‘नगराध्यक्षांना राजकीय संरक्षण’ ही बातमी (२३ मार्च) वाचली. शेवटी मोदींचे बोट धरून सरकार चालवायचे म्हणजे हे सर्व करावेच लागणार. विरोधकांना जास्तीत जास्त निष्प्रभ करून आपली सत्तेवरची मांड जास्तीत जास्त पक्की करणे यालाच तर राजकारण म्हणतात. जास्तीत जास्त आपले नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर सरकारने त्यांना संरक्षण देण्यासाठी असे करणे एक वेळ समजू शकते; पण विरोधकांनी या विधेयकाला पाठिंबा कसा काय दिला? पहिली अडीच वर्षे तर अविश्वास ठराव आणताच येणार नाही. नंतर तीन महिने जिल्हाधिकारी व सहा महिने सरकारदरबारी तो ठराव अडकणार. म्हणजेच एकंदर ६० महिन्यांतील ३९ महिने गेले! मग उर्वरित अल्प कालावधीसाठी अविश्वास ठराव कोण आणणार? असे चित्र समोर दिसत असताना हे विधेयक एकमताने मंजूर होते, याचाच अर्थ असा की विरोधक व सत्ताधारी या दोघांनी मिळून सत्तेची वाटमारी करण्याचे ठरविलेले दिसते. तुमच्या हाती लागले ते तुम्ही ओरबाडा, आमच्या हाती लागले ते आम्ही ओरबाडतो! थोडक्यात काय, तर सत्तेसाठी सर्वच हपापलेले आहेत. शेवटी वळणाचे पाणी वळणावरच जाणार!

-मुकुंद परदेशी, धुळे</strong>

 

काही जागांपायी सर्वच निकाल का रोखता?

राज्य शासनाच्या विविध महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांची निवड एमपीएससीद्वारे केली जाते. २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या जवळपास ८ ते १० परीक्षांचे निकाल अजूनही जाहीर करण्यात आलेले नाहीत. समांतर आरक्षणाच्या मुद्दय़ावरून जनहित याचिका दाखल केल्याने निवड प्रक्रियेवर स्थगिती आली. सध्या तारीख पे तारीख होताना दिसत आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. काही जागांच्या मुद्दय़ावरून सर्व निकालांवर स्थगिती कशासाठी? यामुळे बऱ्याच उमेदवारांना मानसिक त्रासातून जावे लागत आहे. मागच्या वर्षी दिलेल्या परीक्षा या वर्षी परत देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. यामुळे एकच विद्यार्थी दोनपेक्षा जास्त परीक्षेत यश मिळवल्याने अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी बेरोजगार राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवड प्रक्रियेत होणारा विलंब टाळून लवकरात लवकर निकाल लावल्यास एमपीएससीची विश्वासार्हता टिकून राहण्यास मदत होईल.

-योगेश्वर नागनाथ टोम्पे, देगलूर (नांदेड)

 

शिक्षण खात्याकडून सरकारी आदेश धाब्यावर

ग्रॅच्युईटी कायदा १९७२ प्रमाणे सलग सेवेत बिनपगारी सुट्टी असली तरी सुट्टीआधी आणि नंतरची सेवा सलग सेवा धरून ग्रॅच्युईटी देण्याचे प्रावधान आहे. तरीही शिक्षकांना पूर्ण ग्रॅच्युईटी नाकारण्यात येत आहे. दोन पूर्णवेळ सेवा कालावधीमध्ये अर्धवेळ सेवा असल्यास सलग सेवेचा फायदा न देता आधीची सेवा एकूण सेवेतून वगळून ग्रॅच्युईटी मंजूर करण्यात येते. २०एप्रिल२००७ ्न रोजीचे शासकीय परिपत्रक ढएठ 2106(332/06)रए -6   हे  ग्रॅच्युईटी कायदा १९७२चे उल्लंघन करणारे आहे. खरे तर दोन पूर्णवेळ सेवेत अर्धवेळ सेवा असल्यास ती सेवा सलगतेसाठी ग्राह्य़ धरण्यात यावी असे शासकीय आदेश असूनसुद्धा मुंबईचे शिक्षण उपसंचालक आणि शालेय शिक्षण विभागाचे सचिव शिक्षकांना देय फायदे मिळू देण्यास अडथळा निर्माण करत आहेत.  मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण उपसंचालकांना आदेश देऊनही ते ग्रॅच्युईटी का मिळणार नाही हे सांगत नाहीत. सेवानिवृत शिक्षकांना असे वारंवार उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी धाव घेणे आíथकदृष्टय़ा कठीण आहे. मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात आता लक्ष घालावे.

-प्रकाश मांजरेकर, डोंबिवली

 

मानवी उंदरांनी किती खजिना कुरतडला?

मंत्रालयात कागदी उंदीर नाचणे हे काही नवीन नाही. ते तर मानवी उंदीर नेहमीच नाचवत असतात आणि सरकारी तिजोरी कुरतडत असतात. २०१६ सालचे उंदीर निर्मूलन प्रकरण आमदार महोदयांनी विधानसभेच्या पटलावर आणले. हा रेकॉर्ड ब्रेक २०१६ साली केव्हा झाला ते बातमीत नाही. खडसे यांनी २ जून २०१६ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याआधीचे हे प्रकरण असल्यास त्याची सामूहिक जबाबदारी मंत्री या नात्याने त्यांचीही येते. त्यावेळी जर त्यांना हे माहीत असले तर त्यावेळी बाहेर का आणले नाही? मूषक निर्मूलनाची बरीच आकडेवारी बातमीत आहे. त्यामुळे  छान करमणूक झाली. परंतु यासाठी किती खर्च आला त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे मानवी उंदरांनी सरकारी खजिना किती कुरतडला याचा उल्लेख नाही. दिवसाला ४५,६२८ उंदीर मारले. त्याची विल्हेवाट कुठे लावली? कारण मुद्दा मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील आहे. त्यासाठी त्या संबंधित खात्याची परवानगी घेतली होती का? या कामासाठी निविदा निघाल्याचे वाचले. हेही अहो आश्चर्यम्. एरवी करोडो रुपयांची कामे बिगरनिविदा विशेष बाब म्हणून दिली जातात. माजी मंत्रिमहोदयांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीतील अशा कामांचे मूषकशोधन करावे व ती माहिती विधानसभेच्या पटलावर आणावी.

-सुधीर ब. देशपांडे, विलेपाल्रे (मुंबई)

 

‘द हाउंड ऑफ बास्करव्हील’चे गारूड..

‘कुतूहल’ या सदरामधील ‘प्रकाश देणारा फॉस्फरस’ (२१ मार्च) हा भाग वाचला. भुतांच्या गोष्टींमध्ये आवर्जून असणाऱ्या स्मशानातील रात्रीच्या पिवळसर प्रकाशाचे पुन:स्मरण त्यात करून देण्यात आले आहे. मात्र आणखी एका गोष्टीचे आवर्जून स्मरण झाले. हाउंड  ऑफ बास्करव्हीलचे. शेरलॉक होम्सच्या या अजरामर कथेत सर आर्थर कॉनन डायलने हाउंड जातीच्या कुत्र्याच्या अंगावर फॉस्फरस टाकून मुरलॅन्डमधील माळरानावर रात्रीबेरात्री त्या जणू अंगार ओकणाऱ्या प्रकाशमान कुत्र्याला फिरवून परिसरात जी गूढ अशी दहशत निर्माण केली तिचा शोध घ्यायला थेट शेरलॉक होम्सला यावे लागले. शालेय जीवनात ऐकलेल्या व नंतर वाचलेल्या द हाउंड ऑफ बास्करव्हीलचे गारूड आजही मनावर कायम आहे.

-डॉ. कैलास कमोद, नाशिक