‘हे घुसखोर?’ हे आसाममधील लोकांच्या अडचणींचे वास्तववादी संकलन (रविवार विशेष, ५ ऑगस्ट) वाचले. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी एनआरसीचा मसुदा पुढे करत आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांचा आकडा ४० लाखांपर्यंत आहे, असा हवाला दिला. तसेच विरोधी पक्षांना याबाबत काय वाटते, असा प्रश्न विचारून हा विषय बेमालूमपणे ‘राष्ट्रहिताशी’ जोडला आहे. भाजपचा एकंदरीत राष्ट्रवादाचा उन्माद बघता त्यांना हे साजेसेच आहे; परंतु सर्वोच्च न्यायालयाने, एनआरसीचा हा केवळ मसुदा असून त्याआधारे कुणावरही जबरदस्तीने कारवाई न करण्याचा आदेश दिला आहे. वास्तविक आसाममध्ये राहणारे सर्वच नागरिक हे बांगलादेशी आणि पर्यायाने मुसलमान आहेत म्हणून त्यांना बेकायदेशीर ठरवून यात हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. बांगलादेशी नागरिकांच्या मुद्दय़ावर भाजपने आसाम हे राज्य जिंकले होते. यायोगे आसाममधील प्रत्येक मुसलमान हा बांगलादेशी आहे (घुसखोर बांगलादेशी मुसलमान आणि हिंदू निर्वासित बंगाली, हा फरक आहे.) असा संदेश ज्या अप्रत्यक्षपणे देण्याचा प्रयत्न होत आहे तो मुळातच घातक आहे. अखंड हिंदुराष्ट्र (भारत – पाकिस्तान – बांगलादेश – अफगाणिस्तान) ही संकल्पना ज्यांची आहे त्यात तेथील राहणारे नागरिकही येतात का, याचेही उत्तर अखंड हिंदुस्थानाचा जप करणाऱ्यांनी देणे आवश्यक आहे. त्यामुळे हा सारा दिशाभूल करण्याचा नसता खटाटोप विस्तवाशी खेळण्याचा प्रकार आहे आणि तो अंतिमत: त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता अधिक आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिर बांधले जाईल आणि हा ताजा बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा उपस्थित करून भाजप आता लोकसभा निवडणुकीच्या हातघाईवर आला आहे हेच यातून स्पष्ट होत आहे.

– बाळकृष्ण शिंदे, पुणे

 

केवळ अमेरिकेत हे घडू शकते

‘एकावर बारा शून्ये’ हे शनिवारचे संपादकीय (४ ऑगस्ट) वाचले. अर्धवट खाल्लेल्या सफरचंदाचे कुतूहल चालवणारे आणि थेट अ‍ॅडम-इव्हच्या गोष्टीचे स्मरण करून देणारे बोधचित्र असणारी ‘अ‍ॅपल’ कंपनी केवळ आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेने जगभरच्या बाजारात सरस ठरली हे सध्याच्या काळात ‘शुभ वर्तमान’ ठरावे हे योग्यच आहे. मूल्यांचाच बाजार मांडून जग मुठीत घेण्याची हाव बाळगणाऱ्या आणि उद्योगाला ‘धंदा’ बनवणाऱ्या लोकांचीच चलती आहे असे वाटून घेण्याची गरज नाही, हा दिलासा या अ‍ॅपलच्या यशाने सगळ्यांना मिळेल यात शंका नाही. हे केवळ अमेरिकेत घडू शकते, असे म्हणताना डोनाल्ड ट्रम्पसारखी व्यक्ती अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकण्यासारखे आक्रीतही केवळ त्याच देशात घडू शकले हे विसरता येत नाही.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

 

‘अ‍ॅपल’ची यशोगाथा खूप काही शिकवणारी

‘एकावर बारा शून्ये’ हे संपादकीय वाचले. अ‍ॅपल कंपनीचा प्रवास थक्ककरणारा तर आहेच, शिवाय बरेच काही शिकविणारासुद्धा आहे. जगातील अ‍ॅपल ही एकमेव अशी कंपनी आहे जिचे उत्पादन वापरणारे वर्षांनुवर्षे या कंपनीशीच बांधील राहतात व क्वचितच दुसऱ्या प्रॉडक्टकडे वळतात. आज जेव्हा बाजारात एखाद्या गोष्टीचे असंख्य विकल्प आणि तेही कमीत कमी किमतीत उपलब्ध आहेत, तेव्हा एखाद्या कंपनीने आपले उत्पादन इतक्या उच्च कोटींचे बनवून आपली एकाधिकारशाही प्रस्थापित करणे निश्चितच सोपी गोष्ट नाही. यामागे कंपनीच्या ज्या दोन गोष्टी ठळकपणे समोर येतात त्यातील पहिली कल्पनाशीलता. या कंपनीचे प्रत्येक उत्पादन ग्राहकांच्या गरजेपेक्षा एक पाऊल पुढेच असते. दुसरे म्हणजे प्रत्येक उत्पादनाची अत्यंत उच्च कोटीची गुणवत्ता. आश्चर्याची गोष्ट अशी की, अमेरिकेची ही सगळ्यात मोठी कंपनी आपले एकही उत्पादन तिथे बनवीत नाही. सगळी उत्पादने दुसऱ्या देशांतून तयार होऊन येतात, तरीही त्यांच्या गुणवत्तेचा दर्जा वाखाणण्याजोगा आहे. आज ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे जिचे नवीन उत्पादन बाजारात येताना जगातील कोटय़वधी लोक उत्सुकतेपोटी रात्र जागून काढतात.

सारांश- कल्पनाशीलता आणि गुणवत्ता या दोन गोष्टींच्या बळावरच या कंपनीने हा यशाचा टप्पा गाठलेला आहे व वर्षांनुवर्षे आपला एक विशिष्ट ग्राहकवर्ग आपल्याशीच बांधील ठेवला आहे. अ‍ॅपलच्या या यशोगाथेने शिकण्यासारखे आहे, की जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जर कल्पनाशीलता आणि गुणवत्ता राखून कष्ट केलेत तर आपण दुसऱ्याच्या नव्हे तर स्वत:पेक्षाही खूप पुढे जाऊ  शकतो.

– तुषार अ. रहाटगांवकर, डोंबिवली

 

आधुनिक चाणक्यांचा नहले पे दहला!

‘इटालियन भाषा येत असती तर..’ ही बातमी (५ ऑगस्ट) वाचून ऊर भरून आला! याला म्हणतात नहले पे दहला! राहुल गांधी समजता काय स्वत:ला? चक्क चार वर्षांचा हिशेब मागता? बरे झाले, अमित शहांनी चार पिढय़ांचाच हिशेब मागून घेतला. सौ सुनार की एक लुहार की, समझे? अरे, तुम्ही अजून लहान आहात. आमच्या तोंडी काय लागता? जरा आपल्या पक्षातल्या ज्येष्ठांना विचारा की, काय होते या देशात २०१४ पूर्वी? ना रस्ते, ना रेल्वे, ना आधुनिक तंत्रज्ञान, ना वीज (विद्युतनिर्मितीच २०१४ साली सुरू करण्यात आली!) गेलाबाजार गोपालनसुद्धा धड होत नव्हते हो! शाळा, विद्यापीठांचे तर नावच घेऊ  नका. होत्या त्या फक्त आश्रमशाळा आणि तिथेही गीताग्रंथ वाटलेला नव्हता! शेतीबद्दल तर विचारूच नका. कर्जबाजारी होऊन किती शेतकरी आत्महत्या करीत होते! २०१४ पासून शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी झाला. इतका सुखी, की आता तो चक्क प्रेमप्रकरणे रंगवू लागला आहे. आता शेतकऱ्यांच्या ज्या काही किरकोळ आत्महत्या होतात त्या प्रेमभंगामुळेच होतात!

२०१४ नंतर तर देशाचे पार रूपडेच बदलून गेले. चकचकीत, गुळगुळीत रस्ते, घरोघरी वीज, पाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कबुतरांच्या जागी टपाल खाते, हत्ती-घोडय़ांच्या जागी दुचाक्या, चारचाक्या, शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचे आगाऊ  धनादेश, सरकारी नोकऱ्यांसाठी तर घरोघरी जाऊन भरती केली जाते आहे. ते तर जाऊच द्या. २०१४ पूर्वी अध्र्याहून अधिक जगाला भारत नावाचा देश या भूतलावर आहे हेसुद्धा माहीत नव्हते. (फक्त इटलीला माहीत होते!) २०१४ पासून आमच्या प्रधानसेवकांनी अथक परिश्रम करून, जगभर भ्रमंती केली तेव्हा कुठे जगाला भारत नावाचा देश या भूतलावर आहे हे कळले! केवढे महान देशकार्य! जे तुमच्या चार पिढय़ांना जमले नाही ते आमच्या प्रधानसेवकांनी चारच वर्षांत करून टाकले. तसा आम्हाला प्रसिद्धीचा सोस नाही, डांगोरा पिटण्याची सवय नाही. नाही तर सांगितले असते तुम्हाला की, आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी किती योगदान दिले ते इटालियन भाषेत! भलेच तुमच्या पूर्वजांनी पाकिस्तानचा भूगोल बदलून टाकला असेल; पण इतिहास सगळा चुकीचा लिहून ठेवला त्याचे काय? आता २०१९ नंतर त्याच्यात लक्ष घालावे लागेल!

– मुकुंद परदेशी, धुळे</strong>

 

हे कधी तरी उमजेल का?

‘जगण्याला मोल कधी मिळणार?’मधील दोन्ही लेख (रविवार विशेष, ५ ऑगस्ट) अतिशय मर्मभेदक असून प्रत्येक प्रवाशाने तसेच वाहनचालकानेही गंभीर विचार करावा असे आहेत. आपल्या देशात सर्वसामान्य माणसाच्या जिवाला क्षुल्लक मानले जाते याचा अनुभव पदोपदी येत असतो. मग तो रस्त्यावरील प्रवास असो वा लोकलचा. आपल्या राज्यातील रस्ते हे सर्वार्थाने फक्त मुंबई-पुणे महामार्गापुरतेच केंद्रित आहेत की काय अशी शंका यावी अशी इतर महामार्गाची स्थिती आहे आणि अनेक घाट तर अक्षरश: पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर एक घाट संपतो आणि लगेच दुसरा घाट सुरू होतो, पण वर्षांनुवर्षे तिथे दरडी पडतात, अपघात घडतात हे कटू सत्य आहे. आपल्याकडे वाहनचालकाला महत्त्वच दिले जात नाही. त्यामुळे वाहनात गाण्यांपासून ते भांडणापर्यंत सर्व काही चालत असते. त्याचा वाहनचालकाला त्रास होतोच, पण जर तो अनुभवी नसला तर जास्त धोका असतो. या सर्व कारणांमुळे अपघात होत राहतात, नुकसानभरपाईच्या घोषणा होतात; पण नुकसानभरपाईमुळे गेलेला जीव परत येत नाही हे वास्तव संबंधित यंत्रणांच्या लक्षात कधी येणार? अपघात टाळण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे हे कधी तरी उमजेल का?

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

‘मन:शक्ती प्रयोग’ विद्यार्थ्यांवर कशासाठी?

शालेय शिक्षण विभागाने ‘मन:शक्ती’ केंद्राला विद्यार्थ्यांवर प्रयोग करण्यासाठी पाचारण केल्याची बातमी (५ ऑगस्ट) वाचून अचंबित झालो. त्यांना कायमस्वरूपी ही परवानगी दिलेली आहे. मन:शक्ती केंद्रातील एखादा अनुयायी शालेय शिक्षण विभागात कार्यरत असावा आणि त्याच्या इच्छेनुसार हा घाट घातला गेला असण्याचीच शक्यता वाटते.

हा प्रयोग करण्याआधी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला का? शाळांमध्ये आणि पालकांपुढे मन:शक्ती केंद्रातील मंडळींनी जाऊन प्रात्यक्षिके दाखवली का? लोणावळास्थित मन:शक्ती केंद्रांसारख्या अनेक केंद्रांचे सध्या पेव फुटलेले आहे. मानसिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या मंडळींना असल्या कुबडय़ांची गरज भासते.

त्यांचा नक्की कोणाला किती उपयोग होतो हे व्यक्तीसापेक्ष असते. त्याचे मूल्यमापन करणे शक्य नाही. मन:शक्ती केंद्राची स्थापना तणावमुक्त जीवन – सुखसंवर्धन – बुद्धिवर्धन करण्यासाठी झालेली आहे, असे अनुयायी म्हणतात. असे असूनही या केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी मंत्रालयासमोरील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. यावरूनच त्यातील मर्यादांचे मूल्यमापन करता येईल. जी व्यक्ती स्वत:च्या तत्त्वज्ञानाने सुखी राहून आयुष्य जगू शकत नाही त्यांचे धडे गिरवणे कितपत योग्य होईल याचाही विचार होणे गरजेचे ठरते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकाराची कसून चौकशी करावी आणि असले प्रकार करण्याच्या भरीस शाळांना पाडूच नये, यासाठी हा पत्रप्रपंच.

– नितीन गांगल, रसायनी