अमेरिका- इराणसंबंधीच्या शुक्रवारपासूनच्या बातम्या व  ‘ट्रम्प द टेरिबल’ (६ जानेवारी) या संपादकीयात त्यावर केलेले भाष्य यांचा एकत्रित विचार करता मतदारांचेच काहीतरी चुकते आहे, हे निश्चित. निवडणुकांच्या हंगामात धर्मज्वर, युद्धज्वर तसेच प्रादेशिक अस्मितांचा सुकाळ असतो. अमेरिकेसारख्या देशात हे घडते तर इतरांची काय कथा? मतदारांना भूतकाळाचे फार लवकर विस्मरण होते आणि धूर्त राजकारणी त्याचाच फायदा उठवतात आणि ट्रम्पसारखी मंडळी सर्वोच्चपदी जाऊन बसतात. अमेरिकन निवडणुका आणि राष्ट्राध्यक्ष घोषित क्रूरकम्र्याचे निर्दालन हे एक समीकरण बनले असावे. हे थांबायला हवे, मतदारांनी केलेली चूक सुधारायला हवी; अन्यथा विविध देशांत ट्रम्प यांच्या आवृत्त्या निर्माण व्हायला वेळ लागणार नाही आणि संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. -शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)

अमेरिकेच्या नादी लागायचे का? 

कासीम सुलेमानीची हत्या, इराणवर हल्ल्याची धमकी इ बातम्या वाचल्या. यापूर्वी लोकमानसमध्ये छापून आलेल्या माझ्या पत्रात (२१ मे, २०१९) इराणवर हल्ल्याची शक्यता मी वर्तवली होती. आता तरी इराणने सावध होणे अपेक्षित आहे, तसेच भारतानेही दक्ष राहणे गरजेचे आहे. सुलेमानीच्या हत्येनंतर ज्या पद्धतीने अमेरिकेने खुलासा केला (की, सुलेमानी भारतातही दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता), त्यावरून अमेरिका भारतालाही या युद्धात ओढून घेईल असे वाटते. अमेरिकेच्या नादी लागायचे की नाही ते विद्यमान नेतृत्वाने ठरवायचे आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग आता अधिकाधिक गडद होणार हे निश्चित, तेव्हा त्याची धग आपल्यालाही जाणवणारच. करता येईल असे एकच काम शिल्लक आहे ते म्हणजे शक्य असेल तर संपूर्ण अमेरिकन नागरिकांचे ‘समुपदेशन’, जेणेकरून अमेरिकन नागरिकांना मानवी जीवनाचे मूल्य कळेल व विनाकारण ते आशियाई लोकांना किडय़ा-मुंग्यांसारखे मारणार नाहीत. ब्राउन युनिव्हर्सिटीतील ‘वॅटसन इन्स्टिटय़ूट’ने नोव्हेंबर २०१९ मध्ये दिलेल्या अहवालानुसार, पश्चिम आशिया व मध्यपूर्वेत मागील २० वर्षांत मोठा मानवी संहार केला आहे (२००१ पासून ८,०१,०० बळी).

यातील विरोधाभास असा की जो येशूखिस्त शांती, बंधुत्व, सदाचार, प्रेम, अिहसा, एकता, मानवता, नैतिकता, न्याय आदी मूल्यांचा पुरस्कर्ता होता, त्याच्याच अनुयायांकडून त्याच्याच नावाने केला जाणारा मानवाची वंशाचा संहार. निरपराधांची हत्या धर्माचरण असूच शकत नाही, तसेच अमेरिकेची ताकद अमेरिकेबाहेर नसून ती अमेरिकेतच आहे हे पटवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. -सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड</strong>

अणुकार्यक्रम इराणप्रमाणे पाकिस्तानचाही आहे..

‘ट्रम्प द टेरिबल’ हे संपादकीय (६ जानेवारी) वाचले; पण कासीम सुलेमानीला अमेरिकेने का ठार केले हे मात्र शेवटपर्यंत समजलेच नाही. कासीम हा काही दहशतवादी नव्हता. तसेच इराणचासुद्धा कुठल्याही ‘दहशतवादी कृत्या’त हात नव्हता. इराणच्या अणुविषयक कार्यक्रमाबद्दल जर अमेरिकेला आक्षेप असेल तर तसा कार्यक्रम पाकिस्तानचादेखील आहे. पण या कारवाईचे आपल्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अर्थात, हा संघर्ष अजून पुढे वाढू नये एवढीच आपण अपेक्षा बाळगू शकतो. -संजय पालीमकर, दहिसर (मुंबई)

राष्ट्रवादाच्या लाटेसाठी जागतिक अस्थैर्याकडे..

ट्विटरवरून देश हाकणाऱ्या सत्ताधीशांच्या यादीत अव्वलस्थानी असणाऱ्या ट्रम्प यांनी नववर्षांची सुरुवात एका वेगळ्याच अस्थिरतेकडे नेऊन ठेवली. अमेरिकेच्या अर्थराजकारणात स्वत:च्या राजकीय जीवनामध्ये अस्थिरता, पेचप्रसंग जाणवत असतानाच सामान्य जनतेचे लक्ष विचलित करणे ही राजकारणाची परंपरा आहे. महाभियोगाची टांगती तलवार मानेवर असतानाच ‘हीच ती योग्य वेळ’ साधून ट्रम्प यांनी इराणवर हल्ला चढवला. याच ट्रम्प यांनी ८ मे २०१८ रोजी जेव्हा इराणसोबतचा बहुराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करून निर्बंध नव्याने लादण्याची घोषणा केली तेव्हा आजवरच्या आखाती युद्धांचा अनुभव असणाऱ्या जगाचा काळजाचा ठोका चुकला होताच! नवा भडका आता वाढतच जाणार हे स्पष्ट दिसते आहे. इराणी राष्ट्रवाद ही केवळ वसाहतवादाची उत्पत्ती नाही. असेरियन-पर्शियन साम्राज्यातून मिळालेला सांस्कृतिक वारसा आणि गेल्या सुमारे ५०० वर्षांपासून फारशा न बदललेल्या भौगोलिक सीमा यातून घडलेली इराणी राष्ट्रवादाची संकल्पना इतरांच्या तुलनेने अधिक प्रबळ आहे. मुळात सद्य:स्थितीत असलेले इराणी नेतृत्व हे कोणाची हाजी हाजी करण्यास दुजोरा देणारे नाही. काही नाटय़मय घडामोडी घडवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादाच्या लाटेवर पुन्हा एकदा ट्रम्प स्वारी मारू इच्छितात. परंतु अस्थिरतेकडून अनिश्चिततेकडे घेऊन जाणाऱ्या या पर्वाला ट्रम्प यांनी स्वत:हून निमंत्रण दिले आहे. यामुळे अर्थकारणात व  राजकीय अस्थिरता माजणारच पण त्याचे पडसाद दीर्घकाळ टिकून राहणार हे त्यांना कोणी पटवून द्यावे? आंतरराष्ट्रीय बाजारात आखातातील शांतता हा अविभाज्य घटक आहे तो टिकवून ठेवणे ही आवश्यकता आहे, हे शहाणपण सत्ताधाऱ्यांना येवो हीच इच्छा. – विजय देशमुख, दिल्ली.

राज्यकर्तेच पर्यावरणविरोधी!

‘बेफिकिरीचा आस्ट्रेलियन वणवा’ हा अन्वयार्थ (६ जानेवारी) वाचला. स्वत:चा देश आगीत होरपळत असताना ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे हवाई बेटांवर सुट्टी घालविणे कितपत योग्य, असा प्रश्न पडला खरा; पण आधी या ‘अन्वयार्थ’मधील माहिती वाचून आश्चर्याचा धक्काच बसला! या मॉरिसन यांनी हवाई बेटांवर कुटुंबासह जो काही निसर्गाचा आनंद घेतला. त्याच निसर्गाच्या रक्षणासाठी जर काहीएक प्रयत्न ते करीत नसतील तर देशाच्या उच्चपदावर राहण्याचा त्यांना काहीएक अधिकार नाही. स्वत:च्या देशातील तापमान ४१.९ अंश सेल्सिअस वरती जात असताना हे मॉरिसन यांच्यासारखे राज्यकर्ते, ‘पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी काय करायला हवे’ या मसुद्याला विरोध करत असतील, तर हे सारे जण नक्कीच निसर्गाचे खूप मोठे अपराधी आहेत. आज जगभर तापमानवाढ, ग्लोबल वॉर्मिग, तसेच ओझोन थर कमी होणे, जमिनीची धूप होणे इत्यादी अनेक प्रश्नांनी काळजीचे घर निर्माण केलेले आहे. जे या विरोधात लढत आहेत, उदा. नवपर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने त्याविषयी काही बोलले तर मॉरिसन यांच्यासारखे सत्ताधारी, ‘परदेशी व्यक्तींनी आम्हाला शिकवू नये’ असे दटावतात, यातून लोकांनी काय समजायचे?     – अखिल महाडिक, सांगली

भाजप आणि मनसेने एकत्र यावे

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी याआधी एकमेकांवर कडवट टीका करूनदेखील किमान समान कार्यक्रमाच्या हेतूने ‘महाविकास आघाडी’च्या माध्यमातून या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. ‘महाविकास आघाडी’चा कारभार, सरकारची यशस्विता यावर चर्चा सुरूच राहील, परंतु आज तरी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन विचार धारा भिन्न असल्या तरी कारभार बघण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मध्यंतरी काही मुद्दय़ांवरून भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली होती, परंतु अनेक मुद्दे असे आहेत की त्यावर या दोन्ही पक्षांचे मतक्य होऊ शकते. महाराष्ट्रातल्या आगामी काळातील निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांमधील नेतृत्वाने एकत्र निवडणुका लढवण्याबाबत विचार करण्यास हरकत नसावी. – अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>

वाहनविक्रीत वाढ म्हणजेच विकास?

‘वाहनांच्या नोंदणीत पंधरा टक्क्यांनी घट’ ही बातमी (लोकसत्ता- ५ जानेवारी) वाचली. वाहन नोंदणी घट म्हणजे वाहनविक्रीत घट यामुळे एकंदर समाजात फार मोठे अरिष्ट उद्भवले आहे अशीच त्याची वाक्यरचना केली जाते. आधुनिकतेबरोबर वाहननिर्मितीत सातत्याने वाढच होत राहिली पाहिजे अशी अपेक्षा धरणे हे आततायीपणाचे होत आहे हे असे वाटत नाही का? सुरुवातीला सोय म्हणून वाहननिर्मिती झाली. परंतु ‘अति तिथे माती’ या उक्तीनुसार वाढणारी वाहननिर्मिती ही इतर काही समस्यांबरोबर घेऊन येत आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे वाटते. कारण वाढीव वाहननिर्मितीबरोबर त्या वाहनांसाठी लागणारे वाढीव रस्ते, म्हणजे वाढीव जागा हवी.. त्याचबरोबर वाढीव वाहनांनी होणारे वाढीव प्रदूषण हे पर्यावरणाला धोका निर्माण करत आहे. तेव्हा वाहननिर्मिती आणि भरपूर वाहनविक्री म्हणजेच सामाजिक विकास हा जो दृष्टिकोन झालेला आहे त्यात बदल करणे फार गरजेचे आहे. तसेच संपर्काच्या साधनांत झालेल्या क्रांतीमुळे खरेतर भौतिक दळणवळणाची गरजच कमी व्हायला हवी होती, परंतु घडते आहे मात्र उलटेच. हा विरोधाभास का झाला आहे? – श्रीराम शंकरराव पाटील, उरून (इस्लामपूर)

महागाईचे (रड)गाणे सरकारनेच थांबवावे..

गीतकार वर्मा मलिक यांनी लिहिलेल्या आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह पाच गायकांनी गायिलेल्या, ‘रोटी कपडा और मकान’ (७४) या चित्रपटातील ‘बाकी कुछ बचा तो महंगाई मार गयी’..  शब्द आज ४६ वर्षांनीही आठवतात! आजही महागाईने उच्चांक गाठला आहे : ‘कांदा महाग’ म्हणता म्हणता दूध महागले, तेवढय़ात घरगुती गॅस सिलेंडर महागला आणि पाठोपाठ बटाटेही महागाईच्या रांगेत उभे राहात आहेत. सामान्य माणसाचे तर हिशेबाचे गणित बसतच नाही आणि त्यात उद्या आणखी कशात दरवाढ होईल तेही माहिती नाही. चांगले दिवस येणार म्हणता म्हणता महागाईचे दिवस मात्र आले. शासनाने निदान जीवनावश्यक वस्तूच्या किमतीतील दरवाढ तरी नियंत्रणात ठेवावी नाहीतर लोकांवर खरेच ‘बाकी कुछ बचा तो महंगाई मार गयी’ म्हणण्याची वेळ येईल. – मयूर प्रकाश ढोलम, जोगेश्वरी

loksatta@expressindia.com