01 June 2020

News Flash

धर्मराज मंदिर

 मंदिराची रचना अशी आहे की, मोसम नदीकिनारी एक उंच टेकडी आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नाशिक जिल्ह्यतील सर्वात मोठय़ा असलेल्या बागलाण तालुक्यात अनेक रहस्यमय आणि अचंबित करणाऱ्या वास्तू आहेत. गडकोट तर गगनचुंबी आहेतच, पण मंदिरेसुद्धा एकापेक्षा एक सरस आहेत. असेच एक मंदिर बागलाण तालुक्याच्या ईशान्य भागात मोसम नदीकिनारी वाघळे या गावी आहे. बागलाण तालुक्याला आठही दिशांना आठ वेशी व गडकोट आहेत. पांडव अज्ञातवासात असताना त्यांचा बागलाण व अश्मक म्हणजे कान्हरदेशात आजच्या खान्देशात मोठय़ा प्रमाणावर अधिवास होता. त्यामुळे येथील अनेक गावे पांडवांच्या नावाने वसली आहेत- जसे की, राजापूर पांडे, भीमाशंकर, नकुळवाडी, या गावी धर्मराज मंदिर आहे. काही लोक त्यास यमाचे मंदिर तर काही युधिष्ठिराचे मंदिर म्हणतात. या मंदिराची दोन प्रमुख वैशिष्टय़े आहेत. त्यातील पहिले असे की या मंदिरात मूर्ती नाही. तरीही तेथे रोज पूजा-अर्चा होते. दुसरे वैशिष्टय़ असे की गावातील लोक न्यायनिवाडा करण्यासाठी या मंदिरात येतात. कोणी गुन्हा करून खोटे बोलत असेल तर त्या व्यक्तीला मंदिरात नेतात.

मंदिराची रचना अशी आहे की, मोसम नदीकिनारी एक उंच टेकडी आहे. संपूर्ण दगडात बांधलेल्या मंदिराचा कळस मात्र १९५१ साली बांधला. त्याचीसुद्धा एक रंजक कथा आहे. १९५१ साली पावसात मंदिराचा कळस पडून गेला. त्यावेळी गावातील सर्व लोकांना पोटफुगी झाली. कितीही उपाय केले तरी अपायच होई. तेव्हा गावातल्या लोकांनी धर्मराजांना साकडे घालून कळस चढवला आणि एकाएकी सर्व गावाची पोटफुगी नाहीशी झाली, अशी दंतकथा सांगितली जाते. तेव्हापासून धर्मराजांवर गावाची श्रद्धा आहे. मंदिराबाहेर अनेक वीरगळी व सतीशिळा अस्ताव्यस्त पडल्या आहेत. ज्यांनी इतिहास गाजवला त्यांच्या स्मृती ओस पडल्या आहेत. प्राचीन गाव असल्याच्या अनेक वस्तू तेथे शाबूत आहेत. गावातच आणखी एक चंडिकेश्वरी देवीची प्राचीन मूर्ती आहे. पूर्वी या गावाचे नाव धर्मपुरी होते. पण वाघळे हे नाव १३व्या शतकात पडले. बागलाण तालुक्यातील अनेक आडनावे वाघळे गावावरून पडली असावीत असे वाटते. उदा. वाघे, वाघळे, वाघ, वाघेरे, वाघरे, वाघेला. या गावाजवळील आसखेडा व जायखेडा हीसुद्धा प्राचीन गावे आहेत. त्यांचा उल्लेख असीरखेटक व जायखेटक या नावाने राष्ट्रकूट राजा गोवद याच्या ताम्रपटात येतो. या ठिकाणीसुद्धा ऐतिहासिक पाऊलखुणा आहेत. या भागात मुल्हेर, पिसोळ व डेरमाळ हे गडकोट आहेत. त्यामुळे एक दिवसाच्या सहलीत हे मंदिर बघता येऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2017 1:33 am

Web Title: information about dharmaraja temple
Next Stories
1 पाणखोल जुवे
2 अद्भुत लॅन्सडाऊन
3 इंग्लंडमधील ‘वॉर्विक कॅसल
Just Now!
X