महानगरांच्या गदारोळात पशुपक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास टिकून राहणे तसे कठीणच असते. मुंबईसारख्या महानगरातील जंगल म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहेच, पण याच महानगराच्या सीमेवर आणखी एक ठिकाण खास पक्ष्यांसाठी संरक्षित करण्यात आले आहे. ते म्हणजे ठाणे खाडी परिसर.

दलदलीची जागा हाच ज्या स्थलांतरित पक्ष्यांचा निवाऱ्याचा निकष असतो त्यांच्यासाठी हे संरक्षित ठिकाण म्हणूनच महत्त्वाचे ठरते. ऊंच मान, लांब बारीक पाय, गुलाबी-पांढरे पंख यामुळे आपले लक्ष वेधून घेणाऱ्या रोहित (फ्लेिमगो) पक्ष्यांचे असेच एक हक्काचे निवासस्थान म्हणजे ठाणे खाडी परिसर. येथील जैववैविध्याचे रक्षण व्हावे या उद्देशाने ६ ऑगस्ट २०१६ रोजी शासनाने ठाणे खाडी रोहित पक्षी अभयारण्याची घोषणा केली. सुमारे १६९० हेक्टर क्षेत्र असणाऱ्या या ठिकाणी ८९६ हेक्टर क्षेत्र हे कांदळवनाचे आहे. तर ७९७ हेक्टर क्षेत्र हे समीपचे जल क्षेत्र म्हणून गणले जाते. ठाणे खाडी, मुलुंड, विक्रोळी, भांडुप, कांजूर, मंडाले अशा आसपासच्या खाडीकिनारच्या क्षेत्रांचा यात समावेश होतो.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?

भौगोलिकदृष्टय़ा ठाणे-मुंबई हा दख्खन पठाराचा भूभाग आहे. जो क्रिटेशस काळात ज्वालामुखीच्या उत्सर्गाने तयार झाला असे सांगितले जाते. उल्हास नदी मुखाशी ठाणे खाडी निमुळती व उथळ असून तिची खोली व रुंदी समुद्रापाशी वाढत जाते. खाडीकिनाऱ्यांवर गाळाने बनलेल्या दलदली आढळून येतात, ज्यांच्यावर कांदळवने व तिवरांची झाडे वाढली आहेत. या कांदळवनांच्या अस्तित्वामुळे ठाणे खाडी ही एक अत्यंत महत्त्वाची परिसंस्था झाली आहे.

या भागातील जंगलांमध्ये मुख्यत: दाट सदाहरित कांदळवन व साहाय्यक झाडांच्या प्रजाती आढळतात. येथे कांदळवन, तिवर व साहाय्यक झाडांच्या नऊ प्रजाती आढळतात. कांदळवने ही मत्स्य व इतर कवचधारी प्रजाती जसे खेकडे यांच्या प्रजननासाठी बहुउपयोगी आहेत. या पाणथळ जागा जगातील महत्त्वाच्या पक्षी क्षेत्रांमध्ये गणल्या जातात.  रोहित पक्षी व इतर वैविध्यपूर्ण पक्ष्यांच्या संवर्धनास मदत करतात. चिखलातील खेकडे व निवटी मासे हे येथे मोठय़ा संख्येत प्रजनन करतात. या नाजूक परिसंस्थेवर मनुष्यवस्तीचा पडणारा ताण कमी व्हावा, येथील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी ऐरोली पुलापासून वाशी पुलापर्यंत, ठाणे खाडीची पश्चिम किनारपट्टी ‘ठाणे खाडी रोहित पक्षी अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आली आहे.

कांदळवनाशी संबंधित सर्व घटकांमध्ये पर्यावरण व जैवविविधतेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील सागरी व किनारी भागाच्या नैसर्गिक वैभवाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी शासनाच्या कांदळवन कक्षाने जीआयझेड प्रकल्पाच्या माध्यमातून ऐरोली येथे सागरी जैवविविधता केंद्राची स्थापना केली आहे. हे केंद्र सागरी जैवविविधतेवर आधारित भारतातील एकमेव केंद्र असून ते ठाणे खाडी रोहित पक्षी अभयारण्याचे प्रवेशद्वारदेखील आहे. लवकरच हे केंद्र निसर्गप्रेमींना नौकाविहारामार्फत येथील जैवविविधतेची झलक दाखवेल. थोडक्यात काय, तर थेट महानगरातच अनोखे पक्षीवैभव जपले जाईल आणि त्याचा आनंद सर्वच जण घेऊ शकतील.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com