News Flash

धार्मिक भावना हवी की कर्तव्यभावना?

आतापर्यंतच्या शाही स्नानासाठी सोडलेले पाणी हे ‘प्रदूषित नदी स्वच्छ करण्यासाठी’ सोडण्यात आल्याचा दावा सरकार करते आहे!

उच्च न्यायालयाने त्र्यंबकेश्वर येथील शाही स्नानच नव्हे, तर सिंहस्थ कुंभमेळा संपेपर्यंत आणि त्याहीनंतर पुढील पावसाळ्यापर्यंत कुठल्याही सोहळ्यासाठी धरण व तलावातून पाणी सोडले जाणार नाही याची हमी देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. खरे पाहता ही हमी न्यायालयाने कुंभमेळा सुरू होण्याआधी सरकारकडून घेणे गरजेचे होते. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक जिल्हय़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या गंगापूर धरणातून दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही पाणी सोडले जाणे हे विवेकशून्यच म्हणावे लागेल.
आतापर्यंतच्या शाही स्नानासाठी सोडलेले पाणी हे ‘प्रदूषित नदी स्वच्छ करण्यासाठी’ सोडण्यात आल्याचा दावा सरकार करते आहे! आज देश नव्हे, तर जागतिक पातळीवर पाणी समस्या गंभीर रूप धारण करत असताना पाणी नियोजन योजनेची उडवलेली ही खिल्लीच आहे. खरे तर पाण्याच्या या उधळपट्टीविषयक भूमिकेचा सरकारला जाब विचारला जायलाच हवा. उद्या जनतेला पाणी प्यायला मिळाले नाही, तर सरकार त्याची सोय करणार आहे काय? आजही जिल्हय़ात अनेक गावांत फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याचा दुष्काळ जाणवू लागतो. मलोन्मल पाण्यासाठी भटकावे लागते.
एकीकडे पिकांना अजूनही पुरेसे पाणी नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत व दुसरीकडे आमची संत मंडळी शाही स्नान करण्यात आनंद मानत आहेत. प्रा. एच. एम. देसरडा यांनी दाखल केलेली याचिका रास्त ठरल्याने आता तरी सरकारचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा करू या. धार्मिक भावनेपेक्षा सामान्य जनतेशी निगडित असलेल्या कर्तव्य भावनेला जपणे महत्त्वाचे वाटते.
– अनंत पंढरीनाथ बिऱ्हाडे, नाशिक

उंटा, तुझे सरळ काय?

उंटाच्या पाश्र्वभागाचा मुका घेण्याचा मूर्खपणा आपण केला की काय, असा प्रश्न रविशंकर यांना नव्हे, तर मतदारांना पडावा अशी परिस्थिती भाजपच्या राजवटीत आलीच आहे.
जनता पक्षाने इंदिरा गांधींना संपवण्याचा प्रयत्न केला. परिणामी जनता पक्ष संपला आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या. तसाच प्रकार काँग्रेस संपवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांच्या बाबतीत होणारच नाही असे म्हणता येत नाही. संस्कृतप्रचुर नावाच्या नवनवीन योजनांच्या घोषणा करून ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ लोकांच्या समोर ठेवत राहायचे धोरण विकास नव्हे, तर लोकांचा भ्रमनिरास करत चालले आहे.
‘उंटा, तुझे सरळ काय’ ही अधिक प्रचलित म्हण हल्ली वारंवार आठवावी अशी परिस्थिती आहे. वर्तमानातील प्रश्न सोडवण्याऐवजी भूतकाळातील भुतावळ उठवण्याचे धोरण नवीन सरकारकडून सातत्याने अवलंबण्यात आले. प्राचीन भारतीय संस्कृती, सनातन िहदू धर्म, अनादी काळापासून चालत आलेली उज्ज्वल परंपरा या शब्दांची मोहिनी किंवा मोहनिद्रा संपून खडबडून जाग्या झालेल्या लोकांना सामोरे कसे जायचे यावर चिंतन शिबिरे घ्यायची वेळ येईल, यात संशय नाही.
– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

प्रबोधनकार, आंबेडकर, बळीराजा सेनेला अमान्य?

‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये (२२ सप्टेंबर) ‘सेना माऊथपीस बॅक्स सनातन संस्था, कॉल्स मर्डर्ड रॅशनलिस्ट ‘धर्मविरोधी’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात गोिवद पानसरेंचा उल्लेख ‘धर्मविरोधी’ म्हणून करण्यात आला असून सनातन संस्थेची पाठराखण करण्यात आल्याचे म्हटले आहे. वास्तविक, शिवसेनेचा जन्मापासूनचा इतिहास माहीत असलेल्यांना त्यामुळे अजिबात आश्चर्य वाटणार नाही. मराठी माणसासाठी स्थापन झाल्याचा दावा करून राजकारणाला गजकरण मानणाऱ्या शिवसेनेनेच १९७० साली कामगार विभागात राहून कामगारांशी एकरूप झालेले अस्सल मराठमोळे कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची हत्या करून महाराष्ट्रातील पहिली राजकीय हत्या घडवून आणली. दुसरा प्रश्न धर्माच्या अनुषंगाने आहे.
१) प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे उद्धव यांचे आजोबा. ‘देवळाचा धर्म, धर्माची देवळे’ या लेखाच्या सुरुवातीसच त्यांनी म्हटले आहे की, ‘िहदूंचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्याबावळ्या- खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय-वसतिस्थान ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पाहावे तो देव ‘चराचर व्यापुनि’ आणखी वर ‘दशांगुळे उरला.’ अशा सर्वव्यापी देवाला चार िभतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची गरजच काय होती?’ सबब, उद्धव आपल्या आजोबांनाच खोटे ठरविणार का?
२) डॉ. आंबेडकरांनी तर िहदू धर्मच नाकारून बौद्ध धम्म स्वीकारला. अशा परिस्थितीत ‘सामना’च्या परिभाषेत बोलायचे झाल्यास आंबेडकर हे तर धर्म‘द्रोही’ ठरतात; परंतु त्यांचा निषेध उद्धव वा त्यांच्याआधी कोणी केल्याचे आठवत नाही. उलट, झाल्या त्या एकत्रित शिवशक्ती व भीमशक्तीच्या राजकीय घोषणा. या विसंगतीचे उद्धव यांच्याकडे काय स्पष्टीकरण आहे?
३) उद्धव जेव्हा धर्माच्या नावाने गळा काढतात, तेव्हा बहुजनांना अभिप्रेत असलेला बळीराजाच्या परंपरेतील िहदू धर्म त्यांना अभिप्रेत आहे की, कथित उच्चवर्णीयांना अभिप्रेत असलेला वामनाच्या परंपरेतील ब्राह्मणी िहदू धर्म अभिप्रेत आहे, हे त्यांनी एकदाच काय ते स्पष्ट करावे. बळीराजा हा दानशूर व शिवाजी महाराजांप्रमाणे रयतेचा राजा होता, अशी तमाम बहुजन समाजाची श्रद्धा आहे.
– संजय चिटणीस, मुंबई

दर्शन मिळाले, हेच खूप झाले!

‘देणे नाही, घेणेच?’ या पत्रात (लोकमानस, २३ सप्टेंबर) पत्रलेखकाने गणेशदर्शनानंतर प्रसाद न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे; परंतु सद्य:स्थितीत गणेश मंडळांनी प्रसाद दिला तर नवलच. मागील काही वर्षांपासून गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या गणेशाचे नामकरण विघ्नहर्ता, राजा, महाराजा इत्यादी केल्यानंतर गणेशभक्तांची गर्दी आपल्या मंडळाकडेच कशी वळवता येईल हे पाहिले आणि तसेच प्रयत्न प्रत्येक वर्षी चालू असतात.
या सर्वच मंडळांसाठी स्फूíतदायक किंवा प्रेरणास्थान ठरले ते मुंबईतील एका प्रख्यात राजाचे मंडळ. पत्रलेखकाने बहुधा याच राजाच्या दर्शनानंतर पत्र लिहिले असावे. प्रसादाबाबतीत म्हणाल तर या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून बऱ्याच जणांना मागील काही वर्षांत खास ‘प्रसाद’ मिळालेला आहे. माध्यम प्रतिनिधी, सामान्य गणेशभक्त (सेलेब्रिटी नव्हे), महिला पोलीस, पोलीस अधिकारी यांनी तो घेतल्याचे चित्रणही माध्यमांतून त्या त्या वेळी दाखवण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या ‘खास’ पद्धतीने गणेशभक्तांची मस्तके बाप्पाच्या चरणावर टेकवल्याचेही आढळून आले होते. या अशा ‘खास’ प्रसादासमोर आणखी दुसऱ्या प्रसादाची काय गरज? तेव्हा राजाचे दर्शन मिळाले हेच खूप झाले.
– दीपक काशीराम गुंडये, वरळी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2015 12:23 am

Web Title: letter to editor 44
टॅग : Religion
Next Stories
1 धोरण घटनेतच असताना व्यर्थ वाद
2 पथ्ये पाळलीत, तर धर्मनिरपेक्षतेचे लाभ!
3 उदंड जाहले घोटाळे..!
Just Now!
X