सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचं स्वागत करताना पर्याय तर असंख्य असतात. रोवानियामी हे सांताचं गाव तर  हा दीड महिना अतिशय उत्साहान सजलेलं असते. उणे सात अंश तापमानात सांताच्या गावी अतिशय जल्लोशात नवीन वर्षांचे स्वागत एकदा तरी अनुभवायलाच हवे..

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

नवीन वर्ष साजरं करण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं असं प्रत्येकालाच वाटत असतं. नवनवीन ठिकाणांचा शोध घेतला जातो. पण जगभरातील पर्यटकांच्या अजेंडय़ावर असणारं एक कॉमन आणि आयुष्यात एकदा तरी भेट द्यायचं ठिकाण म्हणजे सांताचे गाव. फिनलॅण्डच्या लॅपलॅण्ड भागातील रोवानियामी गावी सांताचं अधिकृत गाव आहे. नाताळ आणि नववर्षांच्या स्वागताला जगभरातील पर्यटकांच्या झुंडी या गावी येतात. उणे सात अंश तापमानात साराच गोठलेला परिसर आणि २४ तासांपैकी इनमिन दोन तास सूर्यप्रकाश असं येथील काहीसं गूढ वातावरण. नववर्षांच्या स्वागताला हे अख्खं गाव सजलेलं असतं. मुळातच पर्यटन हाच या गावाचा आधार आहे. गाव तसं छोटंच आहे. पण सांताच्या वास्तव्याने गावाला पर्यटनाचा आधार मिळाला आहे. तसेही येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असतेच, पण १ डिसेंबरनंतर खरी धम्माल सुरू होते.

संपूर्ण गावात रोषणाई केली जाते. मुळातच आर्टिक रेषेवर वसलेले हे गाव, त्यामुळे सूर्यप्रकाश कमीच. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर मग रोषणाई करताना जरा हात अधिकच सैल सोडला जातो. १ डिसेंबर ते १५ जानेवारी हा संपूर्ण काळ या गावात जणू काही नवचैतन्य पसरलेले असते.

ख्रिसमस मार्केट असते. हॉटेल्स, गल्लीबोळात कुठेही जा, सारं गाव सांतामय झालेले असते. अगदी विमानतळापासूनच आपल्याला या सांतामयतेची जाणीव होत राहते. लहानथोर सर्वानाचा या सांताचे आकर्षण असते. त्यातच सांताक्लॉज आणि बर्फ ही प्रतिमा आपल्या सर्वाच्या डोक्यात बसलेली असते. या गावी तिला मूर्त स्वरूप मिळते.

रोवानियामीमध्ये सांताचे अधिकृत निवासस्थान आहे. सांताज् व्हिलेज म्हणून ओळखला जाणारा हा भाग सात-आठ एकरांवर वसला आहे. सांताचे कार्यालय, पोस्ट ऑफिस, पार्क, संग्रहालय असा सांताचा पसारा आहे. सांताचे हे गाव पाहणे सांताबरोबर गप्पागोष्टी करणे त्याच्या बरोबर फोटो काढणे, नाताळ साजरा करणे आणि बर्फाने वेढलेल्या वातावरणात नवीन वर्षांची सुरुवात करणे हे पर्यटकांना विलक्षण अनुभूती देणारे असते. व्हाइट ख्रिसमस म्हणजेच बर्फ पडलेला असतानाचा नाताळ अनुभवण्यासाठी आणि नववर्षांच्या स्वागतासाठी हे उत्तम ठिकाण.

येथील मुख्य सांताची दरवर्षी निवड केली जाते. मग त्याचे अनुयायी जगभर भटकतात. तर हा मुख्य सांता येथे रोवानियामीमध्ये राहतो. सध्याचा सांता रशियन आहे. असे सांगितले जाते की, सांताचे वसतिस्थान लॅपलॅण्ड्समध्ये असून ते मोजक्याच लोकांना माहीत आहे. त्यामुळे १९८५ मध्ये रोवानियामीमध्ये सांताचे अधिकृत कार्यालय स्थापले गेले. दुसऱ्या महायुद्धात रोवानियामी बऱ्याच अंशी उद्ध्वस्त झाले होते. १९५० नंतर हे शहर पुन्हा उभारण्यात आले. असे सांगितले जाते की अमेरिकी अध्यक्ष रुझवेल्ट यांच्या पत्नी येथे भेट देण्यासाठी आल्या तेव्हा रोवानियामीतील अधिकाऱ्यांनी शहराच्या उत्तरेला आठ किलोमीटरवर एक केबिन तयार केली. ही वास्तू सांताच्या गावाची सुरुवात होती. आज ही केबिन सांताच्या पोस्ट ऑफिससमोर आहे.

सांताच्या गावातील मुख्य सांताबरोबर आपल्याला फोटो काढता येतात. त्यासाठी १५ युरो मोजावे लागतात. तसा येथील प्रत्येक वस्तूचा दर नेहमीपेक्षा थोडा अधिक आहे. पण ते जास्तीचे शुल्क सामाजिक कामांसाठी देणगी म्हणून सांताच्या कार्यालयातर्फे दिले जाते. सांताच्या गावात आणखी एक धम्माल गोष्ट अनुभवयाला मिळते. ती म्हणजे सांताचे पोस्ट ऑफिस. या पोस्टातून जगभरातील १८८ देशांमध्ये पत्रं पाठवली जातात. ही नेहमीची पत्रं नसतात तर खास सांताच्या सहीने ही पत्रं पाठवण्याची सोय येथे उपलब्ध आहे. सांताच्या घरातून पत्र आल्याचा आनंद देण्याची ही अनोखी शक्कल. आपल्या प्रियजनांना येथून शेकडो पत्रं रोज रवाना होत असतात. येथील पार्कमध्येदेखील एक सांता असतो. पण तो अनुयायी सांता. त्याच्याबरोबर मोफत छायाचित्र घेता येते.

ख्रिसमस साजरा केला जातो तो मात्र वैयक्तिक स्वरूपात. त्यानंतर मात्र सेलिब्रेशनचा मूड वाढत जातो. अत्यंत आकर्षक अशा रोषणाईत नववर्ष खुणावू लागते. सांताच्या या सहवासाबरोबरच येथे बर्फावरील साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद घेता येतो. स्नो मोबाइल, स्नो स्कूटर्स, रेनडिअर स्लेजिंग, डॉग स्लेजिंग असे भन्नाट प्रकार येथे अनुभवता येतात. अलास्कन हस्की जातीच्या कुत्र्यांच्या साहाय्याने ओढल्या जाणाऱ्या गाडीचा आनंद धम्माल असतो. उणे सात तापमानात हा सारा आनंद घेण्यात वेगळीच मजा असते. येथे सूर्यप्रकाश अगदीच कमी असतो, पण जो काही एक-दोन तास मिळतो तेवढय़ा वेळात आकाशात जी काही रंगांची उधळण होती ती पाहणे आल्हाददायक असते.

रोवानियामीमध्ये छोटीमोठी अनेक हॉटेल्स आहेत. तसेच होम स्टेच्या सुविधादेखील उपलब्ध आहेत. अर्थात एकूणच स्कॅनडेव्हियन देशांमध्ये भटकणे तसे महाग आहे. केवळ सांताच्या गावाला भेटणे हे तसे महाग वाटू शकते. त्यामुळेच त्या जोडीने किनुरा येथील बर्फातील हॉटेल आणि रोवानियामीच्या पलीकडे जाऊन नॉदर्न लाइट अशी भटकंती करता येऊ शकते. साधारण लाखभर रुपयांमध्ये ही भटकंती अगदी आरामात होऊ शकते. फक्त अगदी वर्षअखेरीस गेलात तर मात्र हॉटेलच्या दरात दुप्पट-तिप्पट वाढ झालेली असते. त्यामुळे डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा खर्चाच्या दृष्टीने योग्य ठरतो.

आत्माराम परब atmparab2004@yahoo.com