गोवा म्हटलं की नारळी-पोफळीची झाडं, अथांग समुद्र, निळाशार किनारा, फेसाळणाऱ्या लाटा, मासे आणि स्वस्तात मिळणारी देश-विदेशी मद्यं, असं चित्र डोळ्यासमोर येतं. पण, त्यापलीकडेही गोवा आहे. जरा डोळसपणे पाहिलं तर प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळांसह निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला समृद्ध गोवा दृष्टिपथास येतो.
गोव्यात मीरामार, अंजुना, कलंगुट असे अनेक सुंदर बीच आहेत. मात्र, बीचसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याने आता परिपूर्ण पर्यटन केंद्राच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे. सुमारे ४५० वष्रे गोव्यावर राजवट राहिलेल्या पोर्तुगीजांचा प्रभाव येथे प्रकर्षांने दिसतो. विशेषत: जुन्या गोव्यातील पर्यटनस्थळांचा वारसायादीत समावेश झाला आहे. त्यातील एक म्हणजे सेंट ऑगस्टीन चर्च. आता तेथे चर्च अस्तित्वात नाही. मात्र, या चर्चचा भाग असलेला सेंट ऑगस्टीन टॉवर अवशेषरूपात असला तरी दिमाखात उभा आहे. सेंट ऑगस्टीन चर्चच्या अवशेषांचा युनेस्कोने १९८६ मध्ये जागतिक वारसायादीत समावेश केला आहे. दुसरे महत्त्वाचे जागतिक वारसा स्मारक म्हणजे ‘बझिलिका ऑफ बॉम जेसस’. या स्मारकात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा पुतळा आहे. तेथील कलादालन उत्तम आहे. हे स्मारक पोर्तुगीजांच्या अप्रतिम वास्तूकलेची साक्ष देते. गोव्यातील अनेक किल्ल्यांपैकी महत्त्वाचा मानला जाणारा किल्ला म्हणजे ‘रेईस मागोस फोर्ट’. गोव्यातील प्रसिद्ध मांडवी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्यात पोर्तुगीजांच्या काळात व्हाइसरॉय आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती राहायच्या. किल्ल्याचे संवर्धन कसे करावे, हे समजण्यासाठी हा किल्ला पाहायलाच हवा.
गोव्यात पोर्तुगीजांनी सप्तकोटेश्वरसारख्या मंदिराचा विध्वंस केला तरी या मंदिरासह अनेक मंदिरे आज डौलाने उभी आहेत. त्यात प्रसिद्ध महादेव मंदिराबरोबरच श्री भगवती, श्री चंद्रनाथ, श्री दामोदर, श्री महालक्ष्मी , मंगेशी अशा सुमारे दोन डझनहून अधिक प्रसिद्ध मंदिरांचा समावेश आहे. यातील बहुतांश मंदिरे पणजीपासून जवळपास ५०-६० किलोमीटरच्या अंतरावर असल्याने एका दिवसात तीन-चार मंदिरांचे दर्शन सहज होते.

trek5
हॉट एअर बलून

गोव्यात वन्य प्राण्यांची तीन अभयारण्ये आहेत. गोव्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरील मोलेमजवळ असलेले भगवान महावीर अभयारण्य हे त्यातील सर्वात मोठे आहे. मांडवी नदीलगत डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यही हळूहळू पर्यटकांचे आकर्षण ठरू पाहत आहे. शिवाय करमळी रेल्वे स्थानकापासून दोन-तीन किलोमीटरवर ‘बर्ड वॉचिंग साइट्स’ आहेत. तिथे आतापर्यंत पक्ष्यांच्या सुमारे ५०० प्रजाती पाहावयास मिळाल्या आहेत. त्यातील पक्ष्यांच्या सुमारे ३० टक्के प्रजाती विदेशातील आहेत. हे पक्षी थंडीच्या मोसमात तेथे येतात आणि उन्हाळा सुरू होताच स्थलांतर करतात. त्यामुळे हे पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी तेथे ऑक्टोबर ते मार्च यादरम्यान भेट द्यायला हवी.
गोव्यातील खाद्यसंस्कृतीत मसाल्याला मोठे महत्त्व आहे. फोंडा आणि परिसरात सुमारे डझनभर ‘स्पाइस प्लान्टेशन फार्म’ आहेत. तिथे हार घालून आणि टिळा लावून पारंपरिक पद्धतीने तुमचे स्वागत केले जाते. स्वागतपेय म्हणून तुम्हाला ‘हर्बल टी’ दिला जातो. त्यानंतर तेथील प्रशिक्षित गाइड तुम्हाला शिवारफेरी घडवितो. आपल्याला मसाल्याच्या बऱ्याच पदार्थाची तोंडओळख माहीत असते. मात्र, या पदार्थाच्या औषधी गुणधर्माबाबत गाइडकडून माहिती मिळाल्यानंतर आपली बोटे तोंडात जातात. शिवारफेरीनंतर केळीच्या पानावर घरगुती जेवणाचा आनंद घेता येतो. जेवणाआधी गोव्याची प्रसिद्ध काजुफेणीही दिली जाते.
पणजीत मांडवी नदीतील ‘पॅराडाइज क्रूझ’ ही बोट सफरही उत्तम आहे. या बोट सफरीत गोव्याची तीन लोकनृत्ये सादर केली जातात. प्रत्येक लोकनृत्यानंतर उपस्थितांना मंचावर बोलावून नाचण्याची संधी दिली जाते. आधी मुले, त्यानंतर जोडपी आणि नंतर पुरुषांना मंचावर नाचण्याचा आनंद घेता येतो. गोव्यात ‘पिणं’ स्वस्त आणि खाणं महाग आहे. शिवाय बहुतांश हॉटेलमध्ये जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जातात. म्हणजे बहुतांश मोठय़ा हॉटेलांत दुपारी तीननंतर लंचची आणि रात्री ११ नंतर डिनरची ऑर्डर घेतली जात नाही. मात्र, वेळेचे नियोजन जमले तर गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची मजा घेता येईल. हॉट एअर बलूनिंगबरोबरच हेलिकॉप्टर राइडची सुविधा गोवा पर्यटन महामंडळाने नुकतीच सुरू केली आहे. त्याचाही आनंद घेता येईल.

सुनील कांबळी sunil.kambli@expressindia.com