News Flash

वर्षां भटकंती : दैत्यासुर धबधबा

जामरूग गावाकडे जाणाऱ्या वाटेवरील पुलाच्या आधी उजवीकडे वळल्यावर आपण डुक्कर पाडय़ात पोहोचतो.

वर्षां भटकंती : दैत्यासुर धबधबा

आंबिवलीहून पुढे जामरूग गावाकडे जाणाऱ्या वाटेवरील पुलाच्या आधी उजवीकडे वळल्यावर आपण डुक्कर पाडय़ात पोहोचतो. येथूनच पुढे अनेक खासगी फार्म हाऊसचे प्रकल्प आहेत. हे फार्म हाऊस ज्या डोंगराच्या पायथ्याशी बांधले आहेत त्या डोंगराच्या माथ्यावर एक नैसर्गिक भगदाड म्हणजेच नेढे असल्यामुळे याला नाखिंडाचा डोंगर असे स्थानिक संबोधतात. कोथळीगडाच्या मध्यावर असलेल्या पेठेची वाडी गावाच्या समांतर उंचीवर नाखिंडा डोंगरालाही पदर सुटला आहे. (स्थानिके भाषेतील पदर म्हणजे एका विशिष्ट उंचीवर डोंगराला समांतर असलेले विस्तीर्ण पठार) याच पदरावरून अनेक धबधबे रांगेत खाली कोसळत असतात. यातलाच सर्वात मोठा धबधबा म्हणजेच दैत्यासुर धबधबा. कातळ भिंतीवरून रांगेत कोसळणारे हे धबधबे सजावटीसाठी लावलेल्या बत्ताशांच्या माळांप्रमाणे भासतात. या धबधब्याच्या तळाशी जाण्यासाठी तासाभराची बिकट चढाई करावी लागते. अजस्त्र धबधब्याचे रौद्र भीषण रूप पाहणे हा वेगळा अनुभव असला तरी तेथे जाणं धोक्याचे आहे. कारण हा प्रपात खूप उंचावरून कोसळत असतो. बिकट चढाईचे श्रम घ्यायचे नसल्यास फार्म हाऊसच्या प्रोजेक्टच्या मागे दोनचार कमी प्रवाहाचे धबधबे आहेत. तेथे पोहोचणे सोपे असून येथे धबधब्या खाली भिजण्याचा आनंद घेता येतो.
सोलान पाडा बंधारा
कर्जत रेल्वे स्थानकापासून अंदाजे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या जामरूग गावाच्या पुढे सोलान पाडा नावाची छोटीशी वाडी आहे. या वाडीच्या पुढे डोंगर पायथ्याशी हल्लीच एक छोटासा बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याचे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या सांडव्याची टप्प्या टप्प्यात उतरत जाणारी अशी विशिष्ट पद्धतीची केलेली बांधणी पर्यटकांच्या लोंढय़ाला कारणीभूत ठरत आहे. धरण भरले की अतिरिक्त पाणी लयबद्ध पद्धतीने एका टप्प्यावरून दुसऱ्यावर, दुसऱ्यावरून तिसऱ्या टप्प्यावर ओसंडून वाहू लागते आणि पाहणाऱ्याला एकावर एक असे अनेक धबधबे पहिल्याचा आनंद मिळतो. हे टप्पे जास्त खोल नसल्यामुळे येथे भिजण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जमते. अर्थात ही गर्दी टाळून थोडसे मागे डोंगराजवळ जायला हरकत नाही.
अगदीच डोंगरधारेला लागून असलेल्या या धरणाच्या जलाशयाच्या नयनरम्य देखाव्याला सुरेख जोड लाभली आहे ती पाठीशी उभ्या असलेल्या कातळ भिंतीवरून रांगेत कोसळणाऱ्या धबधब्यांची. नजर खिळवून ठेवणारा असाच हा नजारा म्हणावा लागेल.
गेल्या दोन वर्षांपासून सोशल मिडियावरून होणाऱ्या मोठय़ा प्रसिद्धीमुळे सुट्टीच्या दिवशी येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक जमू लागले आहेत. त्यामुळेच सुट्टीचे दिवस टाळून मध्येच एखादी खास रजा काढून येथे आवूर्जन भेट द्यायला हरकत नाही.
प्रीती पटेल patel.priti.28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2016 2:49 am

Web Title: daityasur waterfall
Next Stories
1 शिवालयांचे पाषाणसौंदर्य
2 दुचाकीवरून : ऑलिम्पिक स्पर्धा आणि सायकलिंग
3 लोक पर्यटन : तळेगाव परिसरातली पावसाळी भ्रमंती
Just Now!
X