वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथील समुद्रकिनाऱ्यावरच्या फेसाळलेल्या खडकावर सेल्फी काढताना समुद्रात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वाचून काय म्हणावे तरुणाईच्या या सेल्फीच्या वेडाला असे वाटले. सेल्फी काढताना मृत्यू ओढवणं आणि अशा प्रकारच्या दुर्घटना घडणं हे आता नेहमीचंच झालं आहे. अलीकडेच सेल्फीच्या या वेडापायी मुंबईतील नाहूर स्टेशनजवळ लोकल ट्रेनच्या टपावर सेल्फी घेण्याच्या नादात २५ हजार व्होल्ट्सचा विजेचा झटका लागून १४ वर्षांच्या मुलाने आपला जीव गमावला होता. खरं तर स्वत: हात लांब करून किंवा सेल्फी स्टिकचा वापर करून घेतलेल्या सेल्फी फोटोने काय सुख मिळते ते सेल्फी घेणारेच जाणोत. कारण त्या सेल्फी फोटोमध्ये फोटो घेणाऱ्यांचे चेहरे इतके बेढब दिसतात की, पूर्वी गावोगावच्या जत्रांमधून हसवणारे आरसे असायचे त्याची आठवण येते. वास्तविक पाहता सेल्फीचे हे फॅड जगभर पसरलेले आहे. लंडन येथील ‘द टेलीग्राफ’ या अग्रगण्य वर्तमानपत्रातील वृत्तानुसार या वर्षी शार्क माशाच्या हल्ल्यात बळी पडून मरण पावलेल्या लोकांपेक्षाही सेल्फी काढताना मृत्यू ओढवलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. रशियासारख्या देशात सेल्फी-मृत्यूंची संख्या इतकी वाढली की, तेथील सरकारने सेल्फी काढताना काळजी घेण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना जाहीर केल्या आहेत. भारतात आणि विशेषकरून मुंबईसारख्या महानगरात असुरक्षित स्थळी बेपर्वाईने सेल्फी घेताना जीव गमविण्याच्या, सेल्फी-मृत्यूंच्या दुर्घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सरकारने वेळीच याची योग्य ती दखल घेऊन हस्तक्षेप करावा आणि समुद्र, रेल्वे ट्रॅक, रस्ते, उंच इमारतींवरील टेरेस, प्राणिसंग्रहालय, होडीतील प्रवास, डोंगरातील कडेकपार आदी ठिकाणी सेल्फी घेण्यास बंदी आणावी व सेल्फीच्या वेडापायी तरुणाईचे अकाली होणारे मृत्यू टाळावेत.
– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)
सुरक्षेबाबत आपण इतके गाफील का ?
कर्नल आनंद देशपांडे यांचा ‘पठाणकोट हल्ला : कुठे चुकलो? काय शिकलो?’ हा लेख (रविवार विशेष, १० जाने.) वाचला आणि आपल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये किती त्रुटी आहेत हे समजले. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून ते कंदाहारला नेले होते. या घटनेला १६ वष्रे होऊनदेखील पठाणकोट कटाचा सूत्रधार पुन्हा मौलाना मसूद अझहरच! म्हणजे सोळा वर्षांनंतरही आपल्या सुरक्षा व्यवस्थेत आपण बदल करू शकलो नाही हे विदारक सत्य यातून समोर आले. भारतात दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्याचे कोणतेही सुस्पष्ट धोरण नाही. त्यामुळे देशाची सर्वात महत्त्वाची व संवेदनशील असलेल्या सुरक्षा व्यवस्थेविषयी गाफील न राहाता प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे.. पठाणकोटसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी..
– संदीप संसारे, ठाणे
अस्तनीतल्या निखाऱ्यांवर कारवाई कधी?
‘पठाणकोट हल्ल्याच्या सूत्रधारांवर आधी कारवाई करा.. भारताने ठणकावले’ ही बातमी (९ जाने.) वाचली. भारत पाकिस्तानकडून कारवाईची अपेक्षा करत असताना एका गोष्टीकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे किंवा काही तरी लपवून ठेवले जात आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने व प्रचंड शस्त्रसाठय़ासह सरहद्द ओलांडून येणे हे आपल्याच यंत्रणेतल्या काही जणांकडून केल्या गेलेल्या अर्थपूर्ण सहकार्याशिवाय शक्य नव्हते. त्यांना शोधून काढून त्यांच्यावर आपण कधी कारवाई करणार आहोत?
बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या वेळी कोकण किनारपट्टीवर सागरी तटरक्षक दलाच्या अर्थपूर्ण साथीने मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा उतरवण्यात आला होता. त्यानंतर काही अधिकाऱ्यांची धरपकड होऊन त्यांना शिक्षाही झाल्याचे अनेकांना स्मरत असेलच. वर्तमान परिस्थिती जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत मतांसाठी लाचार असलेले (सर्वपक्षीय) नेते व भ्रष्ट प्रशासन यांच्यामुळे पठाणकोटसारखे हल्ले होतच राहणार. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, या अस्तनीतल्या निखाऱ्यांवर कारवाई कधी करणार?
– निशिकांत मुपीड, कांदिवली (मुंबई)
विविध सदरांची सातत्यता महत्त्वाची
‘वाचनोत्सवाचा वसंत’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, ९ जाने.) वाचला. लोकांना आवडते ते आम्ही देतो या सबबीखाली अनेकदा गंभीर विषयांना वर्तमानपत्रात थिटी जागा दिली जाते आणि त्याला उथळ करून उडवले जाते तेव्हा खूप खेद वाटतो. त्यामुळे १० हजार शब्दांचे लेख वाचले जातात ही ‘द न्यूयॉर्कर’ची खासियत वाचून छाती दडपली गेली.
या पाश्र्वभूमीवर आपल्याकडच्या वर्तमानपत्रांत वाचकांना आकर्षति करण्यासाठी, त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी ज्या कल्पना वापरल्या जातात, लॉटरीचे निकाल पानभर दिले जातात, गुन्हेगारीच्या बातम्या तिखटमीठ लावून दिल्या जातात आणि वर एखादा रुपया वाढवला तरी नियमित वाचकांची संख्या कमी होईल की काय ही धास्ती बाळगली जाते हे चित्र निराशाजनक वाटते.
केवळ कौतुक करावे म्हणून नाही तर मनापासून असे वाटते की, मराठी दैनिकांमध्ये रोजची किंमत सर्वाधिक असूनसुद्धा आणि तगडे स्पर्धक असूनही ‘लोकसत्ता’ची वाचकसंख्या अढळ राहिली असावी. याचे कारण राजकारण, अर्थकारण, विज्ञान, पुस्तकविषयक, विविध विषयांवरचे मान्यवरांकडून लिहिले गेलेले सविस्तर लेख, त्या सदरांची वर्षांनुवर्षांची सातत्यता, रोखठोक संपादकीय दैनिक वाचनीय तर करतातच, पण त्यावर वाचकांच्या (सहमतीची तसेच असहमतीची) पत्रांमधून प्रत्येक विषयावर केल्या गेलेल्या चच्रेलाही, फुटकळ म्हणून गणले न जाता, महत्त्वाचे स्थान दिले जाते.
जाहिराती हा वर्तमानपत्रांच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे, पण त्यासाठी पानभर मजकुरावर संक्रांत आणायची पाळी का यावी हा विचार या ‘द न्यूयॉर्कर’च्या यशाच्या निमित्ताने करावा असे वाटते. जाहिरातींविना घसघशीत किंमत ठेवूनही कायमचा वाचकवर्ग असलेले आपल्याकडचे एक उदाहरण म्हणजे अंतरकरांचे ‘हंस’, ‘नवल’सारखे दिवाळी अंक. ‘द न्यूयॉर्कर’सारख्या दैनिकांच्या, ‘टाइम’सारख्या नियकालिकांच्या लेखनशैलीचा, वाचकांवर गारूड करण्याच्या विषयवैविध्यतेचा अभ्यास आपल्याकडच्या वृत्तपत्र व नियतकालिकांनी करावा आणि आपली व्यावहारिक तसेच माहितीपर व साहित्यिक पत वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे सुचवावेसे वाटते.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे
देशभक्तीचे प्रतीक की संसदेचे अपयश?
‘तरुणांनो, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घ्या..’ ही बातमी (४ जाने.) वाचली. विक्रम गोखलेंनी तरुणांना दिलेला हा सल्ला त्यांच्यातील देशभक्तीचे प्रतीक मानायचा की देशाच्या संसदेचे आणि संविधानाचे अपयश समजायचे? कारण तरुणांना असा सल्ला देणे म्हणजे कायदा हातात घेण्यास प्रवृत्त करणे असासुद्धा होऊ शकतो. तसेच पोलीस, लष्कर व अन्य संरक्षण दले अकार्यक्षम आहेत असाही होऊ शकतो. कोणत्याही शासकीय सेवेत नसताना जर तरुण देशासाठी शस्त्र हातात घेण्यास पात्र ठरत असतील तर एवढा प्रचंड खर्च आर्मी, नेव्ही व वायुदलावर का करावा लागतो? तरीही हल्ले थांबत नाहीत ते वेगळेच. दुसरे म्हणजे असाच सल्ला ओवेसीसारख्या लोकांनी देशातील तरुणांना दिला तर त्याचा कसा अर्थ लावला जाईल हे इथे सांगायची गरज वाटत नाही, कारण वाचक तेवढे सुज्ञ आहेत. असले विचार प्रकाशित करून ‘लोकसत्ता’ने काय साध्य केले, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
– सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड
विस्मरणापेक्षा स्मरणरंजन कधीही चांगलेच
‘स्मरणरंजनातच मराठी चित्रपट अडकलेले?’ या पत्रात (लोकमानस, ८ जानेवारी) लेखकाने मराठी चित्रपटांनी फार काळ स्मरणरंजनामध्ये न अडकण्याचा सल्ला दिला आहे. मराठी चित्रपटाच्या निर्मितिमूल्यात झालेल्या वाढीने आणि योग्य प्रमाणात होत असलेल्या जाहिरातींमुळे प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहांकडे वळत आहेत. वाढत्या प्रेक्षकांसमोर जुन्या अजरामर कलाकृतींचे मूळ साच्याला धक्का न लावता नव्याने सादरीकरण करून चित्रपटरूपाने आणणे यात गर काहीच नाही. बदलत जाणाऱ्या पिढीला जुन्या कलाकृती केवळ ऐकूनच माहिती असण्याची शक्यता असते. अशा वेळी जुन्या कलाकृती हल्लीच्या पिढीसमोर आणायचे झाल्यास दोन पर्याय आहेत. एक तर गाजलेल्या नाटकाचे नव्याने प्रयोग किंवा दुसरे म्हणजे माध्यमांतर करून चित्रपटीय सादरीकरण. नाटकाचा प्रेक्षकवर्ग मर्यादित असल्यामुळे ती कलाकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल का, याची शंकाच उरते. परंतु तीच जर चित्रपटाच्या रूपाने दर्जेदारपणे पुढे आली तर मात्र वाढलेल्या प्रेक्षकसंख्येमुळे पुढील पिढीला नव्याने तिची ओळख होऊ शकते. यानिमित्ताने स्मरणरंजन झाले तरी कलाकृती विस्मरणात जाण्याचा धोका राहणार नाही.
– दीपक काशीराम गुंडये, वरळी (मुंबई)
बँकबुडव्यांचे सभासदत्वच रद्द करावे
बँकबुडवे संचालक हे समाजद्रोही समजून त्यांचे सभासदत्वच कायमचे रद्द करण्याची तरतूद हवी, तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही बँकेचे सभासदत्व मिळू नये. म्हणजे त्यांना मागील दाराने बँकेच्या कामात लुडबुड करता येणार नाही. सर्व विद्यमान संचालकांकडून त्यांच्याकडे असलेल्या भागभांडवलाच्या ठरावीक प्रमाणात वैयक्तिक हमी/तारण घेतल्यास भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसेल. भ्रष्टाचारी बँक अधिकारीही कर्जदार व त्यांच्या हमीदारांकडून घेतलेली वैयक्तिक हमीपत्रे नंतर रद्द करतात किंवा तारण म्हणून घेतलेली मालमत्ता मोकळी करतात. बुडितखाती गेलेल्या कर्जामागे बऱ्याच वेळा ही कारणे असतात.
– मुकुंद फडके, बोरिवली (मुंबई)