि विशेष मजा आहे डिसेंबरमधल्या ख्रिसमस मार्केट्समध्ये. ख्रिसमस मार्केट्स हे रस्त्यावर भरणारे बाजार. साधारणत:  ख्रिसमसच्या आधी चार आठवडय़ांपासून हे बाजार सुरू होतात.

या मार्केट्सची सुरुवात जर्मनीमध्ये मध्ययुगीन काळात झाली. ड्रेस्डेन शहरातील ख्रिसमस मार्केट १४३४ मध्ये सुरू झाले, तर इतर काही मार्केट्सचा उल्लेख त्याआधीही आढळतो. आता ख्रिसमस मार्केट्स युरोपमध्ये फारच लोकप्रिय झाली आहेत आणि सगळ्या छोटय़ा, मोठय़ा शहरांत अशी मार्केट्स पाहायला मिळतात. जर्मनीमध्येच या वर्षी २५०० हून अधिक मार्केट्स आहेत. एकटय़ा बर्लिन शहरातच ६० पेक्षा जास्त ख्रिसमस मार्केट्स आहेत. ड्रेस्डेन, न्यूर्नबर्ग, फ्रँकफर्ट, डॉर्टमुंड, कोलोन या जर्मन शहरांतली मार्केट्स विशेष लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर प्राग, क्रोएशियामधील झाग्रेब, व्हिएन्ना अशा अनेक ठिकाणची मार्केट्स प्रसिद्ध आहेत, ज्यांना लोक आवर्जून भेट देतात. लंडनमध्ये तसेच अमेरिकेत शिकागो, न्यूयॉर्क आणि इतर अनेक शहरांत ख्रिसमस मार्केट्स पाहायला मिळतात.

बऱ्याचदा ऐतिहासिक गावभाग, म्युझियम्स अशा ठिकाणी मार्केट्स  केली जातात. अशा ठिकाणी आयोजित केलेल्या मार्केट्समुळे ऐतिहासिक वास्तूंना नवी झळाळी मिळते. सगळी मार्केट्स साधारण एकसारखी असली तरी काही मार्केट्स मध्ययुगीन, बोहेमिअन, पोलिश अशा विशिष्ट विषयांवर आधारित असतात. ही मार्केट्स काही ठरावीक दिवशीच, साधारण शनिवार-रविवारी असतात. ख्रिसमस मार्केटमध्ये ख्रिसमस ट्री, रोषणाई तर बघायला मिळतेच, पण येशू ख्रिस्ताशी संबंधित काही देखावेही असतात. तसेच पारंपरिक संगीत, परेड आणि इतर कार्यक्रमही आयोजित केले जातात.

ख्रिसमस मार्केटमध्ये जिंजरब्रेडशी साधर्म्य असणारे लेबकुखन तसेच मागेनब्रोट, रोस्टेड अलमोण्डस, चेस्टनट्स, स्टोलन (केक) सारखे पारंपरिक पदार्थ मिळतात. हृदयाच्या तसेच विशिष्ट कार्टून स्वरूपात असणारे लेबकुखन फार लोकप्रिय आहेत. त्यावर विविध मेसेजसुद्धा पाहायला मिळतात. तसेच सॉसेजेस, पिझ्झा, क्रेप, बटाटय़ाचे पॅनकेक्स, ब्रेड अशा खाद्यपदार्थाची मार्केटमध्ये रेलचेल असते. ग्लुवाइन (दालचिनी इत्यादी मसाले अथवा सफरचंद, चेरी इ. फळांचा स्वाद असलेली वाइन, जी गरम करून प्यायली जाते)eierpunsch(अंडय़ापासून बनवलेले पंच), kinderpunsch खास लहान मुलांसाठी बनवलेले पंच) अशी गरम पेयही इथे मिळतात. यातील काही विशेष ख्रिसमसच्या सुमारासच उपलब्ध असतात.

त्याचबरोबर ख्रिसमस सजावटीसाठी उपयोगी साहित्य, तसेच भेट देण्यासाठी वस्तू ख्रिसमस मार्केट्समध्ये विकत घेता येतात. आकर्षक मेणबत्त्या, मेणबत्त्यांचे स्टॅण्ड, लाकडी वस्तू, काचेच्या वस्तू, कलाकुसर केलेल्या कापडी टेबलमॅटसारख्या अनेक गोष्टींचे स्टॉल्स इथे बघायला मिळतात. बऱ्याचदा स्थानिक कलाकारांनी बनवलेल्या वस्तू इथे विक्रीसाठी ठेवल्या जातात. या स्टॉल्सबरोबरच आकाशपाळणा, मेरी-गो-राऊंड आणि इतर अनेक राइड्समुळे ख्रिसमस मार्केटमध्ये जत्रेचे वातावरण असते.

दरवर्षी लाखो लोक ख्रिसमस मार्केट्सना भेट देतात. ख्रिसमस मार्केट्समुळे सर्वत्र जल्लोष, उत्साह पाहायला मिळतो. थंडीच्या मोसमात गरम वाइन आणि चविष्ट खाद्यपदार्थ आणि पारंपरिक संगीत अनुभवण्याची मजाच निराळी. सामाजिक भेटीगाठींसाठी हे एक उत्तम ठिकाण. त्याचबरोबर स्थानिक संस्कृतीची एक झलकही यातून पाहायला मिळते. अर्थात त्यासाठी डिसेंबरमध्ये युरोप दौरा करायला हवा.

shraddha6886@gmail.com