महाराष्ट्रात ऐतिहासिक ठिकाणांची आणि निसर्ग चमत्कारांची कमी नाही. गरज आहे जरा आडवाट करून तिथे जाण्याची. सातवाहन राजवटीपासून इतिहासाच्या पाउलखुणा जपणारा हा आपला प्रदेश! किल्ले, घाटवाटा, मंदिरे, जंगले, समुद्रकिनारे यांनी भरभराटीला आलेला आपला प्रदेश. इथे ऐतिहासिक स्थळांना तोटाच नाही. त्याचसोबत विविध नैसर्गिक, भौगोलिक चमत्कारांनीदेखील महाराष्ट्र संपन्न आहे. ऐतिहासिक ठिकाण आणि निसर्गचमत्कार यांचा सुंदर मिलाफ एकाच ठिकाणी पाहायचा असेल तर संगमनेरजवळ असलेल्या पेमगिरी गावी जायला हवे. पुणे-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या अलीकडे डाव्या हाताला पेमगिरीचा रस्ता जातो. या रस्त्याने अंदाजे २० कि.मी. गेले की आपण पेमगिरी या ऐतिहासिक गावी पोहोचतो. गावाचा पाठीराखा आहे पेमगिरीचा किल्ला. इ.स. १६३३-३४चा काळ. निजामशाही बुडाल्यावर नाणेघाटानजीक असलेल्या जीवधन किल्ल्यावर मूर्तजा नावाचा निजामशाहीचा वारस तुरुंगात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होता. शहाजीराजांनी त्याला तिथून ताब्यात घेतले आणि त्याचसोबत जुन्नर-संगमनेर-नाशिकपासून त्र्यंबकेश्वपर्यंतचा प्रदेशसुद्धा जिंकून घेतला. या सर्व प्रदेशाचा स्वामी म्हणून त्यांनी त्या बाल निजामशहाला आपल्या मांडीवर बसवून राजे त्याचे वजीर बनले. त्याच्या नावाने राज्यकारभार पाहू लागले. दुर्दैवाने इ.स. १६३६मध्ये शहाजहान आणि आदिलशहाच्या संयुक्त फौजांपुढे शहाजीराजांना पराभव स्वीकारावा लागला आणि माहुली इथे झालेल्या तहात त्यांना या मूर्तजा निजामशहाला रणदुल्लाखानाच्या हाती सोपवावे लागले. ह्य सर्व घटनांचा केंद्रिबदू होता हा पेमगिरीचा किल्ला. शहागड असेही याचे एक नाव आहे. ऐतिहासिक पेमगिरी गावात एक जुनी विहीर असून त्यावर शिलालेख आहे. किल्ल्यावर जायला पायऱ्या बांधलेल्या आहेत. तसेच वरती खडकात खोदलेल्या पायऱ्या लागतात. माथ्यावर जायला अर्धा तास खूप झाला. किल्ल्यावर पेमादेवीचे छोटेखानी मंदिर आणि खडकात खोदलेले पाण्याचे एक भले मोठे खांबटाके शिल्लक आहे. गडावरून सभोवतालचा परिसर मोठा रमणीय दिसतो.

याच पेमगिरी गावापासून जवळच एक भला थोरला वटवृक्ष आहे. भला थोरला म्हणजे किती तर त्यांच्या मूळ खोडाचा पत्ताच लागत नाही. जवळजवळ तीस खोडांचा विस्तार आणि त्याच्या पारंब्या मिळून अंदाजे चार एकर एवढा परिसर या झाडाने व्यापला आहे. त्या झाडाचं वय काही शतके नक्की असणार. या पारंब्यांच्या मधून आपल्याला आतपर्यंत जाता येते. मध्यभागी शेंदूर फासलेले काही दगड, वीरगळ ठेवलेले आहेत. या वडावर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळेच हा वटवृक्ष अजून उभा आहे. जशी अनेक आंब्यांची आमराई होते तशी ही भल्यामोठय़ा वडाची वटराई इथे पाहायला मिळते. कलकत्त्याच्या शिवपुरी उद्यानातील वडाचे झाड तसेच दक्षिण भारतातील अडय़ार इथला वटवृक्ष हे प्रसिद्ध आहेत. पेमगिरीचा हा भव्य वटवृक्ष तितकाच दर्जेदार आहे. अकोले, भंडारदरा परिसरात भटकंतीसाठी जाताना या सुंदर ठिकाणाला अवश्य भेट द्यावी.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical places in maharashtra
First published on: 19-10-2016 at 05:28 IST