अलिबागपासून सात-आठ किलोमीटरवर असलेले नागाव हे टुमदार गाव. तीन सुंदर शिवमंदिरे आणि एक शिलालेख यामुळे हे गाव पर्यटकांना आकर्षित करते. नागावमध्येच भिमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. यालाच काही लोक भीमनाथाचे मंदिर असेही म्हणतात. सुंदर पुष्करणीने हे मंदिर आपले स्वागत करते. कमानीतून आत शिरल्यानंतर उजव्या हाताला एक छोटीशी विहीर खोदलेली दिसते. मंदिराशेजारी सापडलेला शिलालेख किंवा अक्षीचे प्रसिद्ध गद्धेगळ किंवा एकंदर मंदिराच्या बांधकामाची पद्धत पाहता मूळ मंदिर हे शिलाहारकालीन असावे. मात्र, त्याला शास्त्रीय पुरावा किंवा संदर्भ काही सापडत नाही. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन पुरातन मूर्ती आहेत. तळ्याची साफसफाई करताना या मूर्त्यां सापडल्याचे पुजारी सांगतात. मोठी मूर्ती विष्णूची आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यापकी उजव्या हाताच्या प्रवेशद्वाराजवळ एक शिलालेख आहे. दोन-अडीच फूट लांब आणि १.५ फूट रुंद असणारा हा शिलालेख पूर्वी गावात होता. पण मंदिराचा जीर्णोद्धार झाला तेव्हा तो मंदिराजवळ आणण्यात आला, असे सांगण्यात येते. हा लेख देवानगरीमध्येच आहे. लेख चांगल्या पद्धतीने कोरलेला असल्याने लेखातील सर्व अक्षरे स्पष्टपणे वाचता येतात. हा लेख शके १२८९ मधील आहे. या लेखात खूप वेळा सिहीप्रो या नावाचा उल्लेख येतो. सिहीप्रो हा हंबीररावांचा मुख्य प्रधान. सिहीप्रो याने अष्टगर प्रांतामधील (अलिबाग ते रेवदंडा या भागातील गावे) नागाव आगारातील चिचावळी या गावात एक मशीद उभारून तेथे रत्नदीप लावण्यासाठी काही दान दिले आहे. तसेच  लेखातही इतरही आगरी ग्रामस्थांना दान दिल्याचा उल्लेख आढळून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भीमेश्वर मंदिर हे आतून खूप शांत आहे. मंदिरात दोन गाभारे असून एकात शिवशंकर आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. मंदिरात करण्यात आलेली लाकडी कलाकुसर सुंदर आहे. एकंदरच नागाव, भीमेश्वर मंदिर, नागेश्वर, वंखनाथाचे मंदिर आणि नागावचा किनारा हे सर्व एका दिवसात सहज जमून येऊ शकेल.

शंतनू परांजपे

sdparanjpe@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagaon village
First published on: 16-11-2016 at 03:36 IST