सदाहरित कोकणात कुठल्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती अविस्मरणीय असते. लाल माती, वळणावळणाचे रस्ते, कौलारू घरे आणि सर्वत्र हिरवी गर्द झाडी. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गाचा हा हिरवेपणा अजूनच दाट झालेला आहे. सुट्टय़ांच्या हंगामात मालवण, तारकर्ली, देवगड, कुणकेश्वर ही ठिकाणे पर्यटकांनी फुललेली दिसतात. त्यातच सागरी मार्ग झाल्यामुळे या ठिकाणांची एकमेकापासूनची अंतरेसुद्धा कमी झालेली आहेत. एका बाजूला समुद्राची साथ आणि बाजूने जाणारा रस्ता आपला प्रवास अजून रमणीय करतो. मालवणला जाऊन शिवस्पर्शाने पुनीत झालेला डौलदार सिंधुदुर्ग बघणे आणि मग खास मालवणी पदार्थाचा आस्वाद घेणे हे तर सरळसोट पर्यटन झाले. पण याच परिसरात अनेक रम्य आणि अनोखी ठिकाणे दडलेली आहेत. त्यांचा शोध घेतला तर अगदी वेगळे ठिकाण बघितल्याचा आनंद मिळतो. पर्यटकांच्या कोलाहलापासून कोसो दूर असलेली ही ठिकाणे गर्द झाडीत दडून गेलेली आहेत. त्यातलेच एक ठिकाण म्हणजे पाणखोल जुवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाव ऐकून काहीच बोध होत नाही म्हणून आधी नावाचा खुलासा करू या. जुवा म्हणजे खाडीतील छोटेसे बेट. वर्षांनुवष्रे रेती, गाळ, वाळू साठल्याने खाडीत या बेटांची निर्मिती झाली आहे. मालवण-मसुरे रस्त्यावर मालवणपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर हडी हे गाव आहे. त्याच्या अलीकडे कालावल नदीवर प्रशस्त पूल झाला आहे. त्या पुलावर उभे राहून पूर्वेकडे पाहिले असता नदीपात्रात काही छोटी छोटी बेटे दिसतात. त्यांपकी जुवा खोल हे लहान तर जुवा पाणखोल हे मोठे बेट आहे. त्याच्या शेजारी अजून एक जुवा असून त्याला बंडाचे जुवे असे म्हणतात. अशी जवळजवळ आठ बेटे या ठिकाणी आहेत. त्यातले जुवा पाणखोल हे हडी गावाच्या हद्दीत येते तर जुवा खोत हे मसुरे गावाच्या हद्दीत.

हडी गावातून जो रस्ता या जुव्याकडे जातो तो खाडीपाशी येऊन संपतो. इथून समोरच आपल्याला गर्द झाडीने वेढलेले बेट दिसते. हेच पाणखोल जुवे. जुव्यावर जायला गाडीरस्ता नाही. इथून पुढे जुव्यावर जाण्यासाठी होडीतून जावे लागते. अंदाजे ५० एकर क्षेत्रफळ असलेल्या पाणखोल जुवा या बेटावर सुमारे दोन-तीनशे लोकांची वस्ती आहे. एक छोटेसे गावच या बेटावर वसलेले आहे. या गावात वाडोलेश्वर मंदिर आणि एक शाळाही आहे. नारळी-पोफळीची दाट झाडी येथे आहे. त्यामध्ये समुद्रफळाची काही झाडे दिसतात. या झाडाला असंख्य लोंबणारे तुरे येतात. ते हारांसारखे लटकलेले दिसतात. या लटकलेल्या हारांना रात्री लाल फुले उमलतात. ही लाल फुले पहाटेपर्यंत गळूनही पडतात. सकाळी त्या झाडाखाली पडलेल्या फुलांचा लाल गालीचा तयार झालेला असतो. नीरव शांतता असलेल्या या बेटावरच्या दाट झाडीत असंख्य पक्षी दिसतात. पाण्यासाठी या ठिकाणी विहिरी आहेत. आश्चर्यकारकरीत्या या विहिरीचे पाणी साखर घातल्यासारखे गोड आहे. आपण साधे पाणी पीत नसून, नारळाचे पाणी पितो आहोत इतकी गोड चव या पाण्याला लागते. भातशेती आणि नारळाचे उत्पन्न हेच इथल्या लोकांचे चरितार्थाचे साधन आहे. गावातली बरीच मंडळी मालवणला रोजगारासाठी जातात. नीरव शांतता, पर्यटकांची अजिबात गर्दी नाही, ऐन खाडीतले छोटेसे बेट, असा काही वेगळाच पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल तर पाणखोल जुव्याला अवश्य भेट द्यावी. मात्र आपल्या तिथे जाण्याने तिथला निसर्ग आणि तिथली शांतता भंग होणार नाही याची खबरदारी मात्र अवश्य घ्यावी.

आशुतोष बापट

ashutosh.treks@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about konkan tourism
First published on: 27-12-2017 at 01:32 IST