18 November 2017

News Flash

लोक पर्यटन : दुर्लक्षित दुर्गालेणे

प्रत्येक खांबाचे उभे बारा भाग लाकडी नक्षीनेच केले आहेत

विशाखा चितळे | Updated: August 30, 2017 10:00 AM

एखादं गाव नव्याने पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येतं तेव्हा तिथलं बघण्यासारखं सगळंच लक्षात येतं असं नाही. कधी कधी एखादी चांगली गोष्ट दुर्लक्षितच राहून जाते. असंच काहीसं घडतंय मुरुड गावाच्या बाबतीत. हे मुरुड म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यतल्या दापोली तालुक्यातलं समुद्रकिनारा लाभलेलं निसर्गरम्य गाव. याची दुसरी ओळख म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं हे गाव. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत हे गाव पर्यटन नकाशावर आलं ते इथल्या स्वच्छ, सुरक्षित समुद्रकिनाऱ्यामुळे.

याच गावात अगदी मोक्याच्या जागी, समुद्रावर जाण्याच्या मार्गावर सात-आठशे वर्षे जुनं दुर्गा मंदिर आहे. हेच ते दुर्लक्षित दुर्गालेणं. हे रूढार्थाने लेणं नाही. देवीचं देऊळ म्हणून फक्त दर्शन घेऊन परतणारेच जास्त. परंतु, या मंदिराचे खांब, छत सगळीकडे अप्रतिम लाकडी कोरीव काम केलेलं आहे.

आता उभं असलेलं मंदिर हे १७६३ साली बांधलेलं आहे. काळोत्री दगडाच्या ७ – ८ फूट उंच चौथऱ्यावर प्रशस्त सभागृह, गाभारा, प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. गाभारा आणि सभागृह यामध्ये देवीसमोर दर्शनाला साधारणत: ५० लोक उभे राहतील, एवढी मोकळी जागा आहे. प्रदक्षिणा मार्गात व गाभाऱ्याच्या चारही बाजूंना लाकडी खांब आहेत. त्यातील काही अर्धे व काही पूर्ण गोल आहेत.  हे सर्व खांब जवळजवळ दीड फूट व्यासाचे असून, प्रत्येक खांब दगडी बैठकीवर बसवलेला आहे. खांबाच्या चारही बाजूंना छताला आधार देण्यासाठी लाकडी भाले आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत सुंदर कोरीवकाम व शिल्पे आहेत.

प्रत्येक खांबाचे उभे बारा भाग लाकडी नक्षीनेच केले आहेत. या खांबांवर पानं, फुलं, फळं, मोर, पोपट, हत्ती, मगर, गेंडा, पक्षी अशा नक्षी कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यावरचे खांब व शेजारचे खांब यावर मात्र वैशिष्टय़पूर्ण शिल्पे आहेत. या खांबांच्या पायथ्याशी प्रत्येकी चार असे स्त्रिया आणि पुरुष, ढोल, वीणा वादन करणारे, नमस्कार मुद्रा, झांज वाजवणारे असे आहेत. तर वरच्या भागात एका वीणा वाजवणाऱ्या पुरुषाच्या शेजारी दोन सर्प आहेत. तर एका खांबावर एक मोठा सर्प वेटोळे घेतलेला आहे. बाकी पूर्ण खांबांवर मोर, पोपट, गेंडा, हत्ती हे बारा भागात आहेत. तसेच ध्यानस्थ असलेले, पद्मानसात बसलेले युवक कोरलेले आहेत. त्यातल्या एकाला पंख कोरलेले आहेत. एका खांबावर दोन तोंडे चिकटलेली व शेजारी दोन बाजूला दोन तोंडे, हातात दंड व कमंडलू घेतलेल्या युवकाचे शिल्प आहे. तर दुसऱ्या खांबावर चार तोंडे असलेल्या युवकाच्या हातात पुस्तके, तर कमरेला दोन पंख आहेत. अजून एका खांबावर एक घोडेस्वार असून शेजारी छत्रं धरलेला युवक आहे.

प्रत्येक खांब वेगळा आहे. कलाकुसर, रेखीवपणा मात्र अप्रतिम आहे. हे सारं कोरीवकाम ओबडधोबड नाही तर खूप लहान प्रमाणात आहे. तरी त्यातील मापं कुठेही चुकीची वाटत नाहीत.

देवळात पोर्तुगीजांच्या काळातील मोठी घंटा आहे. सभेची किंवा उत्सवातील कार्यक्रमाची सूचना म्हणून ती वाजवली जाते. देवळामागे मोठी पुष्करणी आहे. देवळासमोर नगारखाना व अत्यंत सुंदर काळ्या दगडातील दीपमाळ आहे. इथेच एक नऊ मण वजनाचा एक दगड असून तो उचलण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला दोन छिद्रे आहेत. या दगडाला नऊ मणकी म्हणतात. तो उचलण्याची पूर्वीच्या ग्रामस्थांत  शर्यत लागायची. आता नऊ मणकी केविलवाणी होऊन एका कोपऱ्यात पडून आहे. गावात सात ठिकाणी दगडांत कोरलेली देवीची पावले आहेत.

दुर्गेची मूर्ती कर्नाटकातून आणलेल्या गंडकी शिळेची व अष्टभुजा आहे. महिषासुरमर्दिनी रूपातील मूर्तीची मान थोडी तिरकी आहे. मंदिरासमोरच स्त्रियांना ज्ञानाचं मंदिर खुलं करणाऱ्या महर्षी कर्वे यांचा पुतळा आहे. मुरुड गाव मुंबई पुण्यापासून ५ – ६ तासांच्या अंतरावर असून दापोलीला तालुक्याच्या ठिकाणी एस.टी.ची सोयही आहे. गावात राहण्याची व जेवणाची उत्तम सेवा देणारी हॉटेल्स, रिसॉर्ट्स तसेच घरगुती सोयही आहे.

vishakhachitale7@gmail.com

First Published on August 30, 2017 10:00 am

Web Title: murud village dapoli ratnagiri