पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड स्थानकापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोटी गावानजीकचा चिंचोटी धबधबा हे पावसाळी भटकंतीचे मुंबईकरांचे पहिल्या पसंतीचे ठिकाण. बस आणि रिक्षाच्या सहज उपलब्धतेमुळे चिंचोटीला पोहोचणे सुकर झाले आहे. गावातूनच ओढय़ाच्या कडेकडेने जाणारी ठळक पायवाट तास-दीड तासात आपल्याला धबधब्याशी घेऊन जाते. वाटेतील जंगलातील हिरवाई पाहून मन उल्हासित झाल्याशिवाय राहात नाही. धबधब्याच्या पोटाशी असलेल्या डोहात पोहण्याची मजा काही औरच. पण जुलअखेपर्यंत येथील कातळावर शेवाळ साचल्याने  सगळा परिसर निसरडा होतो. त्यामुळे येथे वावरताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा जोर वाढून प्रवाह धोकादायक होतो. अशा वेळी डोहात उतरण्याचा मोह टाळलेलाच बरा. धबधब्याच्या वरून जाणारी एक पायवाट जंगल तुडवीत तुंगारेश्वरकडे घेऊन जाते. ट्रेकिंगचा अनुभव असलेल्यांनी हा छोटासा ट्रेक आजमवायला काहीच हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुंगारेश्वर

तुंगारेश्वर अभयारण्याच्या घनदाट वनराईत आकंठ बुडालेल्या या शिवधामाला श्रावणमासी भाविकांची ही गर्दी लोटते. त्यात मंदिराशेजारून वाहणाऱ्या प्रवाहात ठीकठिकाणी निर्माण होणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा धबधब्यांची रेलचेल भिजऱ्या मनांना इथपर्यंत आणते. वसई रोड स्थानकापासून ७ किलोमीटर अंतरावरील तुंगारेश्वर फाटय़ापर्यंत शेअर रिक्षांची ये-जा सतत सुरू असते. पुढे चार किलोमीटर पायपीट करायची नसल्यास खासगी रिक्षा थेट गेटपर्यंत नेऊन सोडते. तेथून कच्च्या मातीच्या सडकेवरून जाताना दोन-तीन वेळा ओढा ओलांडताना पाय ओले करत तासाभरात आपण देवळापाशी पोहोचतो. आवारात पूजेच्या सामानाची दुकाने तसेच चहा-नाश्त्याच्या टपऱ्या दिसतात. या भागाचे विशिष्टय़ म्हणजे येथील जैवविविधता. जंगलाशी  खऱ्या अर्थी एकरूप व्हायचे असेल तर येथे एखाद्या जाणकारासोबत जंगलात एक फेरफटका मारावाच. अनेक प्रजातींची फुलपाखरांनी जंगल समृद्ध आहे. ट्रेकिंगची हौस भागवायची असेल तर तुंगारेश्वर ते माथ्यावरील परशुराम कुंड असा छोटा सोपा ट्रेक करता येऊ शकतो.

पेल्हार धरण

पावसाळ्यात अतिपरिचित ओढे, धबधब्यांच्या ठिकाणांवर लोटणारी तुडुंब गर्दी चुकवून आडवाटेने भटकायची इच्छा असल्यास वसई रोड स्थानकापासून १० किलोमीटर अंतरावरील पेल्हार धरण परिसर हे योग्य ठिकाण आहे. डोंगर, हिरवळ, झरे असं नयनरम्य समीकरण जुळवून आणणारं हे एक शांत ठिकाण आहे. वसईला पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाच्या पाठीमागील तुंगारेश्वर डोंगरातून खळाळत वाहणारे अनेक ओहोळ या धरणात येत असतात. धरणाची कमाल पातळी ओसंडून वाहणारे पाणी पाहायला बरीच गर्दी जमते.

patel.priti.28@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous monsoon picnic spot near mumbai
First published on: 29-06-2016 at 01:15 IST