नयनरम्य आमळी

धुळे, नंदूरबार हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे काही पर्यटनासाठी फारसे प्रसिद्ध नाहीत.

धुळे, नंदूरबार हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे काही पर्यटनासाठी फारसे प्रसिद्ध नाहीत. पण याच जिल्ह्य़ांच्या अंतर्गत भागात आमळी, अलालदरीसारखी काही नयनरम्य ठिकाणंदेखील दडलेली आहेत.

महाराष्ट्राचे पश्चिम टोक म्हणजे धुळे, नंदूरबार. नंदुरबार हा धुळ्यापासूनच वेगळा झालेला जिल्हा. धुळे शहराची काही वैशिष्टय़े आहेत. जसे की नगररचना. चौकोनी गल्ल्यांचे शहर आहे हे. इथल्या सात जुन्या आणि सहा नंतर वाढलेल्या अशा तेरा गल्ल्या पायीच फिरायला हव्यात. धुळ्यात समर्थ वाग्देवता मंदिर आणि राजवाडे वस्तुसंग्रहालय अशा दोन महत्त्वाच्या वास्तू आहेत. एकविरा देवीचे मंदिर गावात आहे. धुळ्याच्या पांझरा नदीला क्वचितच पाणी असते. उन्हाळ्यात ऊन प्रचंड असते. पण तरीही धुळ्याच्या पश्चिम टोकाला भात मोठय़ा प्रमाणात पिकवला जातो. धुळ्याचे पश्चिम टोक म्हणजे साक्री तालुक्यातील कोंडाईबारीजवळचा भाग. धुळे-साक्री-दहिवेल माग्रे कोंडाईबारीकडे जाता येते. दहिवेल फाटय़ापासून पाच एक किलोमीटरवर कोंडाईबारी येते. कोंडाईबारीकडून आमळी गावाकडे जायचा फाटा लागतो. कोडाईबारी हा खरे तर जंगल आणि घाट परिसर आहे. आमळी फाटय़ाला वळलो तरी डोंगर परिसराचा आनंद घेत पुढे जाता येते. सगळा आदिवासी परिसर आहे. शांत आणि नयनरम्य असा हवेशीर प्रदेश.

कोंडाईबारीहून तेरा किलोमीटरवर आमळी आहे. धुळ्यापासून आमळी गाव साधारण नव्वद किलोमीटर दूर आहे. कोंडाईबारी आमळी रस्त्याला लागून वनविभागाची मालनगाव रोपवाटिका लागते. अतिशय लोभस परिसर आहे हा. वळणावळणाचा रस्ता आणि काबऱ्याखडक धरणाचा भाग हे इथले वैशिष्ट्य. धनेर, जांभाळी, उंबरीपाडा, भोरटीपाडा पार करून आमळी गाव लागते. इथे भिल्ल आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. आमळी गाव कन्हैयालाल महाराजांच्या मंदिरासाठी नावाजलेले आहे. नावात जरी कन्हैया असले, तरी हे कृष्णाचे मंदिर नाही. महाराज असा जरी शब्द असला, तरी हे कोणी महाराजदेखील नाहीत. इथे निद्रावस्थेतील विष्णूची पुरातन मूर्ती आहे. या मूर्तीच्या बेंबीतून पाणी वाहत असते, असे मानले जाते. काही जण सांगतात, हा विशिष्ट प्रकारचा खडक आहे. हवेतील आद्र्रता शोषून पाणी बाहेर येत असावे. त्याबद्दल परिसरात अनेक गमती जमती ऐकायला मिळतात.

या मूर्तीची छोटीशी आख्यायिका मंदिरात लावलेली आहे. त्यानुसार सौराष्ट्रातील डाकोर येथील एका हरिभक्तावर प्रसन्न होऊन हरीची मूर्ती स्वतहून डाकोर येथे प्रकट झाली. त्यानंतर अनेक वर्षांनी मुल्हेरच्या राजांना श्रीहरीने स्वप्नात येऊन ती मूर्ती डाकोर येथून कुठेही खाली न ठेवता आणायला सांगितले. त्यांनी डाकोर येथे जाऊन एका तळ्यातूनती मूर्ती काढली आणि डोंगरदऱ्यांच्या मार्गाने आमळी गावात विश्रांतीसाठी थांबले. मूर्तीची पालखी जमिनीला लागू नये म्हणून झाडाला बांधून ठेवण्यात आली होती. पण विश्रांती झाल्यावर पाहतात, तर मूर्ती जमिनीला टेकली होती. घोडे, हत्ती लावूनही मूर्ती जागची हलली नाही. हरीची इच्छा म्हणून मूर्ती तिथेच ठेवून ते निघून गेले. अनेक वर्षांनी तिच्यावर मुंग्यांचे वारूळ आणि टेकडीसारखा भाग तयार झाला. एका दुष्काळात पावबा नावाचे हरिभक्त डांग येथे जात असताना त्यांना आमळी परिसरात पाण्याचा सुगावा लागला. ते तिथेच थांबले. त्यांच्याही स्वप्नात मूर्तीविषयी दृष्टांत झाला. त्यांनी टेकडीखालून मूर्ती काढली. समोरच्या धनसरा डोंगरावरून जो दगड काढशील, त्याच्या खाली मंदिरासाठी पसे मिळतील, असाही दृष्टांत त्यांना झाला. त्यातून हे मंदिर साकारले, अशी अख्यायिका आहे. १६१४ साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मूर्ती त्याआधी कित्येक वर्षांपासून आहे. साधारण हजार एक वर्षांचा मूर्ती विषयक इतिहास इथली मंडळी सांगतात. अर्थातच याला थेट पुरावा काही नसल्यामुळे पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून याचा नीट अभ्यास व्हायला हवा.

मुख्य मंदिराच्या समोरील बाजूने पाच-सात छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिर परिसर फारच छान आहे. तेथे इच्छापूर्ती दगडही आहे. हा दगड उभाच्या उभा उचलून बघायची गंमत आहे. उभा उचलला गेला, तरच मनातली इच्छा पुरी होते, असे श्रद्धाळू मानतात. मंदिराच्या एका बाजूला अतिशय जुने चाफ्याचे झाड आहे. या चाफ्याचे फूल एका तिथीला बरोबर मूर्तीच्या पायाशी पडत असे, मानले जाते. आमळी गावात एक फेरी मारता येते. इथे खुशबू आणि इंद्रायणी असा दोन प्रकारचा तांदूळ विकला जातो. इथले माप ‘चंपा’ हे आहे. चंपा म्हणजे साडेतीन किलो. सात किलो म्हणजे एक पायली किंवा दोन चंपे.

आमळी गावापासून दोन-अडीच किलोमीटरवर अलालदरी धबधबा आहे. समुद्रसपाटीपासून हा भाग १८६० फूट उंच आहे, असे इथे फलकावर लिहिलेले आहे. परिसरात मोहाची अनेक झाडे आहेत. अलालदरी धबधबा परिसर पावसाळ्यात नयनरम्य दिसतो. विशिष्ट डोंगररचनेत मोठी दरी निर्माण झालेली आहे. त्यात अनेक धबधबे पावसाळ्यात तयार होतात. कन्हैयालाल धबधबा, मत्स्या धबधबा आणि जांभाळी धबधबा हे इथले खास आहेत. वन विभागाच्या तीन-चार चौक्या इथे बांधण्यात आलेल्या आहेत. दरीत खाली उतरणे धोकादायक आहे.

इथले आदिवासी मात्र दरीत जाऊ शकतात. या दरीतून कमीत कमी वेळात ते नवापूर गाठत असत, असे स्थानिक सांगतात. इथे भिल्ल आदिवासी जास्त दिसतात. आमळी गावाच्याच वाटेने वार्सीमोर्ग शबरीधाम या नयनरम्य परिसराकडे जाता येते. इथे शक्यतो दिवसा प्रवास करावा. कोंडाईबारीपासून नवापूर ४० किलोमीटर आहे. सापुतारामार्गेदेखील शबरीधामकडे जाता येते. धुळे जिल्ह्यात पर्यटनाची ठिकाणे फार कमी आहेत, पण आमळीसारखी ठिकाणे एकाच वेळी निसर्गाचा आणि इतिहासाचा ठेवा उदरात घेऊन नांदताना दिसतात. त्यांना कधी तरी भेट द्यायलाच हवी.

प्राची पाठक prachi333@hotmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tourism in nandurbar best places in dhule district