पुरातन काळापासून निवाऱ्यासाठी तंबूचा (टेंट) वापर होत आहे. आता याचा वापर सर्कस, समारंभ, सैन्यात आदींसाठी केला जातो. तंबूचा वापर गिर्यारोहणातही केला जातो. कँपिंग, ट्रेकच्या वेळी रात्री मुक्कामासाठी, प्रस्तरारोहण मोहिमांमध्ये बेस कँपला याचा वापर होतो. वेगवेगळे उपयोग लक्षात घेऊन त्याप्रमाणे तंबू तयार केले जातात. उदा. स्पोट्स टेंट, कँिपग टेंट, किचन टेंट, स्टोअर टेंट, एक्स्पीडिशन टेंट. आकाराप्रमाणे टेंटचे मुख्यत: दोन प्रकार पडतात. डोम टेंट व हट टेंट किंवा अ आकाराचा टेंट. ट्रेकिंगचे साहित्य विकणाऱ्या दुकानांत आता टेंट सहज उपलब्ध असल्यामुळे तसेच ऑनलाइन शॉपिंगद्वारे ते घरबसल्या मिळू लागल्यामुळे सहय़ाद्रीतील टेकिंगमध्येही टेंटचा वापर वाढला आहे. थंडी, वारा, सरपटणारे प्राणी, कीटक यांपासून बचाव करण्यासाठी टेंटचा उपयोग होतो.
प्रकार
गिर्यारोहणात प्रामुख्याने डोम टेंटचा वापर केला जातो. वेगवेगळय़ा वातावरणात/हवामानात वापरण्यासाठी वेगवेगळी वैशिष्टे असलेल्या टेंटचा वापर केला जातो. टेंट कोणत्या हंगामास वापरण्यास योग्य आहेत, याची माहिती त्यावर दिलेली असते. वन सीजन, टू सीजन, थ्री सीजन अशा प्रकारे त्यांचे वर्गीकरण केले जाते. वन सीजन टेंट हे उन्हाळय़ात वापरण्यासाठी असतात. थ्री सीजन टेंट हे उन्हाळा, पावसाळा व हिवाळय़ात वापरण्यासाठी योग्य असतात. फोर सीजन टेंट हे जोराचा पाऊस, वादळी वारे, जोराची हिमवृष्टी अशा अतिशय प्रतिकूल वातावरणात त्यांनी टिकाव धरावा अशा उद्देशाने ते तयार केले जातात.
डोम टेंट : डोम टेंटचा आकार घुमटाकार असतो. थोडय़ा फार प्रमाणात आकारात बदल करून डोम टेंटचेही काही प्रकार उपलब्ध केले गेले आहेत. या प्रकारच्या टेंटचा पाया आयताकृती असतो. यामध्ये दोन पोल असतात जे एकमेकांना छेद देत लावले जातात. पोल लावल्यानंतर त्यांचा आकार धनुष्यासारखा होतो. पोलची टोके अडकवण्यासाठी रचना केलेली असते.
अ शेप टेंट : हे टेंट उभारल्यानंतर त्यांचा आकार इंग्रजी अ अक्षरासारखा दिसतो. यामध्ये तीन पोल असतात. दोन पोल दोन टोकाला असतात व त्यांना सांधणारा एक मधला पोल असतो. हे टेंट काहीसे वजनदार असतात. डोम टेंटच्या मानाने यात कमी जागा मिळते. (क्रमश:)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेंट विकत घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी
टेंट विकत घेताना किमतीचा विचार करावा.
ट्रेक करताना पाठीवर जास्त वजन असल्यास लवकर थकवा येतो. यासाठी कमी वजन असलेल्या टेंटची निवड करावी.
टेंटमध्ये किती जण सामावू शकतात ते पाहावे.
कोणत्या हंगामात टेंटचा वापर होणार त्याप्रमाणे कोणता टेंट घ्यायचा ते ठरवावे.
टेंट उभारण्याची किंवा लावण्याची पद्धत सोपी असावी. पोलच्या साहाय्याने सहजतेने ते लावता आले पाहिजेत.
अशोक पवार-पाटील – ashok19patil65@gmail.com

More Stories onहायकिंग
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tents for hiking
First published on: 06-04-2016 at 01:37 IST