महाराष्ट्र हा जसा विविध मंदिरांनी समृद्ध आहे, त्याचसोबत आगळ्यावेगळ्या, फारशा कुठे न आढळणाऱ्या दुर्मीळ मूर्तीसुद्धा राज्यात सहज पाहायला मिळतात. मग ती मरकडी मंदिरावरील सदाशिवाची किंवा खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरील धन्वंतरीची असो. अतिशय दुर्मीळ आणि वैशिष्टय़पूर्ण मूर्ती आणि मंदिरांनी महाराष्ट्र नटला आहे. त्यातही मराठवाडय़ात तर अशा विविध मूर्तीची आणि मंदिरांची अगदी रेलचेल आहे. त्यातलीच एक अतिशय दुर्मीळ आणि वेगळी मूर्ती आपल्याला नांदेड जिल्ह्य़ातल्या मुखेड इथे पाहायला मिळते.

नांदेडपासून दक्षिणेला ७५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुखेड या तालुक्याच्याच ठिकाणी वसले आहे महादेव मंदिर. मुखेडचे हे मंदिर खरोखर अगदी निराळे असेच म्हणावे लागेल. याच मंदिरावर एक दुर्मीळ शिल्प पाहायला मिळते आणि ते म्हणजे ज्येष्ठा. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले, पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केले अशी कथा पुराणात आढळते. दक्षिण भारतात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे, तर गाढव हे तिचे वाहन असते.  मरीआई यांची देवता असेही तिचे वर्णन काही ठिकाणी आलेले आहे. मुखेडच्या महादेव मंदिरावरील हिचे शिल्प अत्यंत देखणे आहे. इथे ही ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्मुख असून उजव्या वरच्या हातात केरसुणी आहे, तर एका हातात सुरा आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले, तर डोक्यावर मुकुट घातला असून तिच्या डाव्या खांद्यावरून एक मुंडमाळा खाली लोंबते आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव हे दिसते आहे. अत्यंत दुर्मीळ असे हे शिल्प एक आगळेवेगळे नक्कीच आहे. या वेगळ्या शिल्पासोबतच अत्यंत देखण्या, अतिशय प्रमाणबद्ध आणि नृत्यामध्ये रममाण झालेल्या अशा सप्तमातृका मुखेडच्या याच महादेव मंदिरावर पाहायला मिळतात. खूपच दुर्मीळ असा हा शिल्पठेवा जपला गेला पाहिजे. मराठवाडा पर्यटनात मुखेडला आवर्जून भेट द्यावी आणि हा दुर्मीळ ठेवा पाहावा. जर तिथे पर्यटक, अभ्यासक मुद्दाम मोठय़ा संख्येने गेले आणि त्यांनी हा ठेवा पाहिला, अभ्यासला तरच हा अनमोल ठेवा जपला जाईल.

uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Sanjay Raut talk about Monopoly of mp and mla in Western Maharashtra in sangli
पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांना आपलीची मक्तेदारी असे वाटते- संजय राऊत
rohit pawar anaji pant marathi news
‘आधुनिक अनाजी पंतांनी आमचं घर फोडलं, तीन-चार पवार तिकडे गेले, पण…’, रोहित पवारांचे रोखठोक प्रतिपादन

आशुतोष बापट

ashutosh.treks@gmail.com