नावीन्याची हौस आणि नव्या साहसांची ओढ साहसवीरांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे हजारो गिर्यारोहकांनी पालथ्या घातलेल्या सह्य़ाद्रीत एखाद्या अज्ञात किल्ल्याचा शोध लागतो. शेकडो सुळके सर करूनही एखादा सर न झालेला सुळका सर होतो. कुणी कोकणकडय़ावरून बेस जंप करतो. कुणी स्लॅक लाइन या खेळाची सह्य़ाद्रीत सुरुवात करतो. कुणी घाटवाटांचा ध्यास घेऊन अनेक वष्रे वापरात नसलेल्या वाटांचा मागोवा घेते. आपली कसोटी पाहणारी सह्य़ाद्रीतील आव्हाने हे साहसवीर शोधून काढतात, त्याला भिडतात आणि यशापयशाची तमा न बाळगता त्यांचा पिच्छा पुरवतात. यावरून लक्षात येते की, या सह्य़ाद्रीत करण्यासारखे अजून खूप आहे फक्त  चिकाटी आणि हिंमत हवी.

प्रस्तरारोहणातील नवीन आणि वेगळी आव्हाने स्वीकारत, चक्रम हायकर्सच्या सभासदांनी २०१३ मध्ये हटकेश्वरजवळील तेलीण हा २०० फूट सुळका अजिंक्य अशा पश्चिम बाजूने सर केला. २०१३ मध्येच माणिकगड लिंगीच्या दक्षिण बाजूने प्रथमच ४७५ फुटांचे आरोहण करून यशस्वीपणे लिंगीचा माथा गाठला. तर २०१४ मध्ये प्रबळगडाच्या कलावंतीण डोंगराच्या बाजूलाच असलेल्या डोंगरातील ३३० फूट अजिंक्य भेग चढून जाऊन त्या डोंगराच्या माथ्यावर पहिल्यांदाच पाऊल ठेवले. नवीन सुळके आणि आरोहण मार्गावरील चढाईचा ध्यास घेतलेल्या चक्रमांनी २०१६च्या डिसेंबरमध्ये एक आणि जानेवारी २०१७ मध्ये दोन अशा तीन अजिंक्य चढाई मोहिमा यशस्वी केल्या.

रायगड जिल्ह्य़ातील माणिकगडाला खेटून माणिकगडिलगी सुळका आहे. गड आणि सुळका यामधील खिंडीतून जेमतेम १०० फुटांचे सोपे प्रस्तरारोहण करून त्याच्या माथ्यावर पोहोचता येते. प्रामुख्याने याच मार्गाने त्यावर चढाई होते. पण २०१३ मध्ये दक्षिण बाजूने लिंगीवर आरोहण केल्यावर चक्रमांना त्या लिंगीच्या पश्चिम बाजूस असलेली ३०० फुटांची सरळसोट उभी भेग आव्हान देत होती. २ डिसेंबर २०१६ला मोहीम चमू माणिकगडाच्या पश्चिमेस स्थित उतेश्वर गावातून निघाला. दोन तासांच्या चालीवर असलेल्या मारुती मंदिराच्यापुढे तळछावणी उभारली. पहिला १०० फुटांचा टप्पा अतिकठीण आहे. प्रथम १२ फुटांचे उभे आरोहण. त्यानंतर पूर्ण चढाई भेगेमधून आहे. ४० फुटांवर एक अंगावर येणारा दगड त्याने सावधगिरीने पार केला. पुढे तिरक्या दिशेने वर जाणाऱ्या भेगेत चिमणी आरोहणाचे तंत्र वापरत आशीषने पुढील ६० फुटांचा टप्पा पार करून त्या दिवसाची चढाई थांबवली. ३ डिसेंबरला चढाई सुरू झाली ती उर्वरित २०० फूट उभ्या भेगेतून. ही चढाई पूर्ण केली आणि तीन वर्षे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले.

लगेचच पुढील मोहीम ठरली- कोंडोबाची लिंगी. तारीख ७ जानेवारी २०१७. हटकेश्वरहून लेण्याद्रीकडे जाणाऱ्या डोंगररांगेवर हा सुळका आहे. उंची २३० फूट. गोद्रे गावातून चढून जाऊन तिथे तळछावणी उभारली. राजेश पाटील याने सुळका चढाईस आरंभ केला. सुरुवातीची १०० फुटांची चढाई खूप कठीण नाही. पण पायाखालील दगड निसटल्याने राजेश अचानक १० फूट घसरला, पण स्वत:ला सावरत त्याने चढाई चालू ठेवली. पुढील चाळीस फूट उत्कृष्ट आरोहण करून राजेशने तो टप्पा पार केला. त्यानंतर ४० फुटांच्या भेगेतून चढाई करत तो भेगेच्या वर आला. अंतिम पन्नास फुटांच्या चढाईत अंगावर येणाऱ्या दगडाला वळसा घालून राजेश सुळक्याच्या माथ्यावर पोहोचला. अजिंक्य कोंडोबाची लिंगी सर झाली आणि चक्रमांचे इच्छित लक्ष्य साध्य झाले.

चक्रमचा चमू २० जानेवारी २०१७ रोजी सिंदोळा किल्ल्याकडे पुढील मोहीमेसाठी निघाला. लक्ष्य होते सिंदोळ्याच्या पूर्व बाजूची साधारण २०० फुटांची सरळसोट उभी भेग. भेगेच्या बाजूस उतरणाऱ्या सोंडेवर तळछावणी उभारून सुदर्शन कानडे याने चढाईस आरंभ केला. पहिला ९० फुटांचा दगड आणि घसारामिश्रित टप्पा पार करून तो भेगेच्या तळाशी पोहोचला. दोन-तीन प्रयत्नांनंतर पुढील टप्यावर त्याला चढाई करता येईना. मग राजेश पाटीलने चढाईची सूत्रे स्वत:कडे घेतली. २२ जानेवारीला सकाळी लवकर राजेशने चढाई सुरू केली. चिमणी आरोहणाचे तंत्र कौशल्याने वापरून राजेश  माथ्यावर पोहोचला. दोन महिनांच्या कालावधीत चक्रम हायकर्सच्या तीन अजिंक्य मोहिमा यशस्वी झाल्या. या मोहिमा प्रसाद म्हात्रे आणि आशीष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली होत्या. चमूत सुदर्शन कानडे, राजेश पाटील, विनय जाधव, कौस्तुभ कुलकर्णी, सचिन पाटील आणि राजन महाजन यांचा समावेश होता.

विनय जाधव vinay.ucs@gmail.com