उत्तरेला चीन आणि दक्षिण, पूर्व व पश्चिमेला भारत या दोन देशांच्या मध्यभागी असलेला लहानसा आणि अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला देश म्हणजे नेपाळ. जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एव्हरेस्ट, साऱ्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे जन्मस्थान, हिमालयातील पर्वतरांगा, दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आणि सात राष्ट्रीय उद्याने यांमुळे जगभरातील लाखो पर्यटक नेपाळला भेट देतात. गेल्या वर्षभरात नेपाळला सातत्याने भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसल्याने येथील पर्यटकांची संख्या अचानक रोडावली. या संकटातूनही उभारी घेत असलेल्या नेपाळने वर्षभरानंतर पुन्हा पर्यटकांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. नेपाळची राजधानी असलेले काठमांडू शहर फिरण्यास आणि तेथील नेपाळी संस्कृती जवळून अनुभवण्यास उत्तम आहे. पश्मिना शाल, बौद्ध संस्कृतीची साक्ष देणाऱ्या विविध वस्तू, कुकरी (चाकूसारखे हत्यार), नदीतील गुळगुळीत गोटय़ांमध्ये केलेले नक्षीकाम, नेपाळी इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तू, कोरलेल्या बुद्धमूर्ती आणि गरम कपडे अशा विविध वस्तूंची मनसोक्त खरेदीसाठी पर्यटकांची झुंबड न उडाली तरच नवल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेकिंगसाठी नेपाळ विशेष प्रसिद्ध आहे. पर्यटकांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या डोंगररांगा, जैवविविधता, माळरानावर मोठय़ा प्रमणात आढळणारी फुले, फुलपाखरे, वेगवेगळी झाडे, नद्यांचे खोरे यांमुळे ट्रेकिंग अतिशय सुलभ आणि आनंददायी ठरते. राफ्टिंग हादेखील येथील पर्यटकांना खुणावणारा प्रकार आहे. राफ्टिंगसाठी पर्यटक काही दिवस नदीकिनारीच राहणे पसंत करतात. नेपाळमधील नद्या महामार्गापासून दुरून वाहतात. नदीकिनारा अतिशय स्वच्छ, स्वच्छ आणि गरम पाणी ही या नद्यांची वैशिष्टय़े आहेत.

नेपाळमध्ये हिंदू, बौद्ध त्याप्रमाणे इतर धर्मातील नागरिकांची संख्याही मोठी आहे. भारत आणि नेपाळची संस्कृती बऱ्याच प्रमाणात मिळतीजुळती आहे. येथील खाद्यसंस्कृतीत विविधता आढळते. मो-मो म्हणजे मोदकासारखा पदार्थ आणि थकाली हे येथील प्रसिद्ध पदार्थ आहेत. नेवारी खाद्यपदार्थही प्रसिद्ध आहे. संपूर्ण नेपाळमध्ये मांसाहार मोठय़ा प्रमाणात केला जात असल्याने येथे मटण आणि चिकनला मागणी आहे. त्याचप्रमाणे तांदूळ मोठय़ा प्रमाणात पिकवला जात असल्याने येथील भाताला असलेली चव अफलातून आहे. येथे कोणत्याही हॉटेलमध्ये शाकाहारी थाळी मागितल्यास त्यात डाळ-भात, चार वेगवेगळ्या भाज्या असे पोटभर जेवण कमी किमतीत मिळते.नेपाळमधील विविध राज्यांमध्ये प्राचीन हिंदू मंदिरे असल्यामुळे या मंदिरांना भेटी देण्यासाठी भारतीय पर्यटक नियमितपणे नेपाळमध्ये येत असतात. ८० टक्क्यांपेक्षा अधिक हिंदू धर्मीयांची संख्या असलेल्या नेपाळमध्ये बौद्ध संस्कृती रुजत आहे. विविध ठिकाणी बौद्ध विहारे आणि बौद्ध स्तंभ हे येथील वैशिष्टय़ आहे. पोखरा येथील ‘वर्ल्ड पीस पगोडा’ (शांती स्तूप) या ठिकाणी जपान, श्रीलंका, नेपाळ (लुम्बिनी) आणि थायलंड येथील वेगवेगळ्या मुद्रेतील बौद्ध मूर्तीची स्थापित केलेल्या आहेत. जगभरातील पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.

शिस्तबद्ध धुळवड..

भारतातील होळीच्या एक दिवस आधीच नेपाळमध्ये धुळवड खेळली जाते. शिस्तबद्ध धुळवड हे या देशातील एक वैशिष्टय़च ठरावे. एखाद्याला उगाचच रंग लावणे हा येथे गुन्हा ठरतो. त्यानुसार तक्रार केल्यास शिक्षेची तरतूद आहे. धुळवड खेळताना अगदी साधे आणि कोरडे रंग वापरले जातात. खास नेपाळमधील होळीचा अनुभव घेण्यासही तिथे पर्यटक गर्दी करतात.

भूकंप आणि आंदोलनातून सावरलेला नेपाळ

भूकंप आणि मधेशी समाजाने केलेल्या आंदोलनामुळे नेपाळमधील पर्यटकांची संख्या रोडावली होती. मात्र, भूकंपांनंतर जगभरातून मदत मिळाल्यामुळे नेपाळ भूकंपाच्या धक्क्यातून सावरला. तसेच, मधेशी समाजाचे आंदोलनही संपुष्टात आले. त्यामुळे नेपाळ पर्यटन मंडळाने भारतातील आणि जगभरातील पर्यटकांना साद घातली आहे. यासाठी पुढील महिन्यात भारतात ‘रोड शो’ आयोजित करण्यात येणार आहे. नेपाळमधील एकूण पर्यटकांमध्ये दरवर्षी भारतातील सरासरी २५ तर चीनमधील १० टक्के पर्यटकांचा समावेश असतो. नेपाळमधील ७५ जिल्ह्य़ांतील केवळ १० भागांमध्ये भूकंपाचा परिणाम झाला होता. मात्र, आता नेपाळ पर्यटनासाठी सुरक्षित असल्याची माहिती नेपाळ पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय प्रमुख दीपकराज जोशी यांनी दिली.

पोखरा : एक संस्मरणीय अनुभव

काठमांडू शहरापासून पोखरा हे ठिकाण २०३ किलोमीटर अंतरावर असून महामार्गाने येथे पोहोचण्यास सहा तासांचा कालावधी लागतो. नेपाळमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. या शहरातील फेवा सरोवर जगभरातील पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. परदेशी पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे येथे पाश्चिमात्य संस्कृती खोलवर रुजली आहे हे शहरात फेरफटका मारल्यावर लगेचच लक्षात येते. सरोवरात नौकाविहारास पर्यटकांची गर्दी असते. रात्रीच्यावेळी रस्त्यांवर संगीत सादर करणारे कलाकार जागोजागी आढळतात. सायंकाळी सातच्या सुमारास पबमध्ये तरुण-तरुणींची गर्दी वाढते. या वेळी नेपाळी आणि भारतातील प्रसिद्ध गाण्यांवर उपस्थित ठेका ठरतात. पर्यटकांना येथे खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात वाव असला तरी वस्तूंच्या किमती जास्त आहेत, हे लक्षात ठेवावे.

umesh.jadhav@expressindia.com

More Stories onनेपाळNepal
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal tourism
First published on: 30-03-2016 at 10:27 IST