News Flash

भूतानचे पक्षीवैभव

भूतानचे पक्षीवैभव पाहायचे असेल तर नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम.

भूतानचे पक्षीवैभव
भूतानचे पक्षीवैभव पाहायचे असेल तर नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम.

भूतान हा सुखी माणसांचा देश. भूतानचा पर्यटनस्नेही हंगाम मार्च ते जून आहे, असे मानले जाते. पण, भूतानचे पक्षीवैभव पाहायचे असेल तर नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम. सृष्टीसौंदर्यात भर घालणारे नानाविध पक्षी तिथे या कालावधीत सहज दृष्टीस पडतात.

एखाद्या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला की मग त्या पर्यटनस्थळाचा सिझन अमुकतमुक आहे, वगैरे गोष्टींची चर्चा सुरू होते. त्यानुसार त्या पर्यटनस्थळी गर्दी वाढू लागते. पण कधी कधी हे ठरावीक  सिझन सोडून भटकायचे ठरवले तर मग अनेक नवीनवीन गोष्टी आकर्षू लागतात. भूतानच्या बाबतीत हे नेमकं लागू पडते. भूतानचा पर्यटनस्नेही सिझन म्हणजे मार्च ते जून. पण त्याऐवजी जर आपण नोव्हेंबर ते मार्च या काळात भूतानला गेलो तर आपल्याला एका अनोख्या सौंदर्याचा आनंद घेता येतो. तो म्हणजे तेथील पक्षीवैभव. या काळात तेथे थंडीचे प्रमाण प्रचंड असते. कधी कधी तापमान उणे दोनचार अंशापर्यंत जाते, तर सर्वसाधारणपणे पाच अंशावर स्थिरावलेले असते. पण याच काळात तेथील सृष्टीसौंदर्य खुलून येते. नानाविध असे स्थलांतरित पक्षी आणि तेथील स्थानिक पक्षी याच काळात नजरेस पडतात. भूतानच्या निसर्ग चक्रात हा कालावधी म्हणजे सुगीचा महिना म्हणावा लागेल.

भूतानच्या या अफाट पक्षीवैभवामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. भूतान हा पर्यावरणसमृद्ध असा देश आहे. म्हणजे तेथील लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने जंगलाचे प्रमाण किमान ६२ टक्के हवे, पण आज भूतानमधील जंगलांचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे हा देश कार्बन निगेटिव्ह म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी म्हणजेच जेथे पक्ष्यांसाठीचे नैसर्गिक अधिवास इतके समृद्ध असतील तर तेथील निसर्गसाखळीत पक्ष्यांचे प्रमाणदेखील तितकेच समृद्ध होणार हे ओघानेच आले. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा पक्षी म्हणजे ब्लॅक नेक क्रेन. एरव्ही हा पक्षी तसा दुर्मीळ होत चाललेला, पण भूतानच्या फोब्जिका व्हॅलीमध्ये एकाच वेळी किमान २०० च्या आसपास ब्लॅक नेक क्रेन तुम्हाला अगदी सहज पाहता येतील. या ब्लॅक नेक क्रेनच्या नावाने तेथे एका महोत्सवाचे आयोजन केले जाते. तर कमी पाण्यात किंबहुना पाण्यापासून लांब राहूनच जगणारे ब्लड फेजनट, हिमालयीन मोनाल असे पक्षी अगदी सहज दिसतात. जोडीला कॉलर्ड क्रॉसिबल, पिग्मी कपिवग, यलो रंपेड हनी गाइड, व्हाइट ब्रोड रोझिफच हेदेखील असतात. तर पाण्याशी निगडित ज्यांचा अधिवास आहे असे आयबीज बिल, ग्रेट पॅरोट बिल हेदेखील मुबलक प्रमाणात आढळतात.

अत्यंत आकर्षक असे सृष्टीचं वैभव पाहायचे असेल तर मात्र तुम्हाला भूतानला नोव्हेबर ते मार्च या काळात जावे लागेल. तेदेखील भूतानच्या पूर्व भागात अधिक. िथपू हे तेथील मोठं शहर. तर पारो येथे विमानतळ आहे. पारोपासून पुनाखा व्हॅली, फोब्जिका व्हॅली, ताशीथांग व्हॅली अशा प्रदेशात खास पक्षी पाहण्यासाठी आपण जाऊ शकतो. काही पक्षी हे तुम्हाला ठरावीक उंचीवरच दिसू शकतात. त्यासाठी चेरेला पासमध्ये जावे लागते. तर भारत-भूतानच्या सीमेवरील मानस राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग भूतानमध्येदेखील येतो. तेथेदेखील मुबलक पक्षीवैभव आहे. किमान धडपड करूनदेखील १०० हून अधिक प्रजातीचे पक्षी अगदी सहजपणे पाहू शकता हेच येथील जैववैविधतेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

भूतान हा तीन देशांच्या सीमांना जोडणारा देश आहे. पण तरीदेखील तेथील पर्यटन नियंत्रित स्वरूपात आहे. त्याचे कारण म्हणजे प्रचंड महागडा असा पर्यटन व्हिसा. भारतीयांसाठी हा व्हिसा मोफत असला तरी युरोपियन अथवा अन्यांसाठी तोच आकार किमान २५० डॉलर्स इतका असतो. त्यामुळे भूतानने चांगल्या प्रमाणात येथील वैविधता जपली आहे. अर्थात तेथे बर्ड टुरिझम अजून पूर्णाशाने विकसित झाले नसले तरी तेथे प्रचंड संधी आहे.

थिम्पू आणि पारो येथून तुम्हाला पक्षी निरीक्षणासाठी खास मार्गदर्शक मिळू शकतात. पण तुमचा चमू मोठा असेल तर त्यांचा दिवसाचा खर्च भागवणे सहज शक्य होऊ शकते. किमान आठ ते दहा दिवसांची ही टूर आखावी लागेल. जंगलांच्या आसपासच्या भागातील गावांमध्ये काही ठिकाणी होम स्टेची सुविधा आहे, तर काही ठिकाणी कॅिम्पगदेखील करता येते.

भूतान हा जगात सुखी माणसांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील उत्तर पूर्व भागातील काही राज्यांमध्येदेखील जैववैविधता प्रचंड आहे, पण त्याच्या जतनासाठी तुलनेने प्रयत्न कमी झाले आहेत. तसेच तेथील लोकांच्या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत जे आकाशात उडते ते खाद्य असते अशी समजूत दूर होणार नाही. भूतानने अतिशय परिश्रमपूर्वक तेथील जनतेच्या मनात अनेक गोष्टी रुजवल्या आहेत. शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत केल्या आहेत. भूतानचा राजा वर्षांतून एकदा तरी प्रत्येक गावाला भेट देतोच. या सर्वामुळे भूतान आजही त्याची समृद्धता जपून ठेवू शकला आहे. त्यामुळेच अशा या अद्भुत देशात पक्षी पाहण्याची संधी आवर्जून घ्यायला हवी.

आत्माराम परब atmparab2004@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2017 2:17 am

Web Title: the birds of bhutan tours
Next Stories
1 वन पर्यटन : गुरेघर वनसंशोधन केंद्र
2 जायचं, पण कुठं? : पाचगणी
3 लोक पर्यटन : अद्भुत मुडबिद्री
Just Now!
X