पंढरपूरचा अस्सल अनुभव घ्यायचा असेल तर आषाढीलाच जावं किंवा गणेश विसर्जनाची खरी धम्माल चौपाटीवरच अनुभवता येते. याच धर्तीवर म्हणायचं तर रेन फॉरेस्टची हिरवी छाया आणि मुसळधार पावसाचा धो धो अनुभव घ्यायचा असेल तर ऐन पावसाळ्यात अगुंबे गाठावं. दक्षिण भारताचं ‘चेरापुंजी’ या सार्थ टोपणनावाने प्रसिद्ध असलेलं अगुंबे कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यात वसलेलं आहे. कर्नाटकातील इतर अनेक छोटय़ा गावांसारखंच असलेल्या या गावातील मुख्य आकर्षण म्हणजे शंकर नाग दिग्दíशत ‘मालगुडी डेज’ साठी याच गावातील सव्वाशे वर्षे जुने घर वापरण्यात आले होते, गावाच्या चौकात आपली परंपरा जतन करणारी ही वास्तू आहे. अगुंबे जसं धो धो पावसासाठी प्रसिद्ध आहे तसंच अगुंब्याचं नाव जोडलेलं आहे ते जगातल्या सर्वात लांब विषारी सापाबरोबर अर्थात किंग कोब्राबरोबर. म्हणून तर स्थानिक भाषेत इथलं जंगल ‘किलगा मने’ म्हणजे किंगकोब्राचं घर म्हणून ओळखलं जातं. मात्र म्हणून घाबरायचं कारण नाही, गेली अनेक शतकं इथले स्थानिक या सर्पराजाबरोबर गुण्या गोिवदाने नांदत आले आहेत. उडुपीहून अगुंब्याकडे निघालो की इथल्या पर्जन्यरानाची पहिली चाहूल लागते ती सोमेश्वरनंतरचा घाट चढायला लागलो की, भोवताली हिरव्या हिरव्या झाडांची दाटी व्हायला लागते, हवा थंडगार होऊ लागते आणि पावसाच्या धारा नृत्याने जणू तुमचे स्वागत होते. हिरव्यागार जंगलाला खेटून असलेल्या सुपारीच्या बागा, त्यातली छोटी कौलारू घरं आणि अधूनमधून शेतात काम करीत असलेले गावकरी असं निसर्गचित्र आणि त्यावर छाया आकाशातल्या काळ्या काळ्या मेघांची. या मेघमालेतून ओघळणारे जलिबदू कधी तांडव करत येतात तर कधी हळुवारपणे बरसत राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम घाटाच्या म्हणजेच आपल्या सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून २११० फुटांवर अगुंबे वसलेलं आहे. इथे वर्षांला सर्वसाधारणत: आठ हजार मिलिमीटर इतका पाऊस पडतो. डोंगररांगा आणि आकाशातून बरसणाऱ्या धारांमुळेच इथला अनोखा अधिवास निर्माण झाला आहे. सोमेश्वर अभयारण्य, कुद्रेमुख नॅशनल पार्क यांच्या मध्ये पसरलेल्या अगुंब्याच्या जंगलाला मुकाम्बिका अभयारण्य आणि शरावती व्हॅली अभयारण्य याचीही जोड मिळालेली आहे. अगुंबेच्या या जंगलात फिरताना सोबत स्थानिक वाटाडय़ा आवश्यकच. या दाट जंगलातील पायवाटांची माहिती असल्याखेरीज आत शिरायचा विचारही मनात आणू नये. नॅशनल जिओग्राफिकच्या माहितीपटातील अ‍ॅमेझॉनच्या जंगलाचं दृश्य इथे तुम्ही वास्तवात अनुभवू शकता. अवघे शंभर सव्वाशे वष्रे वयोमान असलेली आणि ज्यांच्या शेंडय़ाकडे पाहताना डोक्यावरची टोपी नक्की खाली पडते अशी उंच उंच झाडे, त्यांची भली भक्कम आणि रुंदावलेली खोडे – त्यांना बट्रेसेस म्हणतात! आणि या झाडांच्या पायातळाशी वाढलेली झुडपे, या हिरव्या पसाऱ्याला जोड मिळते ती डोंगर-उतारावरून आणि झाडांच्या गर्दीतून खळाळत वाहणाऱ्या प्रवाहांची. इथल्या आकाशाकडे झेपावलेल्या झाडांचा आधार जसा हॉर्नबिल, मलबार ट्रोगोन, एशियन फेअरी ब्लू बर्ड, ऑरेंज मिनिव्हेट, श्रीलंकन फ्रॉगमाउथ अशा पक्षिगणांना आहे, त्याचप्रमाणे इथल्या पाणपसाऱ्याचा फायदा अ‍ॅम्फिबियन्स म्हणजे उभयचरांना होतो. अगुंब्याच्या जंगलाची खासियत म्हणजे दिवसा या रानातल्या सिकाडांची सिम्फनी सतत सुरू असते आणि काळोख पडू लागला की बेडकांच्या मफली सुरू होतात. बुश फ्रॉगपासून ते ग्लाइिडग फ्रॉगपर्यंत आणि फंगॉइड फ्रॉगपासून ते डािन्सग फ्रॉगपर्यंत विविध प्रकारचे बेडूक इथे आहेत. अगुंब्याच्या जंगलात दिवसा फिरताना कधी जायंट वूड स्पायडर, सिग्नेचर स्पायडर, ब्लू मॉर्मान, पॅरिस पिकॉकसारखी फुलपाखरं तर कधी चक्क ड्रॅको म्हणजे उडता सरडा, लायन टेल मकाक नाही तर आपलं शेकरू इथे पाहायला मिळतो. जिथे दिवसाही सूर्याचे किरण सहसा पोचत नाहीत अशा किर्र्र रानात रात्री फिरताना एक वेगळाच थरार अनुभवता येतो. प्रखर टॉर्चच्या प्रकाशात झाडाच्या फांदीवर दबा धरून बसलेलं मलबार पीट व्हायपर अचानक दिसलं की आधी काळजाचा ठोकाच चुकतो. पण हा भिडू आपल्या भक्ष्याची वाट पाहात तिथे शांतपणे बसून राहणार आहे आणि तुम्ही लांबून फोटो काढलात तरी त्याची हरकत नाही हे समजल्यावर हायसं वाटतं. रात्रीच्या वेळेसच टोरांटूला सारखा सहसा दिवसा न दिसणारा कोळी पाहायला मिळू शकतो. शिवाय दिवसा फक्त आवाजी अस्तित्व दाखवणारे सिकाडा अनेकदा रात्रीच्या वेळी मोल्टिंग करताना म्हणजे कात टाकताना दिसायची शक्यता जास्त असते.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agumbe hill station karnataka
First published on: 19-07-2017 at 06:47 IST